युरोपात अनेक देशांमध्ये सार्वत्रिक प्रतिगामी वारे वाहत असताना, आर्यलडसारख्या तुलनेने कर्मठ आणि मागास मानल्या गेलेल्या देशाने गर्भपातास मान्यता देणारा प्रगतिशील कौल बहुसंख्येने दिल्यामुळे अभ्यासकांमध्ये एकाच वेळी आश्चर्य आणि समाधानाची संमिश्र भावना उमटणे स्वाभाविक आहे. आयरिश जनतेच्या या ऐतिहासिक निर्णयाला भारतीय संदर्भ आहेत. सविता हलप्पानावार या मूळ बेळगावातील दंतचिकित्सक तरुणीचा २०१२ मध्ये आर्यलडची राजधानी डब्लिनमध्ये गर्भपात नाकारला गेल्याने मृत्यू झाला होता. जंतुसंसर्गामुळे तिच्यासाठी गर्भपात करवून घेणे अत्यावश्यक बनले होते. पण संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयरिश राज्यघटनेतील गर्भपातविरोधी घटनादुरुस्तीचा आधार घेत आणि गर्भाच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे कारण देत गर्भपात नाकारला. या घटनेनंतर त्या देशात संताप आणि सहानुभूतीची लाट उसळली होती. आयरिश राज्यघटनेत १९८३ मध्ये करण्यात आलेल्या आठव्या दुरुस्तीनुसार, गर्भाला गर्भवती मातेइतकाच जगण्याचा हक्क प्रदान केला गेला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गर्भपातावर संपूर्णपणे बंदी घातली गेली, ती कठोरपणे अमलातही येऊ लागली. सविताच्या मृत्यूनंतर आठवी घटनादुरुस्ती चर्चा आणि वादाच्या केंद्रस्थानी आली. ती रद्द करण्यासाठीच गेल्या आठवडय़ात आर्यलडमध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात ६६ टक्के मतदारांनी सकारात्मक म्हणजे घटनादुरुस्ती रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला. सुरुवातीच्या जनमत चाचण्यांमध्ये फार तर ५० टक्के नागरिक सकारात्मक कौल देतील, पण ग्रामीण भागांतील आणि वयस्कर मतदार बहुधा विरोधी मतदान करतील असा अंदाज व्यक्त झाला. जनमत चाचण्यांमध्ये भाग न घेतलेले आणि संदिग्ध मन:स्थितीतील मतदार ऐन वेळी घात करतील, अशीही भीती गर्भपात समर्थक संघटनांना वाटत होती. ती पूर्णपणे अनाठायी ठरली. आर्यलडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांची भूमिकाही या सार्वमताच्या बाबतीत निर्णायक ठरली. त्यांच्या सरकारने घटनादुरुस्ती रद्द करण्यासाठी जनमत निर्माण करण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. वराडकर हे बदलत्या आयरिश मानसिकतेचे प्रतीक ठरतात. मिश्रवर्णीय आणि जाहीर समलिंगी असूनही ते आर्यलडसारख्या कॅथलिकबहुल राष्ट्राचे पंतप्रधान बनू शकले. अशा प्रगतिशील बदलांच्या वातावरणात गर्भपाताला विरोध करणारी आठवी घटनादुरुस्ती हे ठसठसणारे गळू होते. विशेष म्हणजे १९८३ मध्ये जवळपास इतक्याच मताधिक्याने ही दुरुस्ती सार्वमताद्वारे मंजूर झाली होती. या घटनादुरुस्तीद्वारे गर्भाला जगण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे तेथील सर्व न्यायालयांनी सर्व प्रकारच्या गर्भपात शस्त्रक्रियांना मज्जाव केला. त्यामुळे बलात्कारातून उद्भवलेली गर्भधारणा, परिचितांकडून होणारे अत्याचार, गर्भात सुरुवातीलाच उद्भवलेला दुर्धर आजार किंवा शारीरिक व्यंग आणि काही बाबतींत गर्भवतीच्या जीविताला निर्माण झालेला धोका अशी सबळ कारणेही गर्भपातासाठी पुरेशी ठरू शकत नव्हती. त्यातून सवितासारख्या अनेक गर्भवतींचे जीव हकनाक गेले. अनेक महिलांनी ऑनलाइन औषधे मागवून चोरून गर्भपात केले. शेकडो महिलांना गर्भपातासाठी आर्यलडबाहेर जावे लागले. सुरुवातीला त्याचीही परवानगी नव्हती. गर्भपातास परवानगीसाठी आत्महत्येची शक्यता गृहीत धरता येणार नाही, असाही अजब निर्णय एकदा तेथील न्यायालयाने दिला होता. अनेक आत्महत्या अनैच्छिक गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करता येणार नाही या भावनेतून झाल्याचे सिद्ध होऊनही न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा उदासीन राहिली. पण गेल्या ३५ वर्षांमध्ये स्वयंसेवी सामाजिक चळवळींनी जनमत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सविताचा दुर्दैवी मृत्यू आठव्या घटनादुरुस्तीविरोधात जनस्फोटासाठी मुख्य ठिणगी ठरली. विजयाच्या जल्लोषातही तिच्या मृत्यूचे भान आयरिश जनतेने ठेवले, हे तिच्या परिपक्वतेचे आणखी एक लक्षण.