News Flash

करझाईंचा सल्ला आणि सल

अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई हे घनिष्ठ भारत-मित्र.

पाकिस्तानच्या कोणत्याही वृत्तवाहिनीवर तावातावाने सुरू असलेल्या चर्चेचा केंद्रबिंदू भारत असतो. यात चर्चेचा एक रोख असा असतो, की चीन सोडून पाकिस्तानला आता खरा मित्रच राहिलेला नाही. अमेरिकेकडून पद्धतशीर दुर्लक्ष होतच असते, पण इराण आणि अफगाणिस्तानसारखे मुस्लीम देशही भारताच्या कच्छपी लागावेत हे पाकिस्तानच्या धोरणकर्त्यांना आणि माध्यमांनाही खुपते. भारताने अफगाणिस्तानमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करून पाकिस्तानची कोंडी करण्याचा डाव रचला आहे, असे पाकिस्तानी लष्करी धुरीणांना वाटते. थोडक्यात, अफगाणिस्तानसारखा वर्षांनुवर्षे ‘आपला मित्र’ असणारा देश भारताचा मित्र बनला, याविषयी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक विषाद व्यक्त होतो. अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई हे घनिष्ठ भारत-मित्र. ते नुकतेच भारतभेटीवर आले होते आणि निवडणूक रणधुमाळीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेट कबूल केली यावरून करझाईंचे महत्त्व लक्षात येते. अफगाणिस्तानच्या बाबतीत भारत आणि अमेरिका या देशांचे मतैक्य आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या देशाचे ‘अफगाणिस्तान धोरण’ जाहीर केले. त्यात अमेरिकी सैनिक अजून काही काळ अफगाणिस्तानात राहतील, भारताने त्या देशात आपले विधायक अस्तित्व वाढवावे आणि पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांचे तळ बंद करावेत वगैरे तरतुदी आहेत. या धोरणाला भारताचा पाठिंबा आहे. या पाठिंब्याबाबत फेरविचार करावा, असा करझाईंचा आग्रह आहे. अमेरिका सैन्य ठेवून आणि भारत अफगाणिस्तानातील विधायक कामात सहभागी होऊन आपापल्या भूमिका निभावत असताना, पाकिस्तानने मात्र दहशतवाद्यांचे तळ पूर्णत: उद्ध्वस्त केलेले नाहीत. तरीही अमेरिकेने त्यांना नुकतीच ७० कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे. पण करझाईंच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा अनाठायीच म्हणाव्या लागतील. कारण एक तर ट्रम्प यांची धोरणे बदलणे हा भारताचा अजेंडा असू शकत नाही. जेरुसलेमबाबत त्यांच्या सरकारने उचललेले पाऊल पाहता, अशी धोरणे ठरवताना ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार सारासार विवेक बाळगतात याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. दुसरे म्हणजे, करझाई यांनी अलीकडे विद्यमान अफगाण अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या कथित अमेरिकाधार्जिण्या धोरणावर वारंवार टीका केलेली आहे. अशा करझाईंबरोबर मोदींनी शाही भोजन घेतले, त्या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित होते. अशीच राजशिष्टाचारसंमत वागणूक उद्या मनमोहन सिंग यांना अफगाणिस्तानात किंवा इतर कोणत्याही देशात मिळाली आणि त्यांनी तेथील सरकारचे असे एखादे विद्यमान धोरण बदलण्याची विनंती केली, ज्याचा भारताशी संबंध आहे तर ते मोदी आणि त्यांच्या सरकारला आवडेल का? ‘आज जुन्या मित्राशी भेट झाली’ असे ट्वीट मोदींनी केले. या जुन्या मित्राने अफगाणिस्तानमधील विद्यमान सरकारला भारतात येऊन दुखावल्यास त्याचा फारसा अनुकूल परिणाम भारत-अफगाणिस्तान संबंधांवर होणार नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये नेपाळ, श्रीलंका, मालदीव अशा दक्षिण आशियाई देशांशी असलेले आपले स्नेहबंध ढिले पडू लागले आहेत. नेपाळच्या बाबतीत तर याचे प्रमुख कारण आपल्या सरकारचे धोरण हेच होते. त्याच प्रकारे आपण अफगाणिस्तानमधील सरकारला दुखावणार असू, तर त्याबद्दल सर्वस्वी आपल्यालाच दोष द्यावा लागेल. आपण जगभर फिरतो आणि राष्ट्रप्रमुखांना भेटत असतो, असे करझाई म्हणतात. पण ते आता राष्ट्रप्रमुख नाहीत, याचे भान ठेवावे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते भान भारतातील धोरणकर्त्यांनी ठेवणे भारत-अफगाणिस्तान संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 1:44 am

Web Title: hamid karzai india tour
Next Stories
1 वैद्यकीय शिक्षण खरेच बदलेल?
2 उत्सवी उधळपट्टीला चाप
3 सरकारच्या अधिकारास आव्हान