या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक समाजात लांडगे असतातच; परंतु ते लपलेले असतात. त्यांना काबूत ठेवणे ही राज्यव्यवस्थेची जबाबदारी किती अवघड आहे, हे अमेरिकेतील लास व्हेगसमधील घटनेने दिसले. सहसा हे लांडगे झुंडीने हल्ले करतात. त्यांच्या संघटना असतात आणि संघटना आल्या की व्यक्ती-व्यक्तींतील दळणवळण आले, परस्परसंबंध आले. या झुंडी काबूत ठेवणे ही राज्यव्यवस्थेची जबाबदारीच असते आणि ते सुरक्षा यंत्रणांसाठी तुलनेने सोपेही असते. समाजातील एकटय़ा व्यक्तीवर लक्ष ठेवणे ही मात्र अशक्यप्राय गोष्ट आहे. एखाद्याच्या डोक्यात नेमके काय सुरू आहे हे ओळखण्याचे यंत्र अद्याप तयार झालेले नाही. फार फार तर अशा एखाद्याचा संशय आला, तर त्याच्या हालचालींवर पाळत ठेवता येईल; पण जे संशयातीत असतात, एरवी सामान्य नागरिकांप्रमाणे वावरत असतात त्यांचे काय? एखादा उठतो आणि नीसमधील बॅस्टिल दिन उत्सवासाठी जमलेल्या नागरिकांवर ट्रक घालतो किंवा लंडनमधील पुलावर एक व्हॅन आणि सुरा घेऊन घुसतो आणि अवघ्या आठ मिनिटांत सात जणांना ठार मारतो, ३८ जणांना जखमी करतो.. अशा घटना रोखायच्या कशा, हा जगभरातील सर्वच सुरक्षा यंत्रणांपुढील सध्याचा कळीचा प्रश्न आहे. हे असे एकल हल्ले करणे कोणा एकाच पंथाचे, धर्माचे, वंशाचे नाहीत. एक मात्र खरे की, त्यात अनेक जिहादींचा समावेश असल्याचे दिसले आहे; पण म्हणून एकल हल्ल्यांवर त्यांचीच मक्तेदारी आहे, असे म्हणता येणार नाही. अमेरिकेतील परवाचा हल्ला करणारा हा श्वेतवर्णीय होता, वृद्ध होता. त्याचे कोणत्या धार्मिक अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचे अजून तरी उघडकीस आलेले नाही. एकल हल्ले करणारे अनेक जण हे मनोरुग्ण असल्याचे आजवरच्या अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. लास व्हेगसमधील हल्लेखोर माथेफिरू होता हेही स्पष्टच आहे; पण तो वैद्यकीयदृष्टय़ा मनोरुग्ण असल्याचे अद्याप कोणी म्हटलेले नाही. मग प्रश्न हा येतो, की तो असा कसाई का बनला? राज्यव्यवस्था आपणांस सुरक्षितता पुरविते, हा समाजाचा विश्वास भंग करणे हे दहशतवादी संघटनांचा हिंसक कृत्यांमागील हेतू असतो. या माथेफिरूचा तसा काही हेतू होता की काय, हे समजलेले नाही. अर्थात त्याचे हेतू आणि कारणे काहीही असली, तरी त्यांचे मूळ अखेर समाजव्यवस्थेतच शोधावे लागेल. ट्रम्प निवडून आल्यानंतर कधी नव्हे एवढे अमेरिकी समाजाचे ध्रुवीकरण झाले आहे. अतिरेकी विरुद्ध उदारमतवादी असा संघर्ष तेथे सातत्याने सुरू आहे. हा संघर्ष जसा समाजमाध्यमांतून सुरू आहे, तसाच तो प्रत्यक्ष रस्त्यावरही चालू आहे. माध्यमांतून होणाऱ्या त्या असहिष्णू, हिंसक आणि मूलत: खोटय़ानाटय़ा प्रचाराने अमेरिकी समाजातील दऱ्या अधिक खोल केल्या आहेत. अशा परिस्थितीत कोणाच्या मनातील लांडगा क्रूर होऊ शकतो. हे नीट समजून घेतले पाहिजे. वातावरणात हिंसेचे जंतू पसरवायचे, त्याविरुद्ध बोलणाऱ्यांना राष्ट्रशत्रू ठरवायचे आणि मग ही हिंस्रता कोठून येते, एकल हल्ले कसे होतात हे विचारायचे, हा त्या समाजाचा दांभिकपणा झाला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेत सध्या बंदुकांसारखी शस्त्रे बाळगण्याच्या हक्कावरून जोरदार वाद सुरू झाला. शस्त्रबंदी नको आणि हिंसाही नको किंवा एकल हल्ले होतात, म्हणून संरक्षणासाठी शस्त्रे हवीत, अशी त्यातील एक भूमिका आहे. ती जेवढी अतार्किक तेवढीच दांभिक. अशा अतिरेकी भूमिकांतूनच सामाजिक, सांस्कृतिक अराजक निर्माण होण्याचा धोका असतो. अमेरिकेच्या उदाहरणापासून अन्य जगाने कोणता धडा घ्यायचा असेल तर हाच.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Las vegas attack terrorist attack
First published on: 04-10-2017 at 01:57 IST