मोहसीन फखरीझदे हे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ आणि इराणी क्रांतिरक्षक सेनेत- रिव्होल्यूशनरी गार्डमध्ये- जनरल हा हुद्दा त्यांना देण्यात आला होता. त्यांची हत्या परवाच्या शुक्रवारी घडविण्यात आली. मुळात इराणचा अख्खा अणुकार्यक्रमच, बदनाम पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांनी १९९४ साली चोरून विकलेला आहे, हे भारतीयांना आठवत असेलच. तेव्हा इराण म्हणतो किंवा काही पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे म्हणतात म्हणून फखरीझदे यांना इराणच्या अणुकार्यक्रमाचे जनक वा उद्गाते वगैरे मानण्यात अर्थ नाही. पण या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप इराणने केलेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, तो जगभरच्या अनेक देशांमधील अनेक तज्ज्ञ विश्लेषकांना पटलाही आहे. एक प्रकारे, इराणला विश्वासार्ह देश मानूच नये असे जे संयुक्त प्रयत्न इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेली तीन वर्षे चालविले होते, त्या प्रयत्नांना कोणतेही नैतिक यश आलेले दिसत नाही. त्या संयुक्त प्रयत्नांमुळेच भारतासारख्या, अमेरिकेचे मित्रदेश म्हणवून घेण्यास उत्सुक असलेल्या देशांनी इराणशी उरलासुरला व्यापारही थांबवला हे खरे आणि ते या प्रयत्नांचे व्यावहारिक यशही म्हणता येईल. परंतु इराणी अणुशास्त्रज्ञाच्या हत्येमागे इस्रायलच असणार, हा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ यांनी करावा आणि विश्लेषकांनीही तसेच म्हणावे, इतकेच नव्हे तर इस्रायलचा वचपा काढू असे इराणने म्हणताच हा वचपा कसकशा प्रकारे काढला जाऊ शकतो याचीही चर्चा या विश्लेषकांत सुरू होणे, हे तर त्या प्रयत्नांचा कोणताही नैतिक प्रभाव न दिसल्याचेच लक्षण. तो नाही, याचे कारण यापूर्वी गेल्या १३ वर्षांत इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित सहा जणांच्या हत्या झालेल्या आहेत आणि त्या साऱ्या हत्या इस्रायलने घडवल्या, या संशयाला अभ्यासक व तज्ज्ञांच्या मते भरपूर जागा आहे. अमेरिकेत बराक ओबामांची अध्यक्षीय कारकीर्द सुरू असताना त्यांनी अण्वस्त्रसज्ज असू शकणाऱ्या इराणला चुचकारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर तुमचा अणुकार्यक्रम फक्त शांततेसाठीच आहे म्हणता तर दाखवा तरी तुमची संशोधन केंद्रे जगाला, मग करू की आम्ही तुमच्याशी व्यापारी करार.. अशा सुरात ओबामांनी इराणसारख्या पुंडप्रवृत्ती देशाला वाटाघाटींच्या मेजावर आणले.

ही केंद्रे दाखवण्याचे काम २०१५ मध्ये ज्या मोहसीन फखरीझदे यांनी केले होते, त्यांची आता हत्या झाली; पण त्याआधीच, २०१८ च्या जानेवारीत इराणच्या अणुकार्यक्रमाविषयीची कागदपत्रे चोरीला गेली आणि त्यांपैकी काही प्रकटली थेट इस्रायलमध्ये! ‘इराण खोटे बोलतो आहे’ असा सज्जड आरोप करणारे सचित्र भाषण नेतान्याहूंनी केले. यातली चित्रे म्हणजे त्या इराणी कागदपत्रांची छायाचित्रे होती. इराणने संहारक अण्वस्त्रे विकसित करण्याचा वा बनवण्याचा कार्यक्रम करारानुसार बंद करायला हवा होता, तसे झालेलेच नाही हा नेतान्याहूंचा प्रमुख आरोप. त्यावर लगोलग ट्रम्प यांनी विश्वास ठेवला आणि प्रसंगी इराणमध्ये आर्थिक हितसंबंध असलेल्या फ्रान्स, जर्मनी आदी युरोपीय देशांना वाऱ्यावर सोडून इराणवर र्निबध घालायचेच हे ठरवून टाकले. र्निबध जेव्हा अमेरिकेपुरते कायम होते, तेव्हा भारताने डॉलर टाळून रुपयांत व्यवहार करण्याचा मार्ग शोधला होता. पण आपल्या ट्रम्पमैत्रीमुळे आपण तोही अलीकडेच बंद केला. इराणला एकटे पाडायचेच, यासाठी ट्रम्प घायकुतीला आल्याचे दिसले. नेतान्याहूंची साथ या कामी होतीच; पण चीन आणि इराणचे वाढते संबंध हे आपल्या कृतीमागचे प्रमुख कारण आहे की तो आपल्या नीतीचा प्रमुख परिणाम आहे, हे ठरवण्याएवढी उसंतही ट्रम्प यांना नव्हती.

खुर्ची जाणारच, हे माहीत झाल्यानंतरही गेल्या आठवडय़ाभरात ट्रम्प प्रशासनाने पश्चिम आशिया व आखाती देशांत काही हालचाली केल्या. ट्रम्प प्रशासनातील मावळते परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ हे आधी इस्रायलला गेले आणि तिथून सौदी अरेबियाला. मात्र सौदीस जाताना पॉम्पेओ यांनी इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनाही आपल्यासहच नेले आणि ही भेट गोपनीय ठेवली गेली, असे इस्रायलीच नव्हे तर पाश्चात्त्य पत्रकारही म्हणताहेत. ही भेट घडत असतानाच, अराम्को या महत्त्वाच्या तेल कंपनीचा जेद्दा शहराजवळील प्रकल्प हल्लाग्रस्त ठरला आणि तो हल्ला येमेनच्या हूथी बंडखोरांनी घडवून आणल्याचे सांगण्यात आले. या हूथी बंडखोरांना इराणची फूस आहे असे अमेरिकेचे म्हणणे; तर इस्रायलनेच इराणवर आळ येणे आणि सौदी राजघराण्याला इस्रायल व अमेरिकेशी मैत्रीची महती पटणे या हेतूंसाठी हे हीन कृत्य केल्याचे इराणी प्रसारमाध्यमांचे म्हणणे. त्यानंतर मोहसीन फखरीझदे यांची हत्या. थोडक्यात, इराण चिथावला गेलाच पाहिजे आणि शिया पंथीय इराणविषयीचा सौदी अडेलपणाही अधिकच वाढला पाहिजे, अशी नेपथ्यरचना किंवा मंचसज्जा ट्रम्प यांनी जाता जाता बायडेन यांच्यासाठी करून ठेवली आहे. बायडेन हे मुरलेले डेमोक्रॅट नेते असल्याने ते या गाठी सोडवतील, पण तोवर भारताने कोणतीही प्रतिक्रिया न देणेच रास्त ठरेल.