28 January 2021

News Flash

गूगलमध्ये कामगारसाद!

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सिलिकॉन व्हॅलीस्थित तंत्रज्ञानाभिमुख कंपन्या या जगभर कामगार किंवा कर्मचारी कल्याणाबाबत आदर्श मानल्या जातात.

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सिलिकॉन व्हॅलीस्थित तंत्रज्ञानाभिमुख कंपन्या या जगभर कामगार किंवा कर्मचारी कल्याणाबाबत आदर्श मानल्या जातात. प्रामुख्याने सुशिक्षित, उच्चशिक्षित अशा येथील कामगारवर्गाला प्रशस्त व सुसज्ज कार्यालये, कार्यालयीन वेळेतच मोफत जेवण, शारीरिक तंदुरुस्तीची साधने वगैरे पूर्णपणे आधुनिक कामगारस्नेही संकल्पना राबवण्यात या भागातील डिजिटल आणि वैयक्तिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर असतात. अल्फाबेट (गूगल), अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन अशा अनेक कंपन्या केवळ त्यांच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठीच नव्हे, तर कामगार धोरणांसाठीही नावाजल्या गेल्या. जगभर त्यांची विभागीय कार्यालये पसरली, त्यांमध्येही कामगारस्नेही संस्कृती जोपासली जाते. त्यामुळेच गूगल कंपनीमध्ये मोजक्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एक छोटी संघटना स्थापल्याचे वृत्त भुवया उंचावणारे ठरते. परंतु तंत्रज्ञान कंपन्यांतील घडामोडींविषयी ज्ञात असलेल्या विश्लेषकांना याचे आश्चर्य वाटलेले नाही. याचे एक प्रमुख कारण सर्वसाधारण कामगार-कंपनी संघर्षांमध्ये दिसून येतो तसा हा फुटकळ वा मोजक्या सुविधांचा किंवा कामगारतासांचा मुद्दा नाहीच. तो आर्थिक नसून तात्त्विक आहे. अमेरिकेतील बडय़ा तंत्रज्ञान कंपन्यांच्या कथित मक्तेदारीजनक धोरणांविषयी आणि खासगी माहितीसाठय़ाच्या गैरवापराविषयी त्या देशात आणि इतरत्रही वातावरण तप्त आहे. या धोरणांविरोधात गूगलसारख्या कंपनीतील कर्मचारीही व्यक्त होऊ लागले आहेत. संघर्षांची पहिली ठिणगी येथेच पडली. गूगलच्या काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या धोरणांबाबत, तसेच लैंगिक छळाची प्रकरणे रोखण्यात (कर्मचाऱ्यांच्या मते) सातत्याने येत असलेल्या अपयशाबाबत मध्यंतरी आवाज उठवला होता. निषेध नोंदवताना निदर्शक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या धोरणांचा भंग केल्याचे सांगत गूगलने त्यांतील काहींना सक्तीच्या प्रशासकीय रजेवर पाठवले, तर काहींना कामावरूनच कमी केले. कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे की, आमच्या गोपनीय माहितीचा (परस्परसंवाद, व्यूहरचना आदी) वापर गूगल व्यवस्थापनाने अवैध प्रकारे केला. बडय़ा कंपन्यांसाठी असे प्रकार फार तापदायक नसतात, कारण कामगार न्यायालय किंवा इतरत्रही कायदेशीर लढे लढत राहण्याची त्यांची ताकद फार मोठी असते. परंतु ही कारवाईच अवैध असल्याचे सांगत गूगलला अमेरिकेच्या कामगार संबंध मंडळाने दणका दिला. त्यांचा अभिप्राय गूगलने अमान्य केला, तरी या घटनेमुळे मोजक्या कामगारांना तेव्हा बळ मिळाले होते. त्यांतीलच बहुतेकांनी एकत्र येऊन आता नवीन संघटना स्थापन केली आहे. अमेरिका आणि कॅनडातील गूगलच्या कार्यालयांतील दोनशेहून अधिक कर्मचारी तिचे सभासद बनले. हा आकडा मोठा नाही. अमेरिकेच्या कामगार कायद्यांनुसार गूगल व्यवस्थापनाला धोरणे बदलायला लावू शकेल, इतकाही तो मोठा नाही. तरीही ही सुरुवात गूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि इतरही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी लक्षणीय म्हणावी लागेल. ‘अल्फाबेट वर्कर्स युनियन’ नामे ही संघटना अमेरिकी दूरसंचार क्षेत्रातील कामगारांच्या संघटनेशी (कम्युनिकेशन वर्कर्स युनियन ऑफ अमेरिका) संलग्न झालेली आहे. धोरणात्मक बदलांसाठी व्यवस्थापनाला भाग पाडता येणार नाही हा आक्षेप संघटनेला मान्य नाही. छोटय़ा दबाव गटांनीच गूगलमध्ये समन्यायी आणि नैतिक व्यवहारांसाठी धोरणात्मक बदल घडवून आणले याकडे ही संघटना लक्ष वेधते. गूगलमध्ये वेतन, भत्ते, कल्याणकारी योजना, इतर लाभांसाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गूगल कशा प्रकारे निर्णय घेते, करार करताना नीतिमत्तेचे पालन करते की नाही याविषयीदेखील आवाज उठवण्याचा संघटनेचा निश्चय आहे. या शेवटच्या मुद्दय़ावर गूगलसारख्या कंपन्या सध्या बचावात्मक पवित्र्यामध्ये आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गूगलमधील कामगारांची ही साद सिलिकॉन व्हॅली आणि अमेरिकेच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचू लागली आहे. तिला प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो, यावर गूगलसारख्याच इतरही कंपन्यांच्या वाटचालीला वेगळे वळण मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 1:22 am

Web Title: jobs in google mppg 94
Next Stories
1 वाघांसाठी (अ)भयारण्य..
2 शुभारंभी हवे भान!
3 विचार करण्याची ‘संधी’..
Just Now!
X