भाजपबरोबर सरकारमध्ये मन रमत नाही, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असतानाच, शिवसेनेने गुजरातमधील भाजपचे कट्टर विरोधक पाटीदार पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना ‘मातोश्री’वर लाल गालिचा अंथरला होता. नुसते स्वागत केले नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने हार्दिक यांना पाठिंबाही जाहीर करून टाकला.  केंद्र आणि राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचे आणि परत परस्परांवर कुरघोडी करायची संधी सोडायची नाही, असेच दोन्ही पक्षांचे सध्या धोरण आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरात राज्यात हार्दिक पटेल यांनी भाजपला घाम फोडला. आरक्षणाच्या मुद्दय़ावर झालेल्या पटेल समाजाच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या आंदोलनानंतर झालेल्या गुजरातमधील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला आणि काँग्रेसला चांगले यश मिळाले. हार्दिक यांना राजकीयदृष्टय़ा संपविण्याकरिता भाजपने पावले उचलली आणि त्यांना तुरुंगात डांबले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फक्त मराठी मतांवर विजयाचे गणित जुळणार नाही हे लक्षात येताच शिवसेनेने प्रत्येक सभेत १९९२-९३ मध्ये मुंबई शिवसेनेमुळे वाचली, हे सांगत हिंदुत्वाचा मुद्दा मांडीत गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांना आपलेसे करण्यावर भर दिला आहे. मुंबईतील गुजराती मतदारांवर प्रभाव पाडण्याकरिता हार्दिक यांचा वापर करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याबाबत साशंकताच आहे, कारण हार्दिक पटेल यांच्या गोरेगावमध्ये मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत पटेल समाजाची तुरळक उपस्थिती होती. गुजरातमधील पटेल आणि मुंबईतील पाटीदार पटेल समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. गुजरातमध्ये आरक्षण हा भावनिक आणि सामाजिक प्रश्न आहे. मुंबईतील पटेल समाज हा मुख्यत्वे व्यापारात आहे. मुंबईतील गुजराती समाजात भाजपबद्दल जास्त आकर्षण आहे. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी किंवा अन्य वादांमध्ये भाजपने गुजराती समाजाची बाजू उचलून धरली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने काही प्रमाणात छोटय़ा व्यापाऱ्यांमध्ये भाजप किंवा मोदींच्या विरोधात नाराजी आहे. त्याचा फायदा उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे; पण हार्दिक पटेल यांना प्रचारात उतरवून शिवसेनेला फार काही फायदा किंवा मोठय़ा प्रमाणावर मते मिळण्याची शक्यता कमीच आहे. हार्दिक यांना बोलाविण्यामागे भाजपच्या शेपटावर पाय ठेवण्याचा शिवसेनेचा उद्देश लपून राहिलेला नाही. मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने मागे महापौरपदासाठी मुस्लीम लीगची मदत घेतली होती. शिवसेनेने सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ अशी घोषणा दिली होती; पण १९७१च्या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईत फिल्ड मार्शल करिअप्पा यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता.  ‘रजनी पटेल, शांती पटेल, मराठी मनाला कसे बरे पटेल’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने पुढे मुकेश पटेल, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी ते आता राजकुमार धूत यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊन पावन करून घेतले. भाजपशी युती असतानाही टी. एन. शेषन, प्रतिभाताई पाटील किंवा प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा दिला होता.  शिवसेनाप्रमुखांनी पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याला ‘मातोश्री’वर पाचारण केले होते. यामुळे हार्दिक पटेल आल्याने आश्चर्यजनक असे काहीच नाही. फक्त उद्धव यांचे सरकारमध्ये मन आणखी किती रमते, हाच प्रश्न शिल्लक राहतो.