27 May 2020

News Flash

असुरक्षित लंडन, अस्वस्थ युरोप

लंडन पुलावर शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.

(संग्रहित छायाचित्र)

 

लंडनमध्ये भरदिवसा भररस्त्यात शुक्रवारी झालेला चाकूहल्ला, हे शहर सर्वसामान्य नागरिकांसाठी, परदेशी पर्यटक, क्रीडापटू आणि नोकरदारांसाठी अजूनही असुरक्षित ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा ठरला. हा हल्ला दहशतवादी स्वरूपाचाच असल्याच्या निष्कर्षांप्रत लंडनचे मेट्रोपोलिटन पोलीस पोहोचले आहेत. अलीकडच्या काळात पॅरिस, ब्रसेल्स, लंडन या शहरांमध्ये असे हल्ले वारंवार होताना दिसतात. नेदरलँड्स, जर्मनी, नॉर्वे, चेक प्रजासत्ताक हे देशही अधूनमधून लक्ष्य ठरू लागले आहेत. युरोपातील बहुतेक देशांच्या विस्कटलेल्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक, धार्मिक आणि राजकीय स्वास्थ्याचा हा एक परिपाक आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये अतिरेकी आणि आत्ममग्न राष्ट्रवादाचे वारे या दशकाच्या सुरुवातीपासून वाहू लागले. त्यातून अनेक देशांमध्ये ‘आम्ही, आमच्याच वंशाचे, आमच्याच वर्णाचे, आमच्याच धर्माचे, आमचीच भाषा बोलणाऱ्यांसाठी हा देश आहे; बाकीच्यांनी एक तर निघून जावे किंवा येऊच नये,’ अशा स्वरूपाच्या संकुचित आणि एकसुरी भूमिकेला लोकाश्रय आणि राजकीय अधिष्ठान मिळू लागले आहे. या व्यापक मुद्दय़ाला स्पर्श करण्यापूर्वी सुरुवातीस थोडेसे लंडनमधील हल्ल्याविषयी.

लंडन पुलावर शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या पुलाच्या एका बाजूस फिशमाँगर हॉल सभागृह आहे. या सभागृहात कैद्यांच्या पुनर्वसनासंबंधी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचा समन्वयक होता जॅक मेरिट. कायदा विषयाचा पदव्युत्तर विद्यार्थी. या सत्रात सहभागी झाला होता उस्मान खान हा २८ वर्षीय माजी कैदी आणि सूचिबद्ध दहशतवादी. लंडन शेअर बाजार आणि काही मद्यगृहांवर दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याप्रकरणी उस्मान खानला १६ वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. गेल्या वर्षी सशर्त परवान्यावर त्याला सोडण्यात आले. शुक्रवारच्या चर्चासत्रात इतर कैद्यांबरोबर तोही सहभागी झाला होता, पण पुनर्वसित होण्याचा त्याचा कोणताही मानस नसावा. कारण सत्र सुरू झाल्यानंतर त्याने चाकू उगारून दिसेल त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. त्याचा पहिला बळी ठरला जॅक मेरिट! आणखी एका महिलेलाही त्याने ठार केले. एव्हाना सभागृहात गोंधळ उडाला आणि उस्मानला रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले. तरी सभागृहाबाहेर पळताना त्याचे वार सुरूच होते, ज्यात आणखी तिघे जण जखमी झाले. उस्मान लंडन पुलावर आला त्यावेळी काही जण स्वत:च्या जिवाची पर्वा न करता केवळ उस्मानला आवरण्यासाठी त्याच्या मागे धावले. त्यांनी हाताला लागेल ती वस्तू घेऊन उस्मानवर प्रतिहल्ला केला. तोपर्यंत पोलीसही आले आणि त्यांनी उस्मानला ठार केले. काही जिगरबाजांच्या धाडसामुळे आणि लंडन पोलिसांच्या तत्परतेमुळे या घटनेत मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेतून काही प्रश्नही उपस्थित होतात.

उस्मान खानचे अनेक जिहादी गटांशी संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. ब्रिटनमधील जिहादी विचारांच्या तरुणांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवणाऱ्या गटात उस्मान सक्रिय होता. इतकी धोकादायक पाश्र्वभूमी असलेल्या उस्मानसारख्या जिहादीला बाहेर वावरण्याचा परवाना मिळाला कसा, हा पहिला प्रश्न. त्याच्या पुनर्वसनाच्या उदात्त हेतूनेच परवासारखी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. उस्मानसारख्या नामचीन गुन्हेगारांना बोलवायचेच होते, तर किमान ते नि:शस्त्र आहेत याची तरी खातरजमा करून घ्यायला हवी होती. त्या आघाडीवर अक्षम्य ढिलाई दिसून आली. प्रतिक्रियात्मक कारवाईमध्ये सफाई दाखवणाऱ्या लंडन पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये तितकी तत्परता दाखवली नाही. लंडनमध्ये या महिन्याच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्याविषयीचा धोक्याचा इशारा मागे घेण्यात आला होता. संशयास्पद हालचाली गेले काही महिने आढळल्या नाहीत, असे कारण यासाठी दिले गेले. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूप बदलते आहे. गर्दीच्या ठिकाणी चाकूहल्ले करणे, गर्दीवर वेगात वाहने घेऊन जाणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातही जीवितहानी होतेच. असे हल्ले रोखण्याची तयारी फारशी दिसून येत नाही.

लंडन हल्ल्यानंतर सत्तारूढ हुजूर आणि विरोधी मजूर पक्षाच्या नेत्यांनी या मुद्दय़ाचे राजकारण केलेच. असे राजकारण करणे हा जगभरच्या राष्ट्राभिमुख नेत्यांचा एककलमी अजेंडाच ठरू पाहत आहे. युरोपमध्ये ही सवय अधिक वेगाने आणि विस्ताराने मुरते आहे. समता, बंधुता, स्वीकार आणि स्वातंत्र्य ही मूल्ये जगाला देणाऱ्या या खंडात याच मूल्यांवर सर्वाधिक आक्षेप घेतला जात आहे. हे करताना आशियाई व आफ्रिकी निर्वासितांविरोधात जनमत कलुषित केले जात आहे. या गढुळलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा इस्लामी जिहादी उचलतात. कारण अन्याय हे सर्वाधिक नशा आणणारे टॉनिक सध्याच्या मंदीग्रस्त नि प्रदूषित वातावरणात फारच प्रभावीपणे वापरायला ते अनुभवातून शिकले आहेत. त्यामुळे जोवर विभाजनवादी राजकारण जिवंत आहे, तोवर दहशतवादी हल्ले होतच राहणार. ओसामा किंवा बगदादी मरूनही ते थांबणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 12:03 am

Web Title: insecure london restless europe abn 97
Next Stories
1 पक्षातूनच हकालपट्टी का नाही?
2 थकीत कर्जाचा ‘मुद्रा’राक्षस
3 अखेर शिक्षा.. पण कुणाला?
Just Now!
X