कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सर्व समाजातून न्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत असून, त्या मुलीच्या – छकुलीच्या – मातेने या निकालासाठी सरकार, तपास यंत्रणा, न्यायालय याचबरोबर समाजाचेही आभार मानले आहेत ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. या खटल्याच्या निकालाचे विविध प्रकारे विश्लेषण केले जाईल. यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली असल्यामुळे हे प्रकरण आता वरच्या न्यायालयातही जाईल. मात्र त्या गदारोळात छकुलीच्या मातेचे ते उद्गार कोणीही विसरता कामा नयेत. त्या क्रूर घटनेमुळे त्या मातेला, पित्याला, त्यांच्या आप्तांना काय सोसावे आणि भोगावे लागले असेल, याची कल्पनाही इतरांना करता येणार नाही. निकाल ऐकल्यानंतर न्याय झाल्याच्या एका वेगळ्याच भावनेने त्या मातेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपल्या मुलीच्या स्मृतींनी काळीज पिळवटलेले असतानाही त्यांनी बहुधा अभावितपणे जी भावना व्यक्त केली ती राज्य यंत्रणेनेच नव्हे, तर संपूर्ण समाजाने विचार करावा अशी आहे. एरवी बलात्काराच्या, हत्येच्या अनेक घटना घडत असतात; पण अशा सगळ्याच प्रकरणांत न्याय होताना दिसतो का? उलट बलात्काराच्या बहुतेक घटनांमध्ये समाजाकडून त्या मुलीलाच, महिलेलाच दोषी धरले जाते. तिने घातलेले कपडे, तिची वर्तणूक, ती अमुक ठिकाणीच, तमुक वेळीच का गेली, ती मित्रांबरोबर का होती.. अशा सगळ्या गोष्टींना दोष दिला जातो. दोष दिला जात नाही तो समाजामधील क्रूर नरसत्ताक मानसिकतेला, त्यातून येत असलेल्या विकृतींना. या सर्व विकृती आज वेगवेगळ्या रूपांत, पोशाखांत, धर्माच्या अवगुंठनात टारफुल्यासारख्या फोफावलेल्या असताना, याच समाजातून त्याविरोधात एक ‘मूक आवाज’ उठतो आणि न्यायासाठी आक्रोश करून राज्ययंत्रणेलाही हादरून सोडतो. त्या आवाजाला नक्कीच एक राजकीय सूर होता. आरक्षणाची, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील सुधारणेची मागणीही तो करीत होता; पण त्या आवाजाने या खटल्याबाबत एक सामाजिक दबाव निर्माण केला. न्याय मिळाला त्यामागे हा दबावही होता हे विसरता येणार नाही. ज्या प्रकरणांत अशा प्रकारे सामाजिक दबाव नसतो, त्या प्रकरणांत पोटच्या गोळ्याचा बळी जाऊनही पालकांना न्यायासाठी पोलीस ठाण्यांपासून न्यायालयांपर्यंतच्या दरवाजांवर डोके आपटत बसावे लागते, पण ते दरवाजे उघडत नाहीत. त्या प्रकरणांत पोलिसांच्या पंचनाम्यात त्रुटी राहून जातात, त्यांना पुरावेच सापडत नाहीत. त्या प्रकरणांत उभे केलेले साक्षीदार पाहता पाहता काचेच्या बरणीसारखे खळ्ळकन् फुटतात. त्या प्रकरणांत एखादा खास वकील पीडितांच्या साह्य़ाला येत नाही, कारण त्यात ना प्रसिद्धी असते ना जिंकण्याची हमी. त्या प्रकरणांत निकाल लागतो तेव्हा तो अन्यायग्रस्तांवरचा, पीडितांवरचा व्यवस्थात्मक बलात्कारच असतो. कोपर्डी निकालाच्या आगे-मागे अशाच प्रकारे अनेक प्रकरणे निकाली निघालेली आहेत, पुढेही निघतील. यात दोष न्याययंत्रणेचा नसतो. तो असतो त्या यंत्रणेला मदत करणाऱ्या व्यवस्थेचा. कोपर्डी प्रकरणात या यंत्रणेवर समाजाचा मोठा दबाव होता. तेव्हा न्याय झाला, त्याचे खरे श्रेय त्या समाजाच्या उठलेल्या मुठीला आहे. आता प्रश्न एवढाच आहे, की ही मूठ अशीच पीडितांच्या, अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभी राहणार का? या मुठीच्या दबावामुळे समाजातील मुलींचे भय दूर होईल का? ती वळलेली मूठ समाजातील सामंतशाही विकृतीला नामोहरम करू शकेल का? कोपर्डी निकालाच्या आगे-मागे असे अनेक प्रश्न उभे राहिलेले दिसत आहेत. छकुलीच्या मातेनेच त्या सवालांना अजाणता तोंड फोडले, हे बरेच झाले..