आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रयोग फसले, खेळखंडोबा घडला की त्याचे परिणाम फार गंभीर होतात. एकदा फसलेला प्रयोग पुन्हा करणे तर न परवडणारेच ठरते. इराक, अफगाणिस्तान, लिबियापाठोपाठ सध्या सीरियातही बडय़ा देशांचा बलप्रयोग फसतो आहे. सीरियात गेली साडेचार वर्षे चाललेल्या गृहयुद्धात आजवर अडीच लाख लोकांनी प्राण गमावले आहेत आणि सुमारे एक कोटींहून अधिक बेघर झाले आहेत. हे सारे सुरू झाले पाच वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीपाठोपाठ मध्य आशियातील आणि अरबस्तानातील बऱ्याच देशांत लोकशाहीवादी चळवळींनी उचल खाल्ली, तेव्हा. सीरियातही मार्च २०११ मध्ये अध्यक्ष बशर अल असाद राजवटीविरुद्ध चळवळ सुरू झाली. चार महिन्यांत देशव्यापी झालेली ही चळवळ सशस्त्र लढय़ाच्या पातळीस जावी म्हणून बडय़ा देशांनीच मदत केली; पण पुढे तिला बहुसंख्य सुन्नी जनता विरुद्ध सत्ताधारी असाद यांची शिया अलावी राजवट असा रंग भरला. या गोंधळाच्या वातावरणात इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल-कायदाशी संबंधित नस्रा फ्रंट या दहशतवादी गटांनी आपले हात धुऊन घेत देशाचा काही भाग बळकावला. उत्तरेकडील कुर्द बंडखोरांनी काही भाग घेतला. असाद यांच्या बाजूने लेबॅननमधील शिया पंथीय हिजबुल्ला या गटाने पाठिंबा जाहीर करून काही भागांवर नियंत्रण स्थापले. सध्या सीरियात अशी स्थिती आहे की, देशाच्या केवळ २० ते ३० टक्के भूभागावर असाद यांचे नियंत्रण आहे. साधारण तेवढाच भाग विरोधक आणि या अन्य गटांकडे आहे. उरलेल्या ६० टक्के वाळवंटी भागात लोकसंख्येची घनताही कमी आहे आणि त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. असाद यांना रशिया आणि इराणचा पाठिंबा; तर विरोधकांच्या बाजूने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन आदी देश अशी स्थिती असली तरी रशिया तसेच अमेरिका-ब्रिटन-फ्रान्स यांनी सामायिक शत्रूच्या- आयसिसच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. मात्र अफगाणिस्तान वा इराकचा अनुभव लक्षात घेता सीरियात पायदळ उतरवण्याची इच्छा नाही. अन्य आखाती देशांइतके तेलसाठेही कमी, त्यामुळे या संघर्षांत कुणाला फार स्वारस्य नाही. परिणामी कोणत्याही एका पक्षाची लष्करी सरशी होत नाही आणि देशावर निर्णायक हुकूमत प्रस्थापित होत नाही. शांतता प्रस्थापित करण्याच्या आघाडीवर संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने २०१२ आणि २०१४ मध्ये जिनिव्हा येथे बोलणी झाली. सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्यांत मतभेद असल्याने तोडगा निघाला नाही. अखेर डिसेंबर २०१५ मध्ये सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांत एकमत होऊन, सीरियात ताबडतोब शस्त्रसंधी घडवून सहा महिन्यांत हंगामी सरकार स्थापन करणे आणि पुढील १८ महिन्यांत निवडणुका घेण्याचे ठरले. त्यानुसार सध्या जिनिव्हात पुन्हा सर्व गटांची बोलणी सुरू झाली आहेत. मात्र रविवारी आयसिसने दमास्कस येथील शिया प्रार्थनास्थळी बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या भीषण हल्ल्यानंतर त्यांचेही भवितव्य अंधारत आहे. असाद यांची राजवट उलथवण्याचा पाश्चिमात्य जगाचा होरा चुकला, विरोधकांमध्ये सत्ता काबीज करण्याइतका जोर नाही, बडय़ा शक्ती प्रत्यक्ष लष्करी हस्तक्षेप करून तोडगा काढण्यास उत्सुक नाहीत, या गोंधळात आयसिसने हातपाय पसरले आहेत अशा स्थितीत संघर्ष शांत होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि माणुसकीचा बळी जात राहणार हे मात्र स्पष्ट होते आहे. जगाचे सीरियात फारसे हितसंबंध नसल्याने त्याला त्याचे काही सोयरसुतक नाही. मात्र सीरियन निर्वासित युरोपभर पसरू लागल्याने युरोपीय देशांना झळा जाणवत आहेत. मात्र सीरियातल्या- किंवा अन्य ‘फसलेल्या प्रयोगां’तल्या संहाराशीच आता जगाला संसार करावा लागणार, हे नक्की.