07 March 2021

News Flash

लष्करातही भ्रष्टभरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले

भारतीय लष्करात भरती होण्यासाठी द्यावयाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी आल्यावर देशप्रेमापेक्षा अधिक काही असूच शकत नाही, असा दावा करणाऱ्या लष्करातही असे कसे घडू शकते, हा प्रश्न साहजिक असला तरी आता भोळसट ठरणारा आहे. केंद्रीय पातळीवर होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांत असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले, परंतु लष्करातील भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका एक दिवस आधीच हाती येणे, ही घटना खरे तर आश्चर्यकारक नाही. या प्रश्नपत्रिका फुटल्या, त्या क्लासच्या माध्यमातून. गेल्या काही वर्षांत खासगी क्लासचालकांची चलती पाहता, त्यासाठी सरकारी यंत्रणांची मदत होत नसेल, असे मानणे मूर्खपणाचेच ठरावे. अगदी दहावी-बारावीपासून ते लोकसेवा परीक्षांपर्यंत आणि पोलीस भरतीपासून ते लष्कराच्या भरतीपर्यंत सगळय़ा परीक्षांमध्ये हुकमी उत्तीर्ण होण्याचे मार्ग क्लासचालक जाहीरपणे देत असतात. लाखो रुपयांचे शुल्क आकारून नोकरीचीही हमी देणारे हे क्लास आजपर्यंत कधीच सरकारी रडारवर आलेले नाहीत. तो त्यांचा खासगी व्यवसाय आहे, असे म्हणत आजवर त्याकडे काणाडोळा करण्यात आला. प्रश्नपत्रिका आधीच हातात आली, तरी उत्तरे काय लिहायची, यासाठी तरी अभ्यास करावाच लागतो. येथे तर उत्तरपत्रिकाही परीक्षेच्या एक दिवस आधीच लिहून घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्रातील अनेक शहरांत तपासणी केली, तेव्हा सगळीकडेच असे गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी अठरा जणांना अटक करण्यात आली, त्यामध्ये निवृत्त लष्करी जवानाचा आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. लिपिक, स्ट्रॉँगमन आणि ट्रेड्समन ही लष्करातील काही महत्त्वाची पदे नाहीत. तरीही तेथे नोकरी मिळण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असणाऱ्या गरजूंना क्लासचालकांच्या माध्यमातून सर्व सामग्री आयती पुरवली जात असल्याने असा भ्रष्टाचार सुरू होतो. नोकरीची हमी द्यायची तर परीक्षेत उत्तीर्ण होण्याचीही खात्री देणे भाग असते. त्यासाठी प्रश्नपत्रिकाच परीक्षेपूर्वी हाती येणे हे मोठय़ा भ्रष्ट साखळीशिवाय घडणे अशक्यच. देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आला, की सारेच नाजूक होऊन जाते. या खात्याबद्दल जराही वाकडे बोलण्याचा प्रयत्न सुरू होताच राष्ट्रद्रोही ठरवायला सगळेच जण तयार असतात. परंतु तेथेही माणसेच काम करीत असतात आणि तीही अशा भ्रष्टाचाराला सहज बळी पडू शकतात, हे मात्र विसरले जाते. राज्यातील पोलीस भरतीसाठीही लाखाचे शुल्क आकारून नोकरीची हमी देण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. पोलीस, सेनादल, सीमा सुरक्षा दल, राखीव पोलीस बल यांसारख्या ठिकाणी नोकरी हवी असल्यास एक ते पाच लाख रुपयांची व्यवस्था केली की काम फत्ते करून देणारे क्लास राज्यात फोफावत आहेत. त्यामुळेच पेपरफुटीच्या घटना एकटय़ादुकटय़ा मानता येत नाहीत. त्यासाठी भ्रष्टांना अद्दल घडवण्याची स्वतंत्र आणि निष्पक्षपाती व्यवस्था आणि परीक्षेसाठी सतत बदलती आणि विश्वासार्ह यंत्रणा उभी करावी लागते. मागील वर्षी वायुसेनेतील भरतीच्या वेळी पेपरफुटीच्या प्रकाराची चर्चा झाली. त्यानंतर कुणावर काय कारवाई झाली, हे कधीच उजेडात आले नाही. परिणामी, पुन्हा नव्याने असे उद्योग करण्याचे बळ घेऊन भ्रष्टाचाराची नवी साखळी तयार होते. हे प्रकार सर्वच परीक्षांबाबत थांबवायचे असतील, तर भ्रष्टांची साखळी तोडण्याशिवाय पर्याय नाही. असे करण्यासाठी हितसंबंधांना तिलांजली देण्याची तयारी हवी. अन्यथा क्लासचालकांच्या मदतीने एकेका नोकरीसाठी पाच-पाच लाख रुपये घेऊन अनेक जण रांगेत उभेच असतीलच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:33 am

Web Title: indian army indian army recruitment paper leaked
Next Stories
1 सत्ताकारणात विद्यार्थी-संघटना
2 अवमानाचा अडसर
3 युद्ध नावाचा बाजार
Just Now!
X