आसाममध्ये विधानसभेच्या पाच जागांवर पोटनिवडणूक होणार असल्याने काँग्रेस व भाजप हे राष्ट्रीय पक्ष, तसेच मुस्लिम मतांवर टिकून असलेली ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट’ (एआययूडीएफ), बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) हे प्रादेशिक पक्ष आपापले राजकीय हित पाहात आहेत. त्याचा भाग म्हणून काँग्रेसने बद्रुद्दीन अजमल यांच्या ‘एआययूडीएफ’शी युती तोडली. या निर्णयामुळे एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेली ‘महाजोत’ नावाची १० पक्षांची आघाडी संपुष्टात आली. या ‘महाजोती’चा ना काँग्रेसला फायदा झाला, ना प्रादेशिक पक्षांना. ‘बीपीएफ’ने भाजपशी युती तोडून ‘महाजोती’त प्रवेश केला होता; पण निवडणूक हरल्यावर ‘बीपीएफ’ने स्वत:हून काँग्रेसशी काडीमोड घेतला. आसाममध्ये सत्ता भाजपची असल्याने पुढील राजकीय लाभासाठी ‘बीपीएफ’ला पुन्हा पूर्वीचा मित्र अधिक जवळचा वाटू शकतो! आसाममधील सर्वात प्रभावशाली पक्ष ‘एआययूडीएफ’शी संबंध तोडण्याचे शहाणपण काँग्रेसला उशिरा सुचले आहे. आसाममधील तृणमूल काँग्रेसचा नवा चेहरा बनणाऱ्या सुष्मिता देव यांनी काँग्रेसमध्ये असताना, ‘एआययूडीएफ’शी आघाडीला विरोध केला होता. तेव्हा मुस्लिमबहुल मतदारसंघातील लाभाच्या लालसेने बद्रुद्दीन यांच्या पक्षाशी काँग्रेसने सख्य केले, पण त्याने दोन्ही पक्षांना प्रत्येकी जेमतेम ३ जागांचा फायदा झाला. आसामात ‘महाजोत’ नसती तरी काँग्रेसला २०१६च्या निवडणुकीतील जागांइतक्या जागा मिळाल्या असत्या. उत्तर आसाममधील हिंदूबहुल आसामी मतदारसंघात आता ३ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तिथे ‘एआययूडीएफ’शी युती काँग्रेसला महागात पडेल, हा राजकीय विचार करून काँग्रेसने या ‘मुस्लिम पक्षा’ला दूर केले आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा बद्रुद्दीन फक्त मुस्लिम मतांच्या आधारावर खासदार बनतात, त्यांचा पक्ष असादुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’चा आसामी अवतार आहे. ‘एमआयएम’ काय किंवा ‘एआययूडीएफ’ काय, आपला पक्ष मुस्लिमांच्या हितरक्षणासाठी असल्याचे त्यांचे नेते सांगतात आणि हे पक्ष नेहमीच धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर टिकून राहतात. प्रत्यक्षात हे पक्ष भाजपसारख्या बहुसंख्याकांचे राजकारण करणाऱ्या पक्षाला लाभदायी ठरतात, हे बिहारसारख्या राज्यात पाहायला मिळाले आहे. कदाचित उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. आसाममध्ये पक्षाचे हित साधत असताना बद्रुद्दीन स्वत:च्या व्यावसायिक हितसंबंधांना धक्का लागू न देण्याची काळजी घेत असतात. बद्रुद्दीन यांचे भाऊ सिराजउद्दीन हे आसाममधील सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांची तरफदारी करू लागले आहेत. ‘भाजपचे कौतुक’ हा मुद्दा काँग्रेसला ‘एआययूडीएफ’शी युती तोडण्यासाठी पुरेसा ठरला. धर्मांध पक्षाला जवळ करणारा पक्ष नको, असे कारण काँग्रेसने पुढे केले असले तरी युती केली तेव्हाही ‘एआययूडीएफ’ हा धर्माच्या आधारावर निवडणूक लढणारा पक्ष होता. ‘मुस्लिम पक्षा’ला दूर केल्यामुळे काँग्रेस प्रादेशिक पक्षांशी युती करण्याच्या धोरणात बदल होईल, असे मात्र नाही… अन्यथा, केरळमधील ‘यूडीएफ’मध्ये ‘मुस्लिम लीग’ कशी राहू शकते? धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या पक्षांशी युती न करण्याचे काँग्रेसचे धोरण असेल तर मात्र त्याचा राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस याची आघाडी होऊ शकते, तशी भविष्यात आसाममध्ये ती काँग्रेस-तृणमूल काँग्रेस याचीही होऊ शकते. ‘तृणमूल’ने आसाम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. इथे मुस्लिम पक्ष मानले गेलेल्या प्रादेशिक पक्षांची जागा ‘तृणमूल’सारख्या व्यापक जनाधार असलेल्या पक्षाने घेणे काँग्रेससाठीही सुसह्यच ठरेल. राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकत्र येताना हेच सूत्र बिगरभाजप पक्षांना फायदेशीर ठरते. पण इतका विचार यामागे नसेल, तर मात्र स्वघोषित ‘मुस्लिम पक्ष’ कुणालाही तात्पुरत्या लाभासाठीच हवे असतात, एवढाच ‘एआययूडीएफ’शी काँग्रेसच्या झालेल्या काडीमोडाचा अर्थ!