28 February 2021

News Flash

भाजपच्या सापळ्यात..

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागा भाजपने जिंकल्या तेव्हापासूनच ममतादीदींच्या पायाखालची वाळू सरकू लागली.

(संग्रहित छायाचित्र)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षी होणार असल्या तरी पश्चिम बंगाल निवडणुकीचे पडघम कधीच वाजू लागले आहेत. या राज्याची निवडणूक ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठी अटीतटीचीच लढत. या निवडणुकीत भाजपने बंगाली अस्मिता आणि धर्माच्या मुद्दय़ाचा आधार घेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच, असा निर्धार केला आहे. राजकारणात संयम हा गुण हा फार महत्त्वाचा असतो आणि नेमका या गुणाचा ममतादीदींमध्ये अभाव दिसतो. चिडचिड, आदळआपट करण्यापेक्षा या आव्हानाचा राजकीय पातळीवर सामना करणे आवश्यक, पण ते कौशल्य ममतादीदींकडे दिसत नाही. याचा प्रत्यय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीवर्ष प्रारंभानिमित्त कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्येच प्रेक्षकांतून ‘जय श्रीराम’ची जोरदार घोषणाबाजी झाल्यावर आला. या प्रकारानंतर ममता इतक्या खवळल्या की, त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. सरकारी कार्यक्रमात असा अवमान करणे चुकीचे, असे त्यांचे म्हणणे योग्य. पण भाजपने हे पहिल्यांदाच केलेले नाही.. २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर सहा महिन्यांनी झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांपूर्वी अनुक्रमे पृथ्वीराज चव्हाण आणि भूपिंदरसिंग हुड्डा या काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सरकारी-अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देत भाजप समर्थकांकडून अशाच पद्धतीने अपमानित करण्यात आले होते. गेल्या वर्षांच्या अखेरीस झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या प्रचारकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात जो बायडन यांना अवमानकारकरीत्या डिवचले होते. परंतु बायडन यांनी संयम न सोडता, शांतपणे साऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. याउलट ममतादीदींचे वागणे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागा भाजपने जिंकल्या तेव्हापासूनच ममतादीदींच्या पायाखालची वाळू सरकू लागली. मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे आरोप ममतांवर करीत भाजपने हिंदू मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला. काँग्रेस-डाव्या पक्षांची आघाडी, ओवेसी यांचा एमआयएम व मुस्लीम धर्मगुरूंनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाची आघाडी हे सारे भाजपच्या पथ्यावर पडणारे. ‘मां, माटी, मानुष’ ही घोषणा देत ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेला साद घातली आणि दोनदा विधानसभेची निवडणूक जिंकली. याला प्रत्युत्तर म्हणून या वेळी भाजपने बंगाली मतदारांची मने जिंकण्यासाठी सारे बळ पणाला लावले. त्याचाच भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीचा कार्यक्रम केंद्र सरकारकरवी मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात आला आणि पंतप्रधान मोदी या कार्यक्रमानिमित्ताने कोलकात्यात आले. गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अशीच अधिकृत भेट पश्चिम बंगालला दिली आणि गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी स्थापन के लेल्या शांतिनिकेतनच्या विश्व भारती विद्यापीठाला भेट देऊन आदरांजली वाहिली. या साऱ्या गोंधळात ममता बॅनर्जी जेवढा थयथयाट करतील तेवढे भाजपला हवेच आहे. भाजपच्या सापळ्यात त्या हळुवार अडकत चालल्या आहेत. शीघ्रकोपीपणा सोडल्याखेरीज हा सापळा टाळणे ममता यांना कठीण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:02 am

Web Title: jai shri ram slogans raised mamata banerjee shouts in front of pm modi abn 97
Next Stories
1 लॅरी किंग ‘अलाइव्ह’!
2 पन्नाशीचे भान
3 ‘गुपकर’चा खडतर मार्ग
Just Now!
X