25 September 2020

News Flash

अपेक्षाच व्यर्थ

ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिकी उजव्यांना जोर आला आहे.

नवनाझीवादी आणि ‘कू क्लक्स क्लॅन’ संघटनांवर टीका करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हे गुन्हेगार आहेत’ अशी भाषा केली, त्याची जगभर बातमी झाली. तशी ती होणे स्वाभाविकही होते. ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिकी उजव्यांना जोर आला आहे. इतका की, आपले अमेरिकास्थ भारतीयसुद्धा अंतर्यामी चिंतित व्हावेत. अमेरिकेतील बरीच राज्ये ही या उजव्या हुच्चपणापासून अगदी मुक्त आहेत हे खरे. पण दक्षिणेकडील ज्या राज्यांत गौरवर्णीयांच्या वंशश्रेष्ठत्ववादाचा जोर आहे तेथील अन्य वर्णीयांची चिंता ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणापासून वाढलीच होती. याच राज्यांपैकी व्हर्जिनियात परवा गौरवर्णीयांचा मोर्चा निघाला. त्याला हिंसक वळण लागले. मोर्चाच्या एका समर्थकाने आपली मोटारच वेगाने हाणून कृष्णवर्णीयांना चिरडू पाहिले. त्या घटनेत एक बळी गेला. चार्लट्स्व्हिले गावातील हे कृष्णवर्णीय, तेथील गौरवर्णीयांच्या बेभान मोर्चाला अहिंसक प्रत्युत्तर देऊ पाहात होते. अशा अहिंसकांची गत नर्मदा आंदोलकांपेक्षा निराळी ती काय होणार? तसेच तेथे घडले. खेरीज पोलिसांचे हेलिकॉप्टर पडले किंवा पाडण्यात आले, त्यात दोन बळी गेले. एवढे झाल्यावर तरी ट्रम्प या घटनांची निंदा करतात काय, याकडे साऱ्यांचे लक्ष असणारच होते. प्रसारमाध्यमे किंवा विवेकवादी लोक यांना किंमतच न देण्याची पद्धत ट्रम्पसमर्थकांत तितकीशी न रुजल्यामुळे असेल, पण ट्रम्प यांच्यावर या वंशश्रेष्ठत्ववाद्यांची निंदा करण्यासाठी विवेकवाद्यांचा दबावच आला. ‘वंशवाद घातकच’ असे मोघम विधान मोर्चातील हिंसाचारानंतर ट्रम्प यांनी केले होते, त्यानंतरही हा दबाव कायम राहिला. अखेर ट्रम्प बोलले. पण म्हणून खदखद थांबेलच, असे नाही. हे प्रकरण मुळात कृष्णवर्णीयांनी आणि त्यांच्यासोबतच्या विवेकवाद्यांनीच सुरू केले, असा कांगावा अतिउजवे गौरवर्णीय करू शकतात. त्या म्हणण्यात तथ्य इतकेच की, दीडशे वर्षांपूर्वीच्या अमेरिकी यादवी युद्धात लोकशाहीविरोधी आणि गुलामगिरी समर्थक राज्यांच्या समूहाचे- ‘कॉन्फेडरेट’चे लष्करी नेतृत्व ज्याच्याकडे होते, त्या रॉबर्ट ली या सेनापतीचा पुतळा गेली ९३ वर्षे चालरेट्स्व्हिले गावात उभा असताना तो हटविण्यास कृष्णवर्णीयांनी आणि ‘त्यांचीच तळी उचलणाऱ्या’ विवेकवाद्यांनी गावाच्या प्रशासनास भाग पाडले. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही समाजमाध्यमांवरली चळवळ त्यामागे होती. त्याविरुद्ध  गौरवर्णीयांनी ‘व्हाइट लाइव्ह्ज मॅटर’ असे नाव घेऊन त्या गावात मोर्चा काढला. या गौरवर्णीयांची तात्कालिक आणि स्थानिक मागणी एवढीच की, तो पुतळा हा अमेरिकी इतिहासाचा भाग असल्याने तो हटवू नये. पण पुतळा हटवून समतावादाचा जो प्रतीकात्मक विजय होणार होता, त्याला हे आव्हान होते. असे प्रतीकात्मक विजय खरोखरच महत्त्वाचे असतात का आणि इतिहास बदलावा का, हा मुद्दा चर्चेचा ठरू शकतो. पण चर्चेपेक्षा ताकद दाखविण्यास या गावातील गौरवर्णीय आसुसले होते. ते तसे आसुसले, याचे एक मोठे कारण म्हणजे ‘आपलीच सत्ता’ हा त्यांचा फाजील आत्मविश्वास. त्याचे प्रमाण चालरेट्स्व्हिलेत वाढले. तीन जीव जावेत आणि १२ जायबंदी व्हावेत, इतके वाढले. यामागे जी वर्चस्ववादी हिंसक प्रवृत्ती आहे, तिचा मागमूस अमेरिकी कृष्णवर्णीयांच्या चळवळींमध्ये कोठेही दिसत नसे आणि एकटय़ादुकटय़ा गौरवर्णीयांच्या वांशिक हिंसाचारातून मात्र वारंवार दिसे. परंतु ओबामांसारखे राष्ट्राध्यक्ष खमकेपणाने, लोकांच्या त्या भावना काबूत आणत. वर्चस्ववादाचाच फुगा फुगवून सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांना ओबामांसारखे बोलणे एक वेळ जमेलही, पण उक्तीप्रमाणे कृतीची अपेक्षा ट्रम्प यांच्याकडून करणे व्यर्थच. बहुसंख्याकवादालाच सत्तासोपान समजणाऱ्या नेत्यांकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा एरवीही करता येत नाही, तेच अमेरिकेतही घडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:23 am

Web Title: ku klux klan organizations donald trump
Next Stories
1 वेग की विकासाचा शाप?
2 अस्मानी संकट
3 सवाल व्यक्तिप्रतिष्ठेचा
Just Now!
X