27 May 2020

News Flash

हितसंबंधांचा बागुलबुवा

माजी क्रिकेटपटू शांता रंगस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी याच कारणास्तव राजीनामा दिला

भारताचे महान क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते कर्णधार कपिलदेव यांनी ‘परस्परविरोधी हितसंबंधांच्या’ मुद्दय़ावरून बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला. आता या समितीत अंशुमन गायकवाड हे एकमेव सदस्य उरले आहेत. कारण आणखी एक सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शांता रंगस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी याच कारणास्तव राजीनामा दिला. कपिलदेव, शांता रंगस्वामी किंवा त्यांच्याआधी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण या क्रिकेटपटूंच्या क्रिकेटविषयक शहाणिवांविषयी किंवा निष्ठेविषयी कोणाच्याही मनात संदेह असण्याचे कारण नाही. अशा वेळी त्यांना दुहेरी हितसंबंध किंवा परस्परविरोधी हितसंबंधांच्या तांत्रिक मुद्दय़ावरून खुलासे करायला लावणे खरोखरच आवश्यक आहे का, हे तपासण्याची वेळ आली आहे. या मंडळींनी सारा वेळ केवळ बीसीसीआयच्या पदांसाठीच द्यावा आणि असे पद मिळेपर्यंत रिकामटेकडे बसून राहावे, अशी बोर्डाचे नीतिमूल्य अधिकारी डी. के. जैन यांची अपेक्षा आहे काय? क्रिकेट हा सरकारी नोकरीसारखा तीस-पस्तीस वर्षे गुंतवून ठेवणारा व्यवसाय नाही. निवृत्त झाल्यानंतर पोटापाण्याची इतर सोय बघावीच लागते. हा झाला एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, या बहुतेक मंडळींनी काही तरी नैपुण्य मिळवले म्हणूनच त्यांची जबाबदारीच्या पदांवर नेमणूक होते ना? त्यांचे हितसंबंध नियुक्तीच्या आड येत असतील तर मुळात ती करण्याचे कारणच काय? आजच्या घडीला सचिन किंवा कपिलदेव किंवा शांता रंगस्वामी हे नेमके काय करत आहेत याची माहिती मिळवणे अवघड निश्चितच नाही. तरीदेखील प्रथम बीसीसीआयची प्रशासकीय समिती अशा व्यक्तींची नियुक्ती करते आणि नंतर नीतिमूल्य अधिकारी त्यांना हितसंबंधांबाबत खुलासे पाठवत राहतात. गेली पाचेक वर्षे न्या. लोढा समितीच्या निर्देशांबरहुकूम बीसीसीआयचा कारभार विनोद राय, डायना एडल्जी आणि आणखी एक सदस्य यांच्यामार्फत चालवला जातो. बीसीसीआयमधील परस्पर वाद आणि हेवेदावे यांची जागा आता राय आणि एडल्जी यांच्यातील मतभेदांनी घेतलेली आहे. ज्या हंगामी क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षक रवी शास्त्री, महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांची नियुक्ती केली, तशा प्रकारच्या हंगामी समितीची बीसीसीआयच्या घटनेतच तरतूद नाही, असे एडल्जी यांचे म्हणणे होते! आता डी. के. जैन यांनी कपिलदेव प्रभृतींवर परस्परविरोधी हितसंबंधांचा ठपका ठेवलाच, तर या समितीने केलेल्या शास्त्री आणि रामन यांच्या नियुक्त्याही बाद ठरतात. या गोंधळाला ज्या व्यक्तीमुळे सुरुवात झाली, त्या व्यक्तीचे नाव संजीव गुप्ता. इंदूरस्थित या संजीव गुप्तांनी प्रशासकीय समितीला आतापर्यंत ४००हून अधिक ई-मेल पाठवलेले आहेत. ते उद्योजक आहेत आणि मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे तहहयात सदस्य आहेत. लोढा समितीच्या शिफारशी  लागू होतात की नाही हे पाहण्याचे बहुधा त्यांचे जीवितकार्य असावे! हितसंबंधांच्या मुद्दय़ावर जागरूक राहणे आणि जागृती करणे योग्यच. परंतु हे जे कोणी गुप्ता आहेत त्यांच्या ई-मेल भडिमारामुळे भारतीय क्रिकेट पुढे सरकते आहे का, याचे उत्तर सध्या तरी नेमके देता येत नाही. कायद्याचा बडगा नि कायद्याची आडकाठी यांच्यातील फरक श्रीयुत गुप्ता यांना कळलेला नसावा. पुन्हा हे सगळे होत असताना तिकडे निरंजन शहा यांचे चिरंजीव, नारायणमूर्ती श्रीनिवासन यांच्या कन्या, अनुराग ठाकूर यांचे बंधू बिनविरोध त्यांच्या-त्यांच्या क्रिकेट संघटनेवर निवडून आणले जातात. ज्यांना क्रिकेट व्यवस्थेची स्वच्छता करण्याची इतकी चाड आहे, त्यांना ही बेबंद घराणेशाही दिसत नाही, हे विचित्रच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 2:58 am

Web Title: kapil dev resigns as cricket advisory committee chairman zws 70
Next Stories
1 दिरंगाईचा फटका
2 धक्कादायक आणि धोकादायक
3 कोचीचा धडा
Just Now!
X