13 August 2020

News Flash

उत्तरांच्या शोधात हवाई दल

बालाकोट व हवाई चकमकींवरून उडालेल्या राजकीय साठमारीत न गुंतता हवाई दलाने सबळ पुरावे सादर करण्याला प्राधान्य दिले.

गेल्या काही महिन्यांत हवाई दलाशी संबंधित चर्चेचा सारा भर स्वाभाविकपणे राफेल खरेदी व्यवहार, बालाकोट हवाई हल्ले, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानी हवाई दलांदरम्यान अल्पकाळासाठी झालेल्या चकमकींवर होता. बालाकोट व हवाई चकमकींवरून उडालेल्या राजकीय साठमारीत न गुंतता हवाई दलाने सबळ पुरावे सादर करण्याला प्राधान्य दिले. आपल्या सैन्यदलांच्या अलिप्त युद्धसिद्धतेशी ते सुसंगतच होते. मात्र, गेल्या वर्षभरातील तीन घटना आपल्या हवाई दलाच्या सुरक्षा दक्षतेविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात. एएन-३२ हे हवाई दलाचे वाहक विमान ३ जून रोजी आसाममधील जोरहाट हवाईतळावरून उडाल्यानंतर काही वेळात बेपत्ता झाले. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचुकातळाकडे निघाले होते. हा तळ चीन सीमेजवळ असल्यामुळे सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा आहे. मेचुका खोऱ्यात लष्कर आणि निमलष्करी दले तसेच स्थानिक प्रशासनाने अथक शोध घेतल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी विमानाचे अवशेष दुर्गम ठिकाणी आढळले आहेत. जोखमीची शोधमोहीम फत्ते केल्याबद्दल सर्व संबंधित कौतुकास पात्र आहेत. परंतु एएन-३२ विमानाला झालेला हा काही पहिला अपघात नव्हे. २०१६ मध्ये अंदमानात पोर्ट ब्लेअरकडे निघालेले याच बनावटीचे विमान बंगालच्या उपसागरात कोसळले, त्याचे अवशेषही सापडू शकले नाहीत. २००९मध्ये असेच एक विमान मेचुकाहून उडाल्यानंतर अपघातग्रस्त झाले होते. याशिवाय १९८६, १९९०मध्ये या विमानाला अपघात झालेले आहेत. अंतोनोव या पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत पण आता युक्रेनस्थित कंपनीकडून ही विमाने बनवली जातात. भारताकडे अशी जवळपास १०० विमाने असून त्यांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत हवाई दलाच्या विमानांना झालेले अपघात चिंताजनक चित्र उभे करतात : एएन-३२ अपघातापूर्वी सहा लढाऊ  विमाने, दोन अत्याधुनिक प्रशिक्षक विमाने आणि एक एमआय १७ हेलिकॉप्टर हवाई दलाने गमावले आहे. एमआय १७ हेलिकॉप्टर बडगाम येथे विचित्र परिस्थितीत अपघातग्रस्त झाले होते, ते हवाई दलाच्याच हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षेपणास्त्राने चुकून पाडले, अशी कबुली देण्यात आली आहे. बालाकोट हल्ल्यांनंतर पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्द भेदण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विशेषत: काश्मीर खोऱ्यात हवाई सुरक्षा यंत्रणा युद्धसज्ज होती. अशा वेळी श्रीनगरहून उड्डाण केलेल्या एमआय १७ हेलिकॉप्टरला ‘शत्रुपक्षा’चे समजण्याची गल्लत सुरक्षा यंत्रणेकडून झाली. हेलिकॉप्टरचालकांनीही आणीबाणीच्या क्षणी आपल्या हेलिकॉप्टरची ओळख सुनिश्चित करण्याची खबरदारी घेतली नसावी, असा एक अंदाज व्यक्त झाला होता. आता या प्रकरणी मूळ चूक हवाई यंत्रणेकडूनच झाल्याचे सिद्ध होत असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी आणि कदाचित कोर्ट मार्शल सुनावणी होण्याची शक्यता आहे. युद्धजन्य कारवाईत अनवधानाने स्वकीयांची जीवितहानी होणे किंवा फ्रेंडली फायरचे प्रकार जगात इतरत्रही होत असतात. भारतात मात्र नजीकच्या काळात हे पहिल्यांदाच घडले आहे. बालाकोट हल्ल्यांची परिणामकारकता पडताळण्यासाठी प्रसंगी हवाई दलाच्या क्षमतेवरच शिंतोडे उडवले जाणे उद्वेगजनक होते. त्याविषयी लष्करी वर्तुळातूनच नव्हे तर सर्वसामान्यांतूनही संताप व्यक्त झाला होता. हवाई दलाविषयी आजही असलेल्या सार्वत्रिक विश्वासातून आणि प्रेमातून हे घडले होते. पण तसा विश्वास आणि प्रेम अनेक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या कुटुंबीयांना आता वाटते का, या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे नाही. क्षमता ओसरलेली जुनी विमाने, देखरेखीमधील गंभीर त्रुटी, सुटय़ा भागांची चणचण, प्रशिक्षणातील आधुनिकीकरणाचा अभाव या समस्या नवीन नाहीत. निव्वळ शौर्य आणि देशप्रेम या गुणांनी त्या झाकल्या जाऊ  शकत नाहीत याची जाणीव हवाई दलाला असेल, तिला आर्थिक पाठबळाचे पंख मिळायला हवेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2019 2:09 am

Web Title: indian air force 2
Next Stories
1 कठुआच्या दुभंगरेषा
2 यंत्रणेविषयीच संशय
3 काँग्रेसमधील निर्नायकी
Just Now!
X