भारतीय खेळाडूंना विजेतेपदाच्या संधी क्वचितच मिळतात. त्यातही महिला क्रिकेटमध्ये विजेतेपदाची हुकमी संधी भारताच्या वाटय़ाला फारशी आलेली नाही. या संधीचे सोने करायचे सोडून भारतीय महिला खेळाडूंनी ज्या रीतीने ती मातीमोल केली, ते पाहता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बलाढय़ संघांवर मात करणारा हाच भारतीय संघ होता का, अशी शंका निर्माण होते. इंग्लंडला भारताने साखळी सामन्यात सहज हरवले होते. ते लक्षात घेता अंतिम फेरीत पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाकडून होती. विजयासाठी २२९ धावांच्या माफक आव्हानाला सामोरे जाताना भारतीय संघ ३ बाद १९१ अशा भक्कम स्थितीत होता. अशी परिस्थिती भारतीय पुरुष खेळाडू ज्या वाटेने जातात, तीच वाट महिला संघानेही चोखाळणे मुळीच अपेक्षित नव्हते. त्यामुळेच २८ धावांमध्ये सात जणी बाद होताना हताशपणे पाहणे भाग पडले. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडू नेहमीच अनेक स्पर्धा जिंकत असतात. त्यांच्याकडे जी विजिगीषु वृत्ती दिसून येते, ती वृत्ती कर्णधार मिताली राज यांच्यासह भारतीय खेळाडूंमध्ये दिसून आली नाही. मिताली हिने धावबाद होताना ज्या पद्धतीने विकेट फेकली, ते पाहता या स्पर्धेत लागोपाठ दोन सामन्यांमध्ये शतक टोलविणारी तसेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सहा हजार धावांचा विश्वविक्रम करणारी हीच खेळाडू होती, असे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. भारतीय महिलांनी अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर शेकडो चाहत्यांना अभिमान वाटला होता. प्रतिकूल परिस्थितीत खूप मेहनत करीत त्यांनी घेतलेली ही झेप खरोखरीच कौतुकास्पद होती, हे खरे. पण अंतिम फेरीत समावेश झाला, यातच समाधान मानण्याची भारतीय वृत्ती या खेळाडूंमध्येही मुरलेली दिसून आली. स्मृती मंधाना, मिताली राज, हरमनप्रीत कौर यांच्या दिमाखदार शतकांमुळे भारतीय महिला क्रिकेटची शान उंचावली होती. हरमनने नाबाद १७१ धावांची खेळी करताना कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये केलेल्या धडाकेबाज शतकांची आठवण झाली होती. इंग्लंडविरुद्ध अगोदर विजय मिळविला असल्यामुळे खरे तर मोठय़ा आत्मविश्वासाने त्यांनी अंतिम सामन्यात खेळणे आवश्यक होते. त्यासाठी मधल्या व शेवटच्या फळीतील खेळाडूंनी संयम, शांतचित्ताने खेळ करणे जरुरीचे होते. या शेवटच्या सहा फलंदाजांना तीस-चाळीस धावा करणे काही अवघड नव्हते. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या कौशल्यापेक्षाही चुकीचे फटके मारून भारतीय खेळाडूंनी विकेट्स फेकल्यामुळे त्यांच्या अगोदरच्या कष्टांवर पाणी पडले. मिताली, झुलन, वेदा कृष्णमूर्ती यांच्याकडे अनेक सामन्यांचा अनुभव आहे. त्यांनी थोडीशी जिद्द व चिकाटी दाखविली असती, तर ऐतिहासिक कामगिरी करण्याचा मान त्यांना मिळाला असता. आम्हाला सुविधा मिळाल्या असत्या, तर आम्ही विजेतेपद मिळविले असते, अशी तक्रार करायला त्यांना जागाही नाही. अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर लगेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपये तर साहाय्यक मार्गदर्शकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या पारितोषिकाचा मान राखण्यासाठी त्यांनी खंबीर मनोधैर्य दाखवत खेळायला पाहिजे होते. लॉर्ड्ससारख्या क्रिकेटच्या पंढरीत खेळण्याची संधी क्वचितच मिळत असते. त्यातही महिलांना हा मान मिळणे दुरापास्तच असते. याच मैदानावर १९८३ मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने बलाढय़ वेस्ट इंडिजला पराभवाचा दणका देत प्रथमच विश्वचषक जिंकण्याची किमया केली होती. त्यांच्यासारखी ईर्षां दाखवीत महिलांनी आम्हीही इतिहास घडवू शकतो हे दाखवायला पाहिजे होते. त्यामुळेच महिलांविषयी अभिमान वाटणाऱ्या अनेक चाहत्यांची सपशेल निराशाच झाली.