भावनांचे राजकारण केल्याचा आरोप कोणी, कोणावर, कसा करावा याला धरबंध राहिलेला नाही. अशा काळात, हे राजकारण निव्वळ सत्तासंधी साधण्यासाठी आहे की त्यातून काही व्यापक हेतू साध्य होणार आहे, याचे भान मात्र बाळगावे लागते. पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराकडे पारपत्र आणि ‘व्हिसा’विना शीख भाविकांना जाता यावे, यासाठी भारतातून पाकिस्तानात जाणारी मुक्तमार्गिका (कॉरिडॉर) चार महिन्यांत बांधून पूर्ण करण्याच्या घोषणेची बोळवण केवळ भावनिक राजकारण म्हणून करता येणार नाही. विशिष्ट धर्मीयांच्या हिताचा, त्यांच्या धार्मिक भावनांवर फुंकर घालणारा हा निर्णय असला, तरीही नाही. याचे कारण, कर्तारपूर मुक्तमार्गिकेमुळे त्यापेक्षा मोठा हेतू साध्य होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवाच्या गुरुनानक जयंतीस केंद्रीय अन्नप्रक्रिया खात्याच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या निवासस्थानी बोलताना बर्लिन भिंतीच्या पतनाची आठवण काढून हा कॉरिडॉर ‘जन जन को जोडने का कारण बन सकता है’ असा आशावाद व्यक्त केला होता. इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी या दोघा माजी पंतप्रधानांनी ‘पीपल टु पीपल डिप्लोमसी’ या कल्पनेचा पाठपुरावा केला होता, तिचे हे पुढले पाऊल ठरू शकते असा मोदी यांच्या आशावादाचा अर्थ. परंतु कोणत्याही दोन देशांच्या लोकांमधील मैत्रीभावना ही अखेर त्या-त्या देशाचे सरकार कसे वागते, यावरच अवलंबून असते. पाकिस्तानात नव्याने सत्तारूढ झालेल्या इम्रान खान यांच्या सरकारशी आपले संबंध बरे असू शकतात, अशी चिन्हे आजवर नव्हती. कर्तापूर मुक्तमार्गिकेचा प्रस्ताव प्राधान्यक्रमाने मार्गी लावून, आपणही एक पाऊल पुढे टाकू शकतो, हे खान यांनी दाखवून दिले. त्यामुळे सन १९९४ पासून शीख समाजाकडून केली जाणारी आणि सन २००० पासून सरकारने मान्य केलेली एक मागणी पूर्ण झाली. भारतीय सीमेपासून अवघे तीन किलोमीटर पलीकडे असलेल्या या गुरुद्वाराला ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सोमवारी गुरुदासपूरजवळच्या मान या गावात या मार्गिकेची कोनशिला रोवण्यात आली; तर पाकिस्तानातील कोनशिला सोहळा २८ रोजी होतो आहे. पाकिस्तानातील समारंभासाठी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापासून अनेकांना निमंत्रण होते, पण बहुतेकांनी ते नाकारण्यामागे अर्थातच, उघड कारणे आहेत. स्वराज यांनी कार्यबाहुल्याची सबब सांगून उघड कारणांची पुनरुक्ती टाळली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मात्र ही कारणे स्पष्टच सांगितली. सीमेपलीकडून दहशतवादाला पाठबळ मिळत असताना, माझ्या देशातील लष्करी जवान दररोज शहीद होत असताना आपण पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारणार नाही.. दर्शनाची इच्छा असली तरीही ती उभय देशांतील संबंध सुधारल्यानंतरच आपण पूर्ण करू, असे कॅ. सिंग यांचे म्हणणे. ते त्यांनी लेखी कळविलेच, शिवाय मान येथील भाषणातही सांगितले. सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू हे मात्र पाकिस्तानी कोनशिला समारंभाला जाऊ इच्छितात. याच सिद्धू यांचे ‘क्रिकेटमित्र’ इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळय़ास जाणे आणि तेथे पाकिस्तानी लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारणे वादग्रस्त ठरले होते. बाजवा यांनी कर्तारपूर मार्गिकेस प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितल्यामुळेच ते आलिंगन सिद्धू यांनी दिले, असे आता म्हटले  जाते. मैत्रीच्या या पावलांकडे भावनिक राजकारणाच्या पातळीवर न पाहता, या मैत्रीतील साऱ्या तणावांची जाणीव असणेच राजनैतिकदृष्टय़ा हिताचे आहे.