News Flash

हवालदिल हवाई दल!

१९७१च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाचा निर्माण झालेला दबदबा निवळू लागल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा वाद अजूनही शमलेला नाही. या वादात हवाई दलासमोरील लढाऊ विमानांच्या चणचणीचा मुद्दा म्हणावा तितक्या प्रकर्षांने येऊ शकलेला नाही हे वास्तव आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीतून त्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भारताच्या सामरिक सिद्धतेमध्ये गेली अनेक वर्षे लष्कराच्या संख्यात्मक ताकदीबरोबरच हवाई दलाकडील लढाऊ विमानांच्या ४२ सुसज्ज स्क्वाड्रन किंवा तुकडय़ांचे (एका तुकडीत १८ विमाने) योगदान महत्त्वाचे होते; पण ही स्थिती २००२ मधील आहे. त्यानंतर विविध कारणांस्तव हवाई दलाला तितक्या सुसज्ज स्क्वाड्रन बाळगता आलेल्या नाहीत. आता तर येत्या दोन वर्षांत हवाई दलाकडील लढाऊ विमानांच्या तुकडय़ांची संख्या २६ वर घसरेल, असा अंदाज ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती आलेल्या कागदपत्रांतून लावता येतो. विशेष म्हणजे, त्याच काळात पाकिस्तानी हवाई दलाकडील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्सची संख्या २५ असेल, तर चीनकडील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्सची संख्या ४२ असेल! युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास दोन्ही आघाडय़ांवर लढण्यासाठी (पाकिस्तान आणि चीन) भारताकडे किमान ४२ स्क्वाड्रन्स असायला हव्यात यावर आजी-माजी हवाई दलप्रमुख आणि सामरिक विश्लेषकांमध्ये जवळपास मतैक्य दिसून येते. सामरिक सिद्धतेच्या बाबतीत एक मूलभूत तत्त्व मानले जाते. ते असे: ‘लष्करी ताकदीचा एक फायदा म्हणजे ती सहसा वापरावीच लागत नाही; पण लष्करी कमकुवतपणाचा एक तोटा म्हणजे शत्रू महत्त्वाकांक्षी बनतो!’ विशेष म्हणजे, राफेल विमाने आणि देशी बनावटीची तेजस विमाने हवाई दलात निर्धारित वेळेत टप्प्याटप्प्याने दाखल होऊनही लढाऊ विमानांची चणचण कमी होण्यातली नाही. गेल्या वर्षी कार्नेगी एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या अमेरिकास्थित संस्थेने भारतीय हवाई दलाच्या ढासळत्या सामर्थ्यांचे सविस्तर विश्लेषण केले होते. १९७१च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाचा निर्माण झालेला दबदबा निवळू लागल्याचा इशारा त्यांनी दिला होता. २०१६ या वर्षांचा दाखला देत त्यांनी अशी आकडेवारी मांडली, की भारताकडील जवळपास ४५० लढाऊ विमाने चीन आणि पाकिस्तान यांच्याकडील एकत्रित ७५०च्या आसपास लढाऊ विमानांचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी नाहीत. भारताकडे सध्याच्या घडीला सुखोई एमकेआय-३० प्रकारातली २४७ लढाऊ विमाने आहेत. २०२० पर्यंत आणखी २५ अपेक्षित आहेत. मात्र पुढील २० वर्षांचा विचार करता सध्याच्या विमानांवरील यंत्रणा कालबाह्य़ ठरते, असे हवाई दलानेच सरकारला कळवले आहे. या विमानाला ‘सुपर सुखोई’ म्हणजे अधिक अत्याधुनिक बनवण्याची तयारी रशियाने दर्शवली होती; पण दरम्यानच्या काळात अमेरिकेने रशियाकडून ताजी लष्करी मदत घेणाऱ्या प्रत्येक देशाला निर्बंधयादीत टाकण्याचा कायदा केल्यामुळे ती वाटही जवळपास बंद झाली आहे. नवीन विमानांचे किंवा लष्करी सामग्रीचे अधिग्रहण, उपलब्ध विमानांची देखरेख, देशी उत्पादकांना पाठबळ देणे, खासगी देशांतर्गत गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे या सर्वच आघाडय़ांवर भारतात दिसून येणारे औदासीन्य किंवा परिपक्वपणाचा अभाव आणि भारताची सामरिक महत्त्वाकांक्षा यांचा मेळ कुठेही जुळत नाही. आज सत्तेत असलेले उद्या विरोधात गेले किंवा विरोधातले सत्तेत गेले, की संरक्षण खरेदी व्यवहारावर बालिश चर्चा करून परस्परांना खिंडीत गाठण्यापलीकडे या गंभीर मुद्दय़ाविषयी राजकारणी मंडळींनाही देणेघेणे नाही. लढाऊ विमानांच्या आजच्या किंवा नजीकच्या भविष्यातील संभाव्य परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या हवाई दलाला तूर्त तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 1:36 am

Web Title: indian air force face shortage of fighter aircraft
Next Stories
1 युतीसाठी १०० कोटी?
2 ‘महाबँके’ला कुणामुळे त्रास?
3 भाजपचे ‘जय भीम’
Just Now!
X