काश्मीरमधील चकमकींचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमालीचे वाढलेले दिसते. या चकमकींमध्ये काही मोठय़ा अधिकाऱ्यांसह जवळपास वीसेक जवान शहीद झाले. त्या रक्तपाताविषयी ऊहापोह ‘अजुनि रक्त मागत उठती..’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या ‘अन्वयार्थ’मध्ये झालेला आहेच. त्यानंतर लगेचच काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्य़ात हिज्बुल मुजाहिदीन या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रियाझ नायकू सुरक्षा दलांशी उडालेल्या चकमकीत ठार झाला. त्या घटनेचे वर्णन ‘हंडवारा घटनेचा बदला’ या शब्दांमध्ये काही युद्धखोर माध्यमांनी केले. ते अनाठायी आणि उथळ आहे. दोन वेळा शौर्याबद्दल सेना पदक मिळवलेले कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज सूद असे अधिकारी हंडवारामधील मोहिमेत शहीद झाले होते. या हानीमुळे सर्वसामान्य जनता हळहळली असेल. पण गणवेशातील व्यक्तीला अशा भावनिक आवेशापासून अलिप्त राहण्याचे प्रशिक्षण मिळालेले असते. सुरक्षा दले – त्यातही काश्मीरमध्ये तैनात असलेले लष्कर, निमलष्करी दले तसेच जम्मू-काश्मीर पोलीस – अशा प्रकारे सुडासाठी मोहिमा आखत नसतात. नायकूसारख्या धोकादायक दहशतवाद्याला संपवण्याची मोहीम काही वर्षे सुरू असते. त्यासाठी त्याचा ठावठिकाणा शोधणे, त्यासाठी स्थानिक जनतेला विश्वासात घेणे, प्रत्यक्ष मोहिमेची आखणी करणे, यात कमीत कमी नागरी मनुष्यहानी होईल यासाठी वेगळे नियोजन करणे असे अनेक टप्पे असतात. अशा सगळ्या खडतर टप्प्यांमधून ही मोहीम जाऊन तिला नायकूच्या परिमार्जनाच्या रूपात यश मिळाले, म्हणून तिचे कौतुक करावे लागते. काश्मीर खोऱ्यात तैनात असलेली, तसेच या मोहिमेत सहभागी झालेली सर्व सुरक्षा दले यांचे याबद्दल अभिनंदन.

‘गणिताचा शिक्षक ते दहशतवादी’ असे रियाझ नायकूचे वर्णन केले गेले. काश्मीरमधील दहशतवादाचा तो स्थानिक चेहरा. २०१६मध्ये हिज्बुलचा आणखी एक म्होरक्या बुरहान वानी मारला गेल्यानंतर त्या संघटनेची सूत्रे रियाझकडे आली. बुरहानने समाजमाध्यमांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला. रियाझ बुरहानइतका वलयांकित नव्हता. पण काश्मिरी तरुणांना चिथावण्याचे काम त्याने बुरहानपेक्षा अधिक वेगाने केले. त्यामुळे तो अधिक घातक बनला होता. सुरक्षा दलांशी दोन हात करून आपलीच हानी अधिक होते, हे कळून चुकल्यामुळे रियाझ नायकूने सर्वसामान्य काश्मिरींना लक्ष्य केले. ‘हे भारतीय लष्कराचे खबरी आहेत’ असे सांगून ग्रामस्थांना क्रूरपणे ठार करणे, त्या हत्येचे चित्रीकरण करून ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसृत करणे हा त्याचा आवडीचा उद्योग. त्यामुळे त्याच्या विषयीची दहशत पंचक्रोशीत पसरलेली होती. याबरोबरीने पोलीस किंवा काही वेळा लष्करी जवानांचे, ते गावी सुट्टीवर आलेले असताना अपहरण करणे आणि त्यांची हत्या करणे हे प्रकार देखील रियाझने सुरू केले. त्यातून त्याचे ‘दहशतमूल्य’ विस्तारत गेले. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतला. यानंतर रियाझने स्थलांतरितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. बाहेरील राज्यांतून आलेले मजूर, फळ व्यापारी, ट्रकचालक यांच्या हत्या करण्याचा नवा पायंडा त्यानेच पाडला. असा हा दहशतवादी अखेरीस खबरींमुळेच सुरक्षा दलांना बेगपुरा गावात सापडला आणि मारला गेला.

रियाझ नायकूचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे न सोपवण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर पोलिसांनी घेतला. येथून पुढे चकमकीत मारल्या गेलेल्यांची नावेही जाहीर न करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. दोन्ही निर्णय स्तुत्य आहेत. काश्मीरविषयक आणखी एक घडामोड म्हणजे, पाकव्याप्त काश्मीर (मुझफ्फराबाद जिल्हा) आणि गिलगिट-बाल्टिस्तान येथील हवामान अंदाज आणि वृत्तही भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) प्रसृत केले जाणार आहे. गिलगिट-बाल्टिस्तान भागात निवडणुका घेण्यास पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने तेथील सरकारला दिलेल्या परवानगीचा हा प्रतिसाद असू शकेल. भारतीय नकाशात हे दोन्ही प्रदेश भारताचा भूभाग म्हणून दाखवले जातात. तेव्हा हवामान अंदाज जाहीर करताना त्यांची दखल घेणे हे आपल्या प्रदीर्घ आणि संसदेचे अधिष्ठान लाभलेल्या धोरणाशी सुसंगतच आहे. आणखीही काही मोजक्या बाबींची दखल घेण्याची गरज यानिमित्ताने उद्धृत करावीशी वाटते. जम्मूू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही भूभागांचा प्रशासकीय मक्ता केंद्राने आपल्या हाती घेतला आहे. या तिन्हींपैकी विशेषत: काश्मीर खोऱ्यात दिल्लीविषयी अजूनही संशयाची आणि भ्रमनिरासाची भावना कायम आहे. तेथील राजकीय नेते आजही अघोषित बंदीवासात आहेत. करोनामुळे देशभर टाळेबंदी असली, तरी काश्मीर खोऱ्यासाठी ती फारच प्रदीर्घ ठरलेली आहे. या अविश्वासाचे निराकरण करण्याबाबतचे केंद्र सरकारचे उत्तरदायित्व आजही कायम आहे. मात्र वचक ठेवणे म्हणजे बेदखल करणे नव्हे. ‘भारताचे अविभाज्य अंग’ यापलीकडे काश्मीरची ओळख प्रस्थापित होणे हा, तेथील विभाजनवादी चळवळींवरील सर्वाधिक प्रभावी उतारा ठरेल. यासाठी चकमकी किंवा एखाद्या रियाझ नायकूचे परिमार्जन आवश्यक असले, तरी पुरेसे नाही.