News Flash

लावणीचे लावण्य हरपले!

लावणीच्या प्रदर्शनातील शृंगाराला त्यांनी कधीच अश्लील आणि बीभत्सतेकडे झुकू दिले नाही.

यमुनाबाई वाईकर

महाराष्ट्राच्या लोककलेतील लावणीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या यमुनाबाई वाईकर यांचे निधन हे सगळ्यांसाठीच मोठे नुकसान आहे. त्यांच्यापाशी असलेल्या अस्सल लावण्या, त्यातील शब्दकळा आणि त्यातील स्वरसौंदर्य याची आधुनिक माध्यमांच्या मदतीने नव्या महाराष्ट्राला ओळख होण्यासाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक होते. पण तरीही त्यांनी आयुष्यभर लावणीतील अभिजात लावण्य समजावून सांगण्यासाठी जे अथक प्रयत्न केले, त्याला मानाचा मुजरा करायलाच हवा. भातलावणीच्या वेळी गायले जाणारे गीत म्हणजे लावणी किंवा सौंदर्य या अर्थाने उपयोगात येणाऱ्या लावण्य या शब्दाच्या अनुषंगाने सुरेख, आशयघन शब्दस्वरांचे गीत म्हणजे लावणी. लोकसंगीतात लावणी हा प्रकार आजही तेवढाच लोकप्रिय राहिला आहे. मात्र त्याचे स्वरूप बदलत गेले आणि लावणीतील लावण्यही हरपत गेले. चित्रपटांच्या गीतांवर होणारे नृत्य असे आजकालच्या लावणी फडांचे स्वरूप झाल्याने, खरीखुरी लावणी हळूहळू लुप्त होत असताना, यमुनाबाईंच्या कार्याचे महत्त्व अधिकच उजळून येते. लावणीमध्ये अध्यात्माबरोबरच शृंगारही अवतरतो. मराठीतील गूढगुंजनात्मक काव्याच्या कितीतरी आधीपासून लावणीने समाजात आपले स्थान पक्के केले. समाजाला साध्यासोप्या भाषेत समजावून सांगणारे तत्त्वज्ञान हे तिचे वैशिष्टय़! अभिजात पातळीवर शृंगाराला स्थान देण्याचे कामही लावणीनेच केले. त्यामुळे तमाशाच्या फडातील लावणी आणि बैठकीची लावणी असे दोन कलाप्रकार आपोआपच स्थापन झाले. राम जोशी, पठ्ठे बापूरावांपासून ते ग. दि. माडगूळकर आणि जगदीश खेबूडकरांपर्यंत अनेकांनी लावणी समृद्धही केली. परिणामी, चित्रपटांमध्ये लावणीचे आगमन होणे स्वाभाविक ठरले. मराठी चित्रसृष्टीत मोठा काळ लावणीपटांनी व्यापला, याचे कारण तो कलाप्रकार आधीपासूनच समाजात रुजला होता. मात्र चित्रपटातील लावण्या शृंगारावर भर देणाऱ्या होत्या. यमुनाबाईंनी मात्र लावणीतील सौंदर्यावर अधिक भर दिला. लावणीच्या प्रदर्शनातील शृंगाराला त्यांनी कधीच अश्लील आणि बीभत्सतेकडे झुकू दिले नाही. लावणी ही मराठी संस्कृतीतील एक अतिशय संपन्न दालन कसे आहे, हेच त्या सांगत राहिल्या. अभिजात संगीताच्या सर्जनाची प्रक्रिया लावणीसारख्या लोकसंगीतातूनच झाली. ती लोकप्रिय झाली, याचे कारण त्यातील संगीत जेवढे चटपटीत आणि आकर्षक होते, तेवढीच अभिजातताही त्यात टिकून होती. शब्दांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी होणाऱ्या किंचित हावभावांनी लावणीचे सौंदर्य अधिकच खुलवण्याची किमया यमुनाबाईंकडे होती. त्यामुळे आयुष्यभर या कलाप्रकाराला अभिजनांसमोर आणण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. लावणीचे फड हे सामान्यत: कोल्हाटी समाजात अधिक. हा समाज गावोगाव रानोमाळ हिंडत आपली कला सादर करून पोट भरत असतो. पण त्याच्या वाटय़ाला कधीच सामाजिक पत आली नाही. यमुनाबाईंना याचे सतत शल्य होते. त्यामुळेच त्यांनी या समाजाच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचले. व्यसनाधीनता दूर करण्यासाठी जसे प्रयत्न केले, तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी धर्मशाळाही बांधली. लावणीसाठी पायी बांधलेले चाळ काही काळ दूर करून यमुनाबाईंनी संगीत नाटकांतूनही भूमिका केल्या.  पण लावणी हेच त्यांचे जीवन असल्याने त्यांनी ठेका आणि चाळ यांना कधीच अंतर दिले नाही. लता लोकनाटय़ तमाशा मंडळ या त्यांच्या फडाने सादर केलेली चौकाची लावणी अधिक लोकप्रिय झाली याचे कारण यमुनाबाईंच्या ठायी असलेला सुरेल आवाज आणि लोभस अदाकारी. जाणकारांच्या माना वळाव्यात आणि नजरा रोखाव्यात, असे हे सांगीतिक सौंदर्य यमुनाबाईंनी आयुष्यभर उलगडून दाखवले. ‘पद्मश्री’ हा पुरस्कार म्हणजे, त्यांच्या या अथक परिश्रमाची पावती. त्यांच्या निधनामुळे लावणीचे चाळही काही क्षण नि:स्तब्ध झाले असतील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 2:02 am

Web Title: lavani singer and padma shri recipient yamunabai waikar passed away
Next Stories
1 आसामातील खदखद
2 शिक्षणाच्या पाणपोया
3 ‘इन्सानियत के दायरे’चे काय?
Just Now!
X