छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, असे आजकाल वाटू लागले असले, तरी खरोखरीच तसे झालेच, तर आसपास जे काही सुरू आहे ते पाहून, आपल्याला अभिप्रेत असलेली ती शिवशाही पुन्हा अस्तित्वात आणता येईल का, असा प्रश्न त्यांनाही पडेल यात शंका नाही. गेल्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकमान्य टिळकांनी सामाजिक द्रष्टेपणा दाखविला असला तरी आज ते असते, तर ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणत त्यांनी कपाळाला हात लावला असता यातही शंका नाही आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या वेळी जे लिहून ठेवले त्यानुसार आजही, गणेशोत्सवात धांगडधिंग्याखेरीज दुसरे काहीच नाही. या तीनही महापुरुषांच्या विद्यमान वारसांना गणेशोत्सवाविषयी काय वाटते ते फारसे मनावर घेण्याजोगे नसले तरी त्याची चर्चा तर होणारच असते.  मात्र, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या वेळी नेहमीच दोन बाजू हिरिरीने मांडल्या जातात. सार्वजनिक उत्सव दणक्यात, हिरिरीने साजरे होणारच असे एक बाजू मानते, तर अशा ढणढणाटी उत्सवांनी सर्वसामान्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो, असे दुसरी बाजू म्हणते. अलीकडे उत्सवांचे महत्त्व काहीसे अधिकच वाढू लागल्यापासून पहिल्या बाजूचे पारडे आक्रमकपणे जड होण्याचा प्रयत्न करू लागले असून अशा परिस्थितीत, सरकार आणि न्यायालयांना हस्तक्षेप करावा लागणे ही नित्याचीच बाब झाली आहे. गणेशोत्सवात वाद्यांच्या भयंकर गोंगाटास राज्य सरकारने उच्च न्यायालयात ठाम विरोध दर्शविला असला तरी विरोध मोडून वाद्यांचा ढणढणाट सुरू ठेवा, असे आदर्श आदेश शिवरायांचे किंवा प्रबोधनकारांचे वारस राजरोसपणे देऊ लागल्याने हा विषय अधिकच संवेदनशील झाला आहे. छत्रपतींच्या गादीचे वारस असलेल्या उदयनराजे भोसले यांनी तर न्यायालय किंवा सरकारच्या भूमिका झुगारून वाद्यांचा गोंगाट माजविण्याचा सार्वजनिक पवित्रा घेतला आहे. या गणेशोत्सवांनी जनतेच्या कल्याणाची एकही सिद्धी साधलेली नाही, असे म्हणणाऱ्या प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरे यांनीदेखील डीजेच्या ढणढणाटास हिरवा कंदील दाखविला आहे. एकंदरीत, गणेशोत्सवातील वाद्यांच्या गोंगाटाच्या बाजूने राजकीय क्षेत्राने मुसंडी मारल्याने, सरकारचा कागदी विरोध न्यायालयात भक्कम ठरला तरी रस्त्यावरच्या गोंगाटास तो आळा घालू शकेल किंवा नाही याविषयी शंकाच असून, तसेच झाले तर सर्वसामान्यांना बहिरेपणास सामोरे जाण्याची मानसिक तयारी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे समजण्यास मोठा वाव आहे.  अशा प्रकारे गोंगाटात साजरा होणारा गणेशोत्सव पाहून  टिळकांनीही त्यास विरोधच केला असता, असे उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच म्हटले होते. गणेशोत्सवातील गोंगाटाचा वाद ही उत्सवासोबतची वार्षिक परंपराच होऊ पाहात असेल, तर हा उत्सव म्हणजेराजकारण्यांचा गोंधळ ठरणार असून जनतेला त्यापासून काय मिळते याचा विचार करण्याची क्षमताच या गोंगाटात संपुष्टात येणार आहे.न्यायालयाची भूमिका झुगारून गोंगाटाचे समर्थन करणारा विचार प्रबळ होत असेल, तर सामान्यांनी बहिरेपणाचाच पर्याय  स्वीकारणे श्रेयस्कर ठरणार असून, ‘घाला कितीही गोंधळ’ अशा हतबलपणे अशा उत्सवांकडे पाहणेच हातात उरणार आहे. म्हणूनच, शिवराय, लोकमान्य किंवा प्रबोधनकार, यांपैकी कुणी आज अवतरलेच, तर ते काय करतील, या प्रश्नाचे उत्तर अवघडच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi festival 2018
First published on: 20-09-2018 at 00:08 IST