९ नोव्हेंबर २०१९ ही तारीख भारतीय इतिहासात दोन कारणांसाठी ठळकपणे नोंदली जाईल. वर्षांनुवर्षे रेंगाळलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल या दिवशी लागला. त्याचबरोबर, दरबार साहिब या पाकिस्तानातील शीख गुरुद्वाराला डेरा बाबा नानक साहिब या भारतीय गावाशी जोडणारी मार्गिका- कर्तारपूर कॉरिडॉर- याच दिवशी कार्यान्वित झाली. बर्लिनची भिंत कोसळून तत्कालीन पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्यात चिरंतन सेतुबंध तीन दशकांपूर्वी निर्माण झाला, तो दिवसही ९ नोव्हेंबर हाच. शीख धर्मीयांचे आद्यगुरू गुरू नानक यांनी सन १५०४ मध्ये रावी नदीच्या पश्चिम तीरावर कर्तारपूर वसवले. ९ नोव्हेंबर रोजी त्यांची ५५० वी जयंती होती. तेव्हा आपल्याकडील गुरुदासपूर जिल्ह्य़ातले डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील दरबार साहिब किंवा कर्तारपूर साहिब यादरम्यान ४.७ किलोमीटर लांबीची मार्गिका याच दिवशी सुरू होणे हे समयोचितच. ही मार्गिका किंवा हा सेतुबंध भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चर्चेचे मार्ग जवळपास पूर्ण बंद असतानाही निर्माण कसा होऊ  शकला, हे अभ्यासण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

कर्तारपूर मार्गिकेचा प्रस्ताव १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान प्रथम चर्चिला गेला. दिल्ली-लाहोर बस सेवेच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले, त्याच वेळी कर्तारपूर मार्गिकेची बीजे रोवली गेली होती. त्या वेळी निर्माण झालेल्या मैत्रीमय वातावरणात पुढे कारगिल, संसद हल्ला, मुंबई हल्ला, पठाणकोट, उरी, पुलवामा अशा अनेक कटू आणि दु:खद प्रसंगांची विषपेरणी होऊनही पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांकडून कर्तारपूर प्रस्तावाला तिलांजली मिळाली नाही, हे विशेष. उलट गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतात आणि २८ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानात या मार्गिकेचे भूमिपूजन होऊन कामही सुरू झाले. त्याची गरज होती. कारण एरवी दरबार साहिबला जायचे म्हणजे लाहोरमार्गे १२५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागत असे. रावीच्या भारताकडील तीरावर उभे राहून रावीपलीकडील दरबार साहिबचे दर्शन तर व्हायचे, पण जाता यायचे नाही. आता कर्तारपूर मार्गिका सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५०० हून अधिक भाविक दरबार साहिबला रवाना झाले, यावरूनच या मार्गिकेचे महत्त्व लक्षात येईल.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी कर्तारपूर मार्गिकेसाठी पुढाकार घेतल्याचा दावा केला. तो प्रामाणिक असेल, पण वस्तुस्थितीला धरून नाही. कारण मार्गिकेचे श्रेय वाजपेयी-शरीफ यांना द्यावे लागेल. तसेच कर्तारपूर मार्गिका ही शिखांसाठीच असून, शिखांनीच दरबार साहिबला यावे, असेही ते वेगवेगळ्या मार्गानी सूचित करत असतात. नक्की कोणते शीख त्यांना अपेक्षित आहेत? मुळात शीख धर्मस्थळांविषयीचे त्यांचे अज्ञानच यातून प्रकट होते. कारण जगातील सर्वात सहिष्णू आणि समावेशक धर्मस्थळांमध्ये शीख धर्मस्थळांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. अनवाणी असणे आणि डोके झाकणे हा साधा नियम पाळणाऱ्या बिगरशिखांनाही तेथे प्रवेश असतो. तेव्हा शिखांसाठी आमच्या देशाचे दरवाजे सदैव उघडे राहतील, या वाक्यातच अनेक विरोधाभास आहेत. कारण सच्चे शीख दरबार साहिबसारख्या ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी केवळ शिखांनीच यावे, असे कधीही म्हणणार नाहीत.

दरबार साहिब भाविकांच्या पारपत्रावरून झालेला गोंधळ पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये असलेल्या एकवाक्यतेच्या अभावाचे निदर्शक होता. गोंधळ आपल्याकडेही आहे, पण वेगळ्या प्रकारचा. कर्तारपूर मार्गिकेच्या माध्यमातून पाकिस्तान पुन्हा एकदा खलिस्तानवादी चळवळीला खतपाणी घालणार, अशी भीती येथील काही तज्ज्ञ व्यक्त करतात. कर्तारपूर यात्रेच्या प्रसिद्धिफितीमध्ये खलिस्तानवादी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे छायाचित्र झळकले हा प्रमुख आक्षेप. ते छायाचित्र आजही भारतीय पंजाबमध्ये कुठेही जाहीरपणे झळकताना सापडू शकेल. सुवर्णमंदिराच्या आवारात मिळू शकेल. केवळ तेवढय़ावरून संबंधितांना खलिस्तानवादी असे संबोधण्याचे आणि त्यापायी अस्वस्थ होण्याचे आपण केव्हाच सोडून दिले आहे. कारण अशी विभाजनवादी चळवळ फोफावण्यासाठी आवश्यक प्रेरके आज पंजाबात अस्तित्वात नाहीत. तेव्हा पाकिस्तानात कर्तारपूर मार्गिकेच्या निमित्ताने खलिस्तानवादाला संजीवनी मिळेल, अशी भीती बाळगण्याचे आपणही सोडून दिले पाहिजे. कर्तारपूर मार्गिका हा या दोन देशांतील समांतर संवादाच्या (ट्रॅक टू डिप्लोमसी) मोजक्या यशस्वी प्रयोगांपैकी एक मानावा लागेल. राजकीय, राजनयिक, लष्करी आघाडय़ांवर जवळपास अबोला असताना किंवा केवळ कडवटपणा असताना कर्तारपूर मार्गिका कार्यान्वित झाल्यासारखी किती उदाहरणे जगात आढळतात? कदाचित भविष्यात इतर संबंध पूर्ववत होण्यासाठी ही मार्गिका एक सेतुबंधही ठरू शकते, हा विश्वास निर्माण होणेही सद्य:स्थितीत थोडके नाही.