अपप्रवृत्तींचे समर्थन, पाठराखण आणि गौरव हा सत्ताकारणाचा आवश्यक भाग बनला, त्याला आता कित्येक वर्षे लोटली. सत्ताधीशांचा भ्रष्टाचार, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, गुन्हेगारांचे राजकीयीकरण या त्याच्याच काही पायऱ्या. त्या चढत चढत आपला देश आता अशा गर्तेत पडला आहे, की या गोष्टींचे आपल्याला काहीही वाटेनासे झाले आहे. एरवी ज्या बाबींना विशेषत्व मिळाले असते त्याच आता सर्वसाधारण बनल्या आहेत. देशात एक नवसाधारणता निर्माण झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची कृती. गोरक्षणाच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची हत्या केल्याप्रकरणातील आठ जणांचा सिन्हा यांनी जाहीर हार्दिक सत्कार केला. तो का केला याचे कारण उघड आहे. सिन्हा आणि त्यांच्या समविचारींच्या दृष्टिकोनातून हे आठ जण म्हणजे धर्मवीर. गोमातेचे ते रक्षणकर्ते. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्वयंघोषित गोरक्षकांचे वाभाडे काढले होते. गोरक्षणाचा कैवार घेतला म्हणजे एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार मिळतो? याला गोरक्षा म्हणायचे? असे सवाल त्या वेळी पंतप्रधानांनी केले होते आणि त्यांचे बोलणे विरलेही नव्हते, तोच झारखंडमधील रामगढमध्ये या आठ जणांनी गोरक्षणाच्या नावाखाली हा खून केला होता. हे जलदगती न्यायालयात सिद्ध झाले. त्यानंतर हे आठ जण उच्च न्यायालयात अपिलात गेले. तेथे त्यांची जामिनावर सुटका झाली. सिन्हा यांच्या मते ते जामिनावर सुटले म्हणजे जणू निर्दोषच ठरले. सिन्हा यांनी त्यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांचा पुष्पमाला घालून सत्कार केला. यात आपण काही विशेष करतो आहोत याची जाणीवही सिन्हा यांना नसावी हे विशेष. त्यांच्या दृष्टीने ती साधारण गोष्ट होती. टीकेनंतर सारवासारव करताना ते म्हणाले, की मी जे काही केले ते कायद्याचा आदर राखूनच केले. ते खरेच आहे. कोणी कोणाचा कशाबद्दल सत्कार करावा याबाबत अजून तरी देशात कोणी कायदा केलेला नाही. त्यामुळे त्याचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु हा युक्तिवाद एखाद्या अर्धशिक्षित गुंड राजकारण्याने केला असता तर तो चालूनही गेला असता. सिन्हा यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि भाजपमधील उदारमतवादी म्हणून गणल्या जाणाऱ्या मंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. याचे कारण हा कायद्याचा नसला, तरी सुसंस्कृततेचा, नैतिकतेचा मुद्दा आहे. हत्या प्रकरणातील आरोपींच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून आपण त्यांच्या कृत्याला जनमान्यता देत आहोत याचे भान सिन्हा यांनी तरी बाळगायला हवे होते. अर्थात याबाबत केवळ त्यांनाच दोष देण्यात अर्थ नाही. समाजमाध्यमातून बलात्काराच्या, खुनाच्या धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे जल्पक हे आपले प्रिय कार्यकर्ते असे मानणारी एक अभद्र राजकीय जमात या देशात जन्माला आलेली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अशा काही हिंस्र जल्पकांना ट्विटरवरून ‘फॉलो’ करत आहेत म्हटल्यावर त्या जल्पकांना राजमान्यताच आहे असे म्हणावे लागते. त्यातून जल्पना हीच एक सर्वसाधारणता बनलेली आहे. हत्या हे त्या जल्पनेचेच पुढचे रूप. आपल्या मुलाने त्याचा गौरव करावा ही बाब भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांना असाधारण वाटली. त्यांनी त्यावरून टीका केली. परंतु अशी टीका हीच आता विशेष बाब ठरली असून, असे टीकाकार राष्ट्रशत्रू ठरत आहेत. हीसुद्धा नवसाधारण स्थितीच. त्यात जगण्याची सवय लावून घ्यायची की ती नाकारायची हाच आता आपल्यापुढील प्रश्न आहे.