हेमंत बिस्व सरमा यांची आसामच्या मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा अखेर पूर्ण झाली. काँग्रेसमध्ये असताना सरमा यांनी बंडाचे निशाण रोवले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण राहुल गांधी यांनी जनाधार आणि राजकीयदृष्टय़ा ताकदवान असलेल्या या नेत्याकडे दुर्लक्ष के ले. सरमा हे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी भेट नाकारली यावर, ‘‘आपल्याशी चर्चा करण्याऐवजी राहुल हे कुत्र्याबरोबर खेळण्यात मग्न होते,’’ अशी खंत सरमा यांनी व्यक्त केल्यावर, राजकीयदृष्टय़ा आश्वासक अशा या नेत्याला भाजपने आपल्या गळाला लावले. २०१६ मध्ये आसाममध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात सरमा यांची भूमिका महत्त्वाची होती. पण मुख्यमंत्रिपदी भाजपने सर्वानंद सोनोवाल यांना संधी दिली. सरमा यांच्याकडे वित्त, आरोग्य यांसारखी महत्त्वाची खाती आणि मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले. पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी स्वत:हून लगाम लावला होता. सोनोवाल हे मितभाषी आणि नियमानुसार काम करण्यासाठी प्रसिद्ध. याउलट सरमा हे आक्रमक, पटापट निर्णय घेणारे- यामुळेच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय. याच काळात भाजप नेतृत्वाने सरमा यांच्याकडे ईशान्य भारतात भाजपची पाळेमुळे वाढविण्याची जबाबदारी सोपवली. ईशान्येकडील राज्यांपैकी मणिपूरमध्ये भाजपची सदस्यसंख्या कमी असतानाही फोडाफोडी करून भाजपला मुख्यमंत्रिपद मिळवून देण्यात सरमा यशस्वी झाले. ईशान्येकडील राज्यांमध्ये लोकसभेच्या एकंदर जागा २४, त्यांपैकी १७ जागा २०१९ मध्ये भाजपला मिळाल्या, तेव्हा जिंकण्यासाठी सारे व्यवस्थापन सरमा यांनीच के ले होते. गेल्या महिन्यात झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत १२६ पैकी ६० जागा जिंकू न भाजप मित्र पक्षांच्या मदतीने पुन्हा सत्तेत आला. सोनोवाल यांच्या स्वच्छ प्रतिमेचा भाजपला फायदा झाला; पण निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन सरमा यांनी केले. काँग्रेस आणि अल्पसंख्याकांचे नेते बद्रुद्दीन अजमल यांच्या युतीची भाजपला धास्ती होती. अशा वेळी अजमल हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा घडवून हिंदू मतांचे ध्रुवीकरण किंवा बांगलादेशी आणि आसामी मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचे प्रयत्न सरमा यांनी केले. उघड जातीयवादी प्रचारामुळे सरमा यांच्यावर दोन दिवस प्रचारबंदी लागू करण्यात आली होती, ती आयोगाने निम्म्यावर आणली तेव्हाच भाजपमधील त्यांचे महत्त्व वाढल्याचेही स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्रिपदही सरमा यांना मिळाल्याने, ईशान्येकडील राज्यांमध्ये काँग्रेस पक्षातील तीन माजी नेते भाजपचे मुख्यमंत्री झाले. अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमधील भाजपचे मुख्यमंत्री हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच. देशात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असताना विरोधी पक्षातील राजकीयदृष्टय़ा उपयुक्त ठरणाऱ्या नेत्यांना पक्षात घेऊन संधी दिली जात असे. महाराष्ट्रात हा प्रयोग पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी के ला, तेव्हा ‘बेरजेचे राजकारण’ म्हणून त्याचे कौतुकही झाले. भाजपने आता हाच प्रयोग सुरू केला व त्याचा भाजपला फायदाही झाला. हितेश्वर सैकिया आणि तरुण गोगोई या दोन काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या तालमीत तयार झालेले सरमा हे आसामच्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील बडे प्रस्थ. वादग्रस्त शारदा चिटफंड आणि लुई बर्गर घोटाळ्यात सरमा यांचे नाव जोडले गेले होते. पण भाजपवासी झाल्याने सीबीआय वा ईडीच्या कचाटय़ात सापडले नाहीत. पक्ष संघटनेत मुक्त वाव मिळालेल्या सरमा यांना मुख्यमंत्री म्हणून किती मुक्त वाव पक्षाकडून मिळतो, हे आता महत्त्वाचे.