मंगळवारी रात्री बीजिंगच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकात शिरलेल्या एका रेल्वेगाडीने आशिया पॅसिफिक प्रदेशातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पूर्व आशियातील राजकारणाला नवी दिशा देण्याचे मनसुबेही तिने उधळून लावले. या विभागाच्या इतिहासात या गडद हिरव्या रंगाच्या आलिशान रेल्वेगाडीचा प्रवास नक्कीच नोंदला जाईल. याचे कारण त्या गाडीने प्रवास करीत होते उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन. सगळ्या जगाला अंधारात ठेवून त्या रात्री ते बीजिंगला पोचले. तेथे चीनचे सर्वेसर्वा अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट त्यांनी घेतली. हे सर्वच सर्वाना अचंब्यात टाकणारे आहे. जागतिक राजकारणात अस्पृश्य मानल्या गेलेल्या आणि अमेरिकेच्या दृष्टीने तर सैतानी त्रिकोणातील एक कोन असलेल्या उत्तर कोरियाला चीननेही चार हात दूरच ठेवले होते. ही परिस्थिती अगदी या वर्षांच्या सुरुवातीपर्यंत कायम होती. असे असताना अचानक जिनपिंग यांनी किम जाँग उन यांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणे यातून जिनपिंग यांचा चीन कोणत्या दिशेने चालला आहे हेच स्पष्टपणे दिसते. ही दिशा आहे आशिया-पॅसिफिक विभागातील एकाधिकारशाहीच्या प्रस्थापनेची. चीन सातत्याने त्यासाठी प्रयत्नशील असून, किम-क्षी भेट ही त्याच राजकारणातील एक खेळी आहे. या खेळीने ट्रम्प यांची शांततेची कबुतरे उडविण्याची संधी हातातून जाते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. चर्चेच्या टेबलावर आणून उत्तर कोरियाला थंड करण्यासाठी ट्रम्प सध्या उत्सुक आहेत. नाजूक प्रश्नाचा धसमुसळेपणाने विचका करणाऱ्याविषयी इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे. काचसामानाच्या दुकानात घुसलेला बैल असे म्हणतात त्याला. ट्रम्प यांची जागतिक राजकारणातील वर्तणूक ही आजवर अशीच राहिलेली आहे. ती बदलून आपण उत्तर कोरियासारखा आजवर कोणालाही न सोडविता आलेला प्रश्न मुत्सद्देगिरीने सोडविला, हा आपला ‘मोठ्ठा-मोठ्ठा विजय’ असे ट्वीट करावेसे त्यांना सध्या वाटू लागल्यासारखे दिसते. त्यामुळेच कालपर्यंत ते ज्यांना जाहीरपणे शेलक्या शिव्या देत होते, त्याच ‘बुटक्या जाडय़ा’ ‘रॉकेटमॅन’ला भेटण्यासाठी ते आता आतुर आहेत. येत्या शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणारे माइक पॉम्पिओ हे तर उत्तर कोरियात इराकप्रमाणे सत्तांतर केले पाहिजे या मताचे. परंतु आता अर्थातच त्यांच्याही दृष्टीने उत्तर कोरिया हा न सुटणारा प्रश्न राहिलेला नाही. तो सुटेल, कोरियन क्षेत्र (म्हणजे उत्तर कोरियाच, कारण दक्षिण कोरिया हा अमेरिकेच्या पंखाखालचा भाग.) अण्वस्त्रमुक्त होईल असे ट्रम्प यांना वाटण्याचे आजवरचे कारण होते, उत्तर कोरियाच्या मुद्दय़ावरचा चीनचा सोयीस्कर अलिप्ततावाद. बीजिंग स्थानकात शिरलेल्या किम यांच्या रेल्वेगाडीने ते कारणच चिरडून टाकले. जिनपिंग-किम भेटीमुळे सगळीच समीकरणे बदलली. ट्रम्प-किम भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही, परंतु ती होईल तेव्हा त्या चर्चेवर चीनचा अदृश्य प्रभाव असेल, हे आता नक्की झालेले आहे. या भेटीनंतर जिनपिंग यांनी, चीन या प्रश्नासंबंधीच्या चर्चेत रचनात्मक भूमिका बजावेल असे वक्तव्य केले. त्यात त्यांनी आवर्जून ‘सिच्युएशन ऑन द पेनिन्सुला’ असा शब्द वापरला. त्याचा अर्थ चीन हा केवळ उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रमुक्तीचा प्रश्न मानत नसून, त्यात त्यांनी दक्षिण कोरियालाही गृहीत धरलेले आहे असा होतो. उत्तर कोरियाला बळ देणारी अशीच ही भूमिका असून, त्यामुळे ट्रम्प यांच्यापुढील तिढा वाढणार आहे. ट्रम्प यांच्या शांततेची गाडी या तिढय़ावर घसरण्याचीच शक्यता अधिक आहे.