01 March 2021

News Flash

आधी उपाय, मग ‘उडान’..

विमानाने पेट घेतला असता तर मनुष्यहानी खूपच अधिक झाली असती.

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला केरळात कोळिकोड येथे शुक्रवारी रात्री झालेल्या अपघाताची चौकशी प्रदीर्घ काळ सुरू राहील. सहसा कोणत्याही विमान अपघाताची चौकशी त्वरित पूर्ण होऊ शकत नाही. घटनाक्रमाचे अनेक धागे जोडावे लागतात. ‘ब्लॅक बॉक्स’मधील फ्लाइट डेटा रेकॉर्र्डरद्वारे विमानाच्या उड्डाणप्रवासाविषयी, तसेच उतरतानाच्या स्थितीविषयी माहिती मिळवावी लागते. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून वैमानिकांच्या संभाषणाविषयी अधिक तपशिलाने समजू शकते. कोळिकोडमध्ये अपघातग्रस्त झालेले विमान दुबईहून ‘वंदे भारत’ मोहिमेअंतर्गत निघाले होते. कोळिकोडच्या करिपूर विमानतळावर हे विमान रात्री तुफानी पावसात उतरण्याच्या दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर पुन्हा उडाले. तिसऱ्या प्रयत्नात धावपट्टीवर खूपच पुढे उतरले, त्यामुळे ईप्सित जागी ते थांबू शकले नाही. धावपट्टी ओलांडून ते मोठय़ा खड्डय़ात कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे, सहवैमानिक अखिलेश कुमार यांच्यासह आणखी १६ जण यात मृत्युमुखी पडले. विमानाने पेट घेतला असता तर मनुष्यहानी खूपच अधिक झाली असती. कोणत्याही विमान प्रवासाचा असा अंत दु:खदच असतो. पण अशा दु:खद विमान दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्नशील आणि सावध राहावे लागते. त्याचप्रमाणे झालेल्या दुर्घटनेची चिकित्साही क्रमप्राप्त ठरते.

मर्यादित पठारी जागेवरील छोटय़ा धावपट्टीचा (टेबलटॉप रनवे) मुद्दा कोळिकोड घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशा प्रकारे दुर्घटना यापूर्वी दहा वर्षांपूर्वी एअर इंडिया एक्स्प्रेसच्याच विमानाला झाली होती. ते विमान मंगळूर विमानतळावर अपघातग्रस्त झाले होते. त्या विमानतळाची धावपट्टीही पठारी भूगोलामुळे छोटी होती. अशा टेबलटॉप धावपट्टय़ांवर विमान उतरवणे ही आव्हानात्मक बाब असते. सहसा छोटय़ा आकाराची विमानेच अशा विमानतळांवर उतरतात. पण मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर पुरेसा घर्षणप्ररोध उपलब्ध नसतो. दृश्यमानता मर्यादित असते. विमानात प्रवासी असल्यामुळे त्याचे वजनही अधिक असते. अशा परिस्थितीत धावपट्टीवर नेमून दिलेल्या जागेवर ते अचूकपणे उतरवणे ही बाब अनुभवी वैमानिकांनाच साधू शकते. मंगळूर अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक झ्लाटको ग्लुसिका हे अतिशय अनुभवी सर्बियन होते. कोळिकोडला कोसळलेल्या विमानाचे वैमानिक कॅप्टन साठे हेही निष्णात आणि अनुभवी होते आणि पूर्वी हवाई दलातही कार्यरत होते. मात्र, अशा प्रकारे सारी भिस्त निव्वळ वैमानिकांच्या कौशल्यावरच सोडून देण्याची ही प्रवृत्ती अजिबात योग्य नाही. अपवादात्मक स्थितीतच वैमानिकांना त्यांचे आणीबाणी हाताळणीचे कौशल्य दाखवता यावे असे अपेक्षित आहे. मंगळूर अपघातानंतरही पठारी धावपट्टय़ांबाबत फार सकारात्मक हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत. कोळिकोडच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, २०१७ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने येथील करीपूर विमानतळाची २७५० मीटर लांबीची धावपट्टी आणखी ८०० मीटरनी वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पण केरळ सरकारने जमीन अधिग्रहणासाठी पुरेशी तत्परता दाखवली नाही. जमिनीची किंमत आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध अशी या ढिलाईमागील दोन कारणे सांगितली गेली. विद्यमान धावपट्टीला लागूनच तीव्र उतार असल्यामुळे, ती वाढवण्यासाठी एखाद्या उड्डाणपुलाचीच गरज होती. पण ती योजना रखडली. परंतु मुद्दा केवळ पठारी धावपट्टय़ांचा नाही. कारण मंगळूर आणि कोळिकोडव्यतिरिक्त मिझोरममधील लेंगपुई विमानतळ, तसेच कुलू, सिमला आणि सिक्कीम येथेही असे विमानतळ आहेत. यापैकी केवळ लेंगपुई विमानतळावरूनच प्रवासी विमान वाहतूक होते. मात्र भारतात अनेक छोटय़ा विमानतळांवरील गंभीर समस्याही पुरेशा तत्परतेने हाताळल्या जात नाहीत. डेहराडूनचा जॉली ग्रँट विमानतळ किंवा आसामचा तेजपूर विमानतळ या ठिकाणी वन्यजीवांचे अधिवास आहेत. आर्थिक उदारीकरणानंतर केरळ, पंजाबमधील काही शहरे, तसेच पुणे, इंदूर या शहरांमध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली आहे. नवी दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, हैदराबाद देशातील चार बडय़ा शहरांच्या विमानतळांची संयुक्त मालकी खासगी आस्थापनांकडे आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजना जाहीर केली. भारतातील सर्व शहरी, तसेच निमशहरी भाग हवाई मार्गानी जोडण्याची ही योजना आहे. हा सारा विकासमान पैस सुरक्षितही तितकाच आहे का, हे तपासण्याची नितांत गरज आहे. भारतातील किती विमानतळांचे सातत्याने सुरक्षा परीक्षण होते, अवैध वस्त्यांमुळे किती विमानतळांना धोका उत्पन्न झाला आहे याचा कोणताही माहितीसंग्रह अस्तित्वात नाही. स्वयंसेवी संघटनाच याविषयी सक्रिय असतात आणि अभ्यासपूर्ण अहवाल सादर करत राहतात. सरकारी समित्याही नेमल्या जातात. पण अशा अहवालांवर अंमलबजावणी करण्याची संस्कृती या देशात नाही. मंगळूर अपघातानंतर एअर मार्शल भूषण गोखले समितीने २०१० मध्ये, तसेच २०११ मध्ये नागरी विमान वाहतूक सुरक्षा सल्लागार मंडळाने कोळिकोड विमानतळाचा ‘संभाव्य दुर्घटना स्थळ’ असा उल्लेख केला होता. हे दोन्ही अहवाल काळाच्या उदरात गडप झाले. त्यांकडे झालेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत आज १८ जणांना हकनाक मोजावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 2:13 am

Web Title: kerala air india flight crash air india plane crash in kerala kerala plane crash zws 70
Next Stories
1 उद्ध्वस्त बैरुत
2 कुचकामी आणि हास्यास्पद
3 उदंड झाल्या लशी..
Just Now!
X