एक सामान्य, कायदाप्रेमी, निधर्मी राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून टिकणे दिवसेंदिवस किती कठीण होत चालले आहे, याचा प्रत्यय रोजच या ना त्या निमित्ताने येत असून, त्याला कारणीभूत आपल्या हातातील समाजमाध्यमे असणे हे अत्यंत भयंकर आहे. आधी ‘पद्मावत’चा वाद व  हिंसाचार आणि आता उत्तर प्रदेशात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली दंगलस्थिती.. या दोन्ही घटनांनी समाजमाध्यमांचा वापर किती विखारीपणे केला जातो हे दाखवून दिले आहे. हा विखार विशिष्ट प्रोपगंडाचा भाग असून, त्याचा हेतू येथील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात द्वेषाचे बीजारोपण करणे हाच आहे. आपणास त्यापासून वाचायचे असेल, तर हे प्रकरण आणि त्यामागे कार्यरत असलेल्या शक्ती हे सर्व नीट समजून घेणे आवश्यक आहे. ‘पद्मावत’निमित्ताने देशभरात घातला गेलेला हिंसेचा हैदोस आपण सर्वानीच पाहिला. त्यातील एक प्रकरण घडले हरयाणातील गुरुग्राममध्ये. तेथे करनी सेनेच्या काही राजपूत वीरांनी शालेय बसवर दगडफेक करून आपल्या शौर्याचे प्रदर्शन घडविले. त्याची चित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातून करनी सेनेची आणि त्यामागील हिंदुत्ववादी फौजेची लायकीच काढली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या घटनेला मोठय़ा हुशारीने वेगळा रंग देण्यात आला. अनेकांच्या मोबाइलवर एक संदेश झळकला. त्यात दोन मुद्दे होते. एक म्हणजे ती दगडफेक करनी सेनेच्या नावाखाली अन्य लोकांनीच केली होती आणि दुसरी बाब म्हणजे ते मुस्लीम होते. हे करणाऱ्यांत मधुपूर्णिमा किश्वर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यां व पत्रकार यांचा समावेश होता हे विशेष. त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून तो संदेश प्रसारित केला होता. किश्वर या सध्या मोदी समर्थक आहेत. त्यांना त्या संदेशातून काय सांगायचे होते हे स्पष्टच आहे. परंतु हरयाणा पोलिसांनीच त्यांच्या हेतूंवर पाणी टाकले. ते गुंड मुस्लीम नव्हते हे त्यांनी लागलीच स्पष्ट केले. त्यामुळे किश्वर यांच्यासारखे अफवा पसरवणारे तोंडावर आपटले. परंतु तेव्हा जो डाव फसला तो कासगंजच्या निमित्ताने पुन्हा मांडण्यात आला. या गावात प्रजासत्ताकदिनी हिंदू-मुस्लीम दंगल उसळली. त्यात एका हिंदू तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. या दंगलीबाबत एका राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीने सुरुवातीला बातम्या दिल्या त्या मुस्लिमांनी तिरंगा फडकावण्यास विरोध केला म्हणून दंगल उसळल्याच्या. ही वाहिनी हिंदुत्ववादाचा झेंडा उचलून धरणारी आणि मोदीवादी म्हणून ओळखली जाते. तिच्या त्या बातम्यांनी अनेक सामान्य हिंदूंच्या मनातही मुस्लिमांच्या देशनिष्ठेबाबत शंका निर्माण झाल्या; परंतु तेथील अब्दुल हमीद चौकात मुस्लीमच तिरंगा फडकावत होते हे एका चित्रफितीतून स्पष्ट झाल्यानंतर प्रोपगंडाचा दुसरा डाव टाकण्यात आला. त्या दंगलीत आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा समाजमाध्यमांतून पसरविण्यात आली. ही पसरविण्यात हात होता अभिजित मजुमदार या पत्रकाराचा. त्याचा तो संदेश तातडीने विविध हिंदुत्ववादी जल्पकांनी आपापल्या खात्यांवरून प्रसिद्ध केला. पण जो तरुण त्या दंगलीत मेला असे सांगण्यात आले, तोच पुढे आला आणि आपण मेलो नाही असे सांगू लागला म्हटल्यावर या अफवेतही प्राण राहिले नाहीत. पण नेहमीच खुलाशांपेक्षा आरोपांचे पारडे जड असते. त्यामुळे अनेकांपर्यंत त्या अफवांमागील सत्य पोहोचलेही नसेल. त्यांच्या दृष्टीने गुरुग्राममध्ये दगडफेक करणाऱ्यांत मुस्लीमच होते, कासगंजमध्ये त्यांनीच दंगल घडवली आणि दोन हिंदूंचा बळी घेतला. या अनेकांमध्ये आपण होतो का? असणे साहजिक आहे. समाजमाध्यमांतील प्रोपगंडाच्या माऱ्यापुढे एक कायदाप्रेमी, निधर्मी राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून टिकणे दिवसेंदिवस कठीणच होत चालले आहे.