देश जेवढा दरिद्री तेवढी तेथील राजकीय बंडांची शक्यता वाढते. हिंसाचार, अत्याचार यांच्या जोरावर आपली सत्ता टिकवून ठेवणारे अखेर त्या हिंसाचाराचीच शिकार बनतात. ज्यांच्या सिंहासनांचा आधार जात, वंश, धर्म हाच असतो; तोच आधार त्यांची सिंहासने उखडून फेकतो. हा इतिहासाचा धडा आहे. त्याची पुनरावृत्ती येमेनमध्ये झाली. जेथे वाटण्यासारखे काही असेल तर ते दारिद्रय़च असा हा देश. त्या देशाच्या सत्तास्पर्धेतून तेथील आजवरचा सर्वात शक्तिशाली नेता अली अब्दुल्ला सालेह यांचा बळी घेतला गेला. सात वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांतून अरब स्प्रिंग नावाचा एक वणवा पेटला होता. लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठीचे, भ्रष्टाचार हटविण्यासाठीचे दुसरे वगैरे स्वातंत्र्ययुद्ध होते म्हणे ते. त्यातून टय़ुनिशिया, इजिप्त, लीबिया, येमेन या देशांतील सत्ताधीशांना धूळ चाखावी लागली. तेथील सरकारे कोलमडून पडली, पण त्यातून तेथे लोकांची सत्ता येईल ही अपेक्षाही चक्काचूर झाली. तेथे अवतरली ती हिंसक झुंडशाही. लीबियात तिने मुअम्मर गडाफी यांचा बळी घेतला. गडाफी यांच्या मृत्यूबद्दल सुसंस्कृत जगाने अश्रू ढाळावेत असे अजिबात नाही. परंतु अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्या मृतदेहाचे धिंडवडे काढण्यात आले. सुसंस्कृत लोकशाहीवादी राज्यव्यवस्थेचे ते काही लक्षण नव्हे. लीबियाप्रमाणेच सीरियामध्येही घडले. तेथील बशर अल असाद यांनी कशीबशी आपली सत्ता वाचवली परंतु यादवी युद्धाची किंमत चुकवून. त्यातून आयसिससारख्या धार्मिक हिंसक चळवळीला बळ मिळाले यात काहीही नवल नाही. तेथील कट्टरतावादी धार्मिक राजकारणाचा अंतिम टप्पा तोच होता. आता येमेनही लीबियाच्या मार्गाने चाललेला आहे. गडाफी यांच्याप्रमाणेच परवा सालेह यांची हत्या करण्यात आली. ती करणारे हात होते हौथी बंडखोरांचे. ते शिया पंथीय. अरब स्प्रिंग उठावापायी सत्ता सोडावी लागल्यानंतर सालेह यांनी या बंडखोरांशी हातमिळवणी केली होती. या बंडखोरांचे संबंध इराणशी. त्या आधी सालेह हे अमेरिकेच्या गोटात होते. सौदी अरेबिया त्यांच्या पाठीशी होती. किंबहुना १९७८ मध्ये सौदी अरेबियाच्या पाठिंब्यामुळेच ते उत्तर येमेनच्या अध्यक्षपदी आले होते. पण आता सत्तापिपासा त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यासाठी त्यांनी आधी हौथी बंडखोरांना हाताशी धरले आणि वेळ येताच सोडून दिले. त्यांच्या या ‘गद्दारी’मुळे संतापलेल्या बंडखोरांनी सोमवारी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. सत्ता हेच साध्य मानून त्यासाठी कोणतेही साधन वापरायचे, षड्यंत्रे रचायची, विरोधकांना तर चेचायचेच, परंतु आपल्या समर्थकांवरही दहशत ठेवायची ही सालेह यांची कार्यपद्धती. आजवर येमेनमध्ये त्याचे मोठे कौतुक करण्यात येत असे. सापाच्या फण्यावर नाचणारा म्हणून त्यांचा गौरव करण्यात येत असे. त्यांच्या त्या नर्तनकलेनेच अखेर त्यांचा घात केला. त्याला अर्थातच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ आहेत. इराण विरुद्ध सौदी अरेबिया मार्गे अमेरिका या संघर्षांचा पदर त्याला आहे आणि त्या पदाराला किनार आहे ती शिया-सुन्नी या पंथवादाची. सालेह यांनी येमेनमधील आबेद राब्बो मन्सूर हादी यांच्या सरकारविरोधात या संघर्षांचा वापर करून घेतला. येमेनमधील सरकारविरोधी संघर्षांत सालेह यांच्या निष्ठावंत फौजेने हौथी बंडखोरांना साथ दिली. विशेष म्हणजे यापूर्वी हेच सालेह सौदी राजघराण्याच्या विरोधात असलेल्या ओसामा लादेनच्या दहशतवाद्यांचे आश्रयदाते होते आणि हे माहीत असूनही अमेरिका त्यांना मदत करीत होती. या सर्वाच्या सत्ताकांक्षी नाइलाजावर मांड ठोकून सालेह आजवर आपले राजकारण करीत होते. त्यात येमेन भरडला जात होता. सोमवारी सालेह संपले, पण म्हणून येमेन मुक्त झाला नाही. दरिद्री देशांना अशी सहज मुक्ती मिळत नसते..