देशातले सर्वात जुने विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपली २०१५-१६ या गतवर्षीची शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन, अशी मिळून चार सवरेत्कृष्ट महाविद्यालये सालाबादप्रमाणे घोषित केली. एरवी मुंबई म्हटले की अनेक नामांकित महाविद्यालयांची नावे समोर येतात, त्या कल्पनेला या निकालाने धक्का बसला.. दक्षिण मुंबईतली ‘महर्षी दयानंद (एमडी)’ आणि ‘जयहिंद’ ही नागरी तोंडवळा म्हणून शहरातली, तर पनवेलचे ‘पिल्लई’ आणि तलासरीतले परुळेकर ही ग्रामीण भागातील दोन महाविद्यालये सवरेत्कृष्ट किताबाची मानकरी ठरली. त्यातही एमडी / जयहिंद या तुलनेत फारशी चर्चा नसलेल्या महाविद्यालयांवर थेट सवरेत्कृष्टतेची मोहोर उमटल्यामुळे मुंबई विद्यापीठात गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण क्रांतीचे वारे वाहू लागले आहेत की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा. अर्थात एवढय़ा नामांकित विद्यापीठाच्या पुरस्काराकरिता निवड झाली म्हणजे नॅकचे मानांकन, निकाल, नवे अभ्यासक्रम, विद्यापीठाची देणी, सांस्कृतिक उपक्रम, शिक्षकांची कामगिरी, संशोधन, क्रीडा, कार्यशाळा-परिसंवाद अशा कसोटय़ांवर ही महाविद्यालये उतरली असावीत म्हणूनच. तर यावर जयहिंद या अल्पसंख्याक दर्जा असलेल्या महाविद्यालयाला स्वतचे स्वतंत्र मोकळे कॅम्पसही कसे नाही, असा प्रश्न विद्यार्थी संघटनावाले करतात. विद्यार्थ्यांचे कामच असते मुळी प्रश्न विचारण्याचे. अर्थात यावर ‘कॅरम, बुद्धिबळ यांसारखे बैठे खेळ हे ‘खेळ’ नसतात का?’ असा प्रश्नकर्त्यांलाच निरुत्तर करणारा प्रतिप्रश्न करता येऊ शकतो. पण, तरीसुद्धा शंका राहतेच. त्याची सुरुवात होते ती, ही स्पर्धा किती मोठी होती यापासून. विद्यापीठाच्या ७४८ संलग्नित महाविद्यालयांतून  या पुरस्कारांकरिता अर्ज आले तेच मुळी केवळ अठरा. त्यातली शहरातील महाविद्यालये होती १५. ग्रामीण महाविद्यालये तर इन मीन तीनच; त्यांपैकी दोन उत्कृष्ट! एरवी महाविद्यालये वाढली म्हणून परीक्षेच्या कामाखाली हे जुने बापुडे विद्यापीठ अगदी पिचून जाते. तुलनेत सवरेत्कृष्टतेच्या शोधाची ही स्पर्धा सोपी नाही का? ७४८ पैकी अडीच टक्क्यांनीच या स्पर्धेत उतरण्यात रस दाखविल्याने अमुक या महाविद्यालयाकडे काही निराळा अभ्यासक्रम आहे किंवा त्यांचे खेळातले वा सांस्कृतिक क्षेत्रातले योगदान अधिक चांगले आहे, असा चर्चेचा काथ्याकूटही निवड समितीच्या स्तरावर झाला असेल का, अशी शंका रास्त ठरावी. भारतातील शिक्षण क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून ज्याची ओळख करून देता येईल अशा विद्यापीठाच्या पुरस्कारांबाबत महाविद्यालयांचा हा निरुत्साह पाहता मुळात तो यंदा घोषित केलाच कशाला, असा प्रश्न पडतो. या स्पर्धेत महाविद्यालये रस दाखवत नसतील तर त्याला अनेक बाबी जबाबदार आहेत. विद्यापीठाची देणी थकलेली असणे, पर्यावरणीय, शैक्षणिक लेखापरीक्षण नसणे, नॅकचे मानांकन नसणे, संस्थाचालकांची भूमिका अशी अनेक कारणे या निरुत्साहामागे असू शकतील. विद्यापीठाप्रमाणेच महाविद्यालयेही सध्या वेगवेगळ्या कामाच्या ओझ्याखाली इतकी दबून गेली आहेत की पुरस्कारासाठीचे सोपस्कार पार पाडण्याइतकी फुरसतही अनेकांकडे नाही. अनेक महाविद्यालयांची प्राचार्यपदे रिक्त आहेत, अध्यापकांच्या जागा भरलेल्या नाहीत. स्वयंअर्थसाहाय्यित नावाने जे काही नवे अभ्यासक्रम चालविले जात आहेत, त्यांची काळजी वाहायला अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी नाहीत. पण, ही कारणे असली म्हणून वासरांचीच स्पर्धा लावण्याचे काही कारण नाही. किमान पुरस्काराचा दर्जा टिकविण्याकरिता व तो उत्तरोत्तर वाढविण्याकरिता तरी अशी भूमिका या जुन्या व अनुभवी विद्यापीठाने घ्यायला काहीच हरकत नाही. विद्यापीठाचे देशातील स्थान आणि नाव पाहता त्यावर कुणी आक्षेपही घेतला नसता. किमान भविष्यात तरी आपल्या पुरस्काराचा दर्जा टिकविण्याकरिता मुंबई विद्यापीठाने अशी भूमिका घ्यायला हवी. अन्यथा महाविद्यालयांकरिता हा पुरस्कार ‘नेमेचि येतो..’प्रमाणे होऊन जाईल.