पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील झोझीला येथे बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करून एका महत्त्वाच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे यात शंका नाही. श्रीनगर ते लेह मार्गावर समुद्रसपाटीपासून ११,५७८ फूट उंचीवरील ही खिंड काश्मीर खोऱ्याला लडाख प्रांताशी जोडते. हिवाळ्यात हा भाग बर्फाच्छादित असल्याने बरेच दिवस काश्मीरचा लडाखशी संपर्क तुटतो. या बोगद्याने काश्मीर खोरे आणि लडाख प्रदेशाचा कायम विनासायास संपर्क राहील. त्याचा जनतेला आणि सैन्यालाही फायदा होईल. हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल तेव्हा त्याचे श्रेय घेण्यास केंद्रात कोणते सरकार असेल हे आताच सांगता येत नाही. पण तत्पूर्वी एका गोष्टीची आठवण करून देणे गरजेचे आहे. लडाखमधील अक्साई चीनचा भाग चीनच्या अनधिकृत नियंत्रणाखाली आहे. आता चीन या प्रदेशात भारताबरोबर वादग्रस्त सीमा नाहीच अशी भूमिका घेत आहे. तेव्हा या मार्गाचे महत्त्व वेगळे सांगावयास नको. अर्थात हे महत्त्व काही आज अचानक प्रकट झालेले नाही. ते १९४७-४८ साली जेव्हा पाकिस्तानने जम्मू-काश्मीर संस्थानावर हल्ला केला तेव्हाच अधोरेखित झाले होते. त्यावेळी पाकिस्तानने गिलगिट-हुंझा-बाल्टिस्तान-स्कार्दू मार्गे कारगिल आणि लेहवरदेखील हल्ला केला होता. झोझीला खिंड पाकिस्तानच्या ताब्यात गेली होती आणि कारगिल व लेह गमावण्याची वेळ आली होती. मात्र भारतीय सैन्याने तेव्हा झोझीला खिंडीत एम-५ स्टुअर्ट रणगाडे नेऊन केलेला जागतिक विक्रम आजही अबाधित आहे. इतक्या उंचीवर रणगाडे आलेले पाहूनच शत्रूचे अवसान गळाले आणि झोझीला, कारगिल आणि लेह भारताच्या ताब्यात राहिले. त्यावेळी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन बायसन’ने पाकिस्तानचे ‘ऑपरेशल स्लेज’ हाणून पाडले होते. अन्यथा लडाखही तेव्हाच पाकव्याप्त काश्मीरचा भाग बनला असता. कारगिल युद्धातही हा मार्ग तोडणे हा पाकिस्तानचा मुख्य हेतू होता. मात्र या रस्त्याचे महत्त्व ओळखून तेथे बारमाही वाहतुकीची सोय करण्यास इतकी वर्षे जावीत यातच आजवरच्या सगळ्या सरकारांचे अपयश आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोदींनी उद्घाटन केलेला किशनगंगा जलविद्युत प्रकल्पही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याने ३३० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. पण त्याहून मोठे संदर्भ त्याला आहेत. झेलम नदी खोऱ्यातील किशनगंगा नदी पुढे पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाहते. पाकिस्तानी तिला नीलम नदी म्हणतात. त्यावर पाकिस्तान नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. किशनगंगा प्रकल्पाने नीलम-झेलम प्रकल्पाचा पाणीपुरवठा कमी होईल अशा भीतिपोटी पाकिस्तानने हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला होता. त्याचा निवाडा भारताच्या बाजूने लागला. आता किशनगंगा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने पाकिस्तानने पुन्हा तक्रारी सुरू केल्या आहेत. भारताने सिंधू नदी पाणीवाटप कराराचे उल्लंघन केल्याचा कांगावा पाकिस्तान करत आहे. मात्र या क्षेत्रातील नद्यांच्या आपल्या वाटय़ाच्या पाण्याचा आजवर भारताने पूर्ण वापर केलाच नव्हता. आता आपण तो करून पाकिस्तानवर दबाव आणत आहोत. युद्धात भूभागावरील नियंत्रणाचे एक तत्त्व आहे – ‘लँड युज आणि लँड डिनायल’. एखाद्या भूभागाचा आपण वापर करणे पण शत्रूला तो नाकारणे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी सैन्याने याच किशनगंगा प्रदेशात भारतीय सैनिकांवर अनेक हल्ले केले आहेत.  पण किशनगंगा प्रकल्प राबवून भारताने हे दाखवून दिले आहे की, त्यांच्या कारवाया भारताला काश्मीरच्या भूमीचा विकासासाठी वापर करून ते नियंत्रित करण्यापासून रोखू शकत नाहीत. हा प्रकल्प काय किंवा झोझी नावाची ही खिंड काय, पुढे मागे पाकिस्तानला खिंडीत पकडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचीच.