अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्करी कारवाईचा एक नवा टप्पा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेने सुरू झाला असून, या वळणावर त्यांनी भारतालाही सामील होण्याचे सहर्ष निमंत्रण दिले. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानच्या ‘दहशतवादी संघटनां’ना आश्रय देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली. अमेरिकेच्या आणि त्याचबरोबर ट्रम्प यांच्या या बदललेल्या भूमिकेचा थेट परिणाम भारत-पाकिस्तान याबरोबरच भारत-चीन संबंधांवरही होण्याची शक्यता असल्याने ते समजून घेणे आवश्यक आहे. नऊ-अकराच्या  हल्ल्यानंतर तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष  बुश यांनी जी अनाठायी साहसे केली त्यातील एक म्हणजे अफगाणिस्तानवर हल्ला. ऑक्टोबर २००१ मध्ये अफगाणिस्तानात अमेरिकी फौजा घुसल्या त्या तो देश तालिबान्यांपासून मुक्त करण्यासाठी. हे म्हणजे आपणच उभ्या केलेल्या भुतांबरोबर दोन हात करण्यासारखे होते. गेली १६ वर्षे हे युद्ध चाललेले आहे. त्यात यश न येण्याचे एक कारण आहे ती पाकिस्तानची याबाबतची नीती. एकीकडे अमेरिकेच्या ‘दहशतवादविरोधी युद्धा’त सहभागीही व्हायचे आणि त्याचबरोबर तेच दहशतवादी पोसायचे हे पाकिस्तानचे धोरण आहे. तरीही पाकिस्तानकडे बुश आणि ओबामा हे दयाद्र्र नजरेने पाहत असत. ट्रम्प यांनी मात्र पाकिस्तानकडे पाहून आता डोळे वटारले आहेत. पाकिस्तान तालिबानी आणि अन्य दहशतवादी संघटनांना देत असलेल्या आश्रयाबाबत आता आम्ही गप्प बसू शकत नाही. हे असेच चालू राहिले तर अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील सहकार्याचे संबंधही सुरू राहणार नाहीत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. भारताच्या दृष्टीने ही अत्यंत स्वागतार्ह अशीच घटना आहे. गेली अनेक वर्षे भारतीय नेते व मुत्सद्दी अमेरिकेच्या कानीकपाळी ओरडून हेच सांगत होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज ट्रम्प यांच्या कानी गेला हा याचा अर्थ असून, ते भारत-अमेरिकेतील वाढत्या मैत्रीचे द्योतकच आहे. परंतु या मैत्रीची काही किंमत आपल्याला चुकवावी लागणार आहे. ही किंमत असेल अफगाणिस्तानात अधिक राजकीय आणि आर्थिक गुंतवणूक करण्याची. याबाबतही ट्रम्प यांनी अमेरिकेची आधीची भूमिका उलटी केली आणि ते करतानाच आपल्या स्वतच्या आधीच्या मतांबाबतही कोलांटउडी मारली. ‘प्रथम अमेरिका’ या आपल्या नवराष्ट्रवादी विचारांना स्मरून ट्रम्प यांनी अफगाणिस्तानादी देशांतील अमेरिकी हस्तक्षेप काढून घेण्याची घोषणा निवडणूक प्रचारात केली होती. ते शब्द आता त्यांनी मोठय़ा खुबीने फिरवले आहेत. ते म्हणत काहीही असले आणि अमेरिकेसाठी आपण म्हणतो तेच कसे फायद्याचे आहे हे सांगत असले, तरी त्याचा साधा अर्थ हाच आहे, की अमेरिका अफगाणिस्तानमध्ये अधिक सैन्यबळ पाठविणार आहे. यावरून परवाच अमेरिकी प्रशासनातून पायउतार झालेले, ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्या ‘ब्रिटबार्ट न्यूज’ या मुखपत्राने ट्रम्प यांच्यावर दुगाण्या झाडल्या आहेत. ट्रम्प हे अमेरिकेतील सैन्याधिकाऱ्यांच्या हातातील बाहुले बनल्याची टीका या अतिउजव्या वृत्तस्थळाने केली. परंतु हे झाले अमेरिकेचे अंतर्गत राजकारण. त्यातून ट्रम्प हे आपल्या भूमिका वेळ येईल तशा बदलू शकतात हे पुन्हा अधोरेखित झाले एवढेच. भारताने चिंता करायची असेल तर ती या गोष्टीची. आज अफगाणप्रश्न सोडविण्यात भारतालाही ओढू पाहणारी अमेरिका भविष्यात त्यातून अंग काढून भारताला वाऱ्यावर सोडू शकते, हे लबाडाघरचे आवतण ठरू शकते, ही येथील राजनीतिज्ञांची भीती आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारले या आनंदात भविष्यातील या बडग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, इतकेच.