हिंगणघाटमध्ये कथित एकतर्फी प्रेमातून  विकेश नागराळे या आरोपीने जिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, ती २५ वर्षीय प्राध्यापिका सात दिवस मृत्यूशी झुंजत होती. सोमवारी तिची झुंज संपली. त्याआधी बुधवारी, सिल्लोडनजीकच्या अंधारी गावातील पन्नाशीच्या महिलेने, शेजारीच राहणाऱ्या संतोष मोहिते नावाच्या आरोपीकडून ९५ टक्के जाळली गेल्याने जीव गमावला. आरोपीला ‘फाशीच द्या’, ‘भरचौकात फाशी द्या’, ‘जलद निकाल लावा’ अशा मागण्या करण्याची सवयच आता समाजाला झालेली आहे, त्या सवयीत हैदराबादच्या प्रकरणानंतर ‘एन्काऊंटर करा’ याही मागणीची भर पडली आहे. सवयीच्या झालेल्या या साऱ्या मागण्या आतासुद्धा होतील. पुढे काय होईल? दारोडा ते हिंगणघाट हा त्या मुलीचा रोजचा रस्ता.. तिथून आता ‘एकटीने जाऊ नको’ म्हणून आणखी अनेकींना सांगितले जाईल. दुसरे अनेक रस्ते मोकळेच आहेत, याची जाणीव कदाचित, आणखी एखादी घटना घडल्यावर होऊ शकते.. अशा घटनांमागच्या प्रवृत्तीला आपण भिडणार की नाही, हा प्रश्न कायमच राहतो. एखाद्याला ‘नराधम’ ठरवले की समाजाच्या दृष्टीने विषय संपतो. प्रत्युत्तरादाखल केलेली हिंसा म्हणजे हिंसा नाहीच, हे आताशा समाजमनावर इतके बिंबवले गेले आहे की महिलांबाबत हिंसक ठरलेल्या ‘नराधमां’ना दिली जाणारी शिक्षा किती हिंसक असावी, हेही अहमहमिकेने सुचवले जाते. हे सारे बोलण्यासाठी नेतेमंडळींना व्यासपीठे असतात, सामान्यजन आपापसांत जरी बोलले तरी तेवढेच समाधान मिळते. अनोळखी इसमांनी केलेले सामूहिक बलात्कार असोत की  एकतर्फी प्रेमाला नकार देते म्हणून झालेले जिवंत जाळण्याचे प्रकार. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, अशी आकडेवारी दरवर्षी येते. पण एक तर मालकी किंवा अतिक्रमण ही पुरुषी मानसिकता कमी होत नाही, हे त्यातून दिसतेच. ही पुरुषी मानसिकता आपण समाज म्हणून धिक्कारली आहे, असे आकडेवारी तर सांगत नाहीच. पण पुरुषी मानसिकतेतून झालेल्या अतिक्रमणखोर हिंसेचा रोख जर महिलांविरुद्ध- त्यातही ‘शिकल्यासवरल्या’, ‘चांगल्या घरच्या’ महिलांविरुद्ध- नसला, तर अशा घटना फारशा चर्चेतही राहात नाहीत. ‘जाती दोनच- स्त्री आणि पुरुष’ या गृहीतकालाही आव्हान मिळू लागलेले असल्याच्या आजच्या काळात वर्ग, वर्ण, राजकीय भूमिका या साऱ्या बाह्य आधारांनिशी पुरुषी मानसिकता कायम राहाते. अधिकारपदाचा गैरवापर करून महिलेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध काही काळ ‘#मीटू’ मोहीम चालली, पण तिचाही परिणाम ओसरू लागला. दिल्लीतील गार्गी महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव सुरू असताना स्वत:स ‘नागरिकत्व कायदा समर्थक’ म्हणवणारी टोळी आवारात घुसते आणि या महिला- महाविद्यालयातील मुलींना मारहाण करते, ही घटना सोमवार संध्याकाळची. ती तेवढी गंभीर नाही, म्हणून सोडून दिली जाऊ शकते! अशा अनेक प्रकारांमागे अखेर तीच आक्रमक मानसिकता असते. या मानसिकतेला आव्हान देण्याचे प्रयत्न होतातही. हिंगणघाटच्या घटनेनंतर युवतींसोबत युवकांनीही केलेले आत्मक्लेश आंदोलन, दिल्लीत ‘निर्भया निदर्शनां’मध्ये सहभागी असलेले युवक वा पुरुष, महाराष्ट्रात पुरुषांच्या जाणीवजागृतीसाठी सुरू असलेले प्रयत्न.. पण हे सारे अपवाद म्हणूनच पाहिले जाते. रोज कुठे ना कुठे अत्याचारांशी संघर्ष हा आपलाच वेडेपणा ठरावा असे प्रसंग घडत असतात. हे प्रसंग महिलांविरुद्ध नसले, तरी पुरुषी अतिक्रमणखोरी त्यामागे असतेच. या अत्याचारांशी झुंज सुरू ठेवणे, हेच ‘मृत्यूशी झुंज संपली’सारख्या बातम्या पुन्हा न येण्यासाठी आशास्थान ठरेल.