केवळ व्याजाची रक्कम दिली नाही, म्हणून सावकाराने गटाराचे पाणी प्यायला लावणे, हे जेवढे अमानुष, तेवढेच ७० हजारांच्या कर्जाची साडेसात लाख रुपये परतफेड केल्यानंतरही तगादा लावणे तेवढेच अतिरेकी. महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये हे चित्र आजही पाहायला मिळते, याचे कारण गांजलेल्या गरीब माणसाला तातडीने कर्ज देणारी बँकिंग यंत्रणा अद्यापही भारतात निर्माण झालेली नाही. कर्जाला तारण म्हणून या देशातील अनेकांची घरेदारे सावकाराच्या दावणीला बांधलेली आहेत आणि मृत्यूनंतरही मुलांकडून त्याची परतफेड सुरूच आहे. अनेक गावांमध्ये तर सावकाराच्या घरात गडी माणूस म्हणून कर्जदाराला आयुष्यभर काम करावे लागते आहे आणि तरीही त्याच्या कर्जाचे मुद्दल काही फिटू शकलेले नाही. हे चित्र विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या नव्या राज्यकर्त्यांसाठी शोभादायक तर नाहीच, परंतु लांच्छन आणणारे आहे. अनिल मुटकुळे या तरुणास गटारीचे पाणी पिण्यास भाग पाडणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील मोहा गावातील पप्पू चंदर या सावकाराच्या घरावर छापा घातल्यानंतर सापडलेल्या ढीगभर चिठ्ठय़ा हे ग्रामीण भारताचे वास्तव आहे. सावकारी कायद्याने बंद करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले; परंतु त्याच्या अंमलबजावणीबाबत कोणीही आग्रही राहिले नाही. मुलीचे लग्न, बाळंतपण, बारसे, दिवाळी यांसारख्या कारणांसाठी कर्ज घेण्याशिवाय पर्यायच नसलेल्या कुटुंबांना सावकाराचाच आधार वाटावा, ही यातील सर्वात भीषण शोकांतिका आहे. एके काळी कुळाकडून जमिनी कसून घेऊन त्यांना भिकारी अवस्थेत ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात होती. काळाच्या रेटय़ाने त्यात बदल झाले. कूळ कायद्यात कसेल त्याची जमीन हा नवा बदल  अस्तित्वात आला. जमीनदारी गेली, तरीही तिचे अवशेष सावकारीच्या रूपात शिल्लक मात्र आहेत. देशातल्या कानाकोपऱ्यात बँकिंग व्यवसाय पोहोचवण्यात अद्याप यश आलेले नाही, हे खरे असले, तरीही या बँकांकडून कर्ज मिळवणे हीही फार सोपी गोष्ट नसते. ज्याची गरज केवळ काही हजारांची आहे, त्याला बँकांचे उंबरठे झिजवूनही कर्ज मिळण्याची शक्यता नसेल, तर तो खासगी सावकाराकडेच आशेने जाणार, हे स्वाभाविक आहे. सावकारीचा धंदा तेजीत येतो, याचे कारण दारिद्रय़ आणि अशिक्षितता असते. सावकारही याच दोन कारणांच्या आधारे अतिरेकी स्वरूपात कर्जदाराची पिळवणूक करतो. अशा सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करणारा महेश क्षीरसागर हा एकटा नाही. त्याने घेतलेल्या ७० हजारांच्या कर्जापोटी साडेसात लाख रुपयांची परतफेड केल्यानंतरही सावकाराने तीन लाख रुपयांसाठी तगादा लावल्याने, त्याला जीवन संपवण्याशिवाय कोणताच पर्याय सापडला नाही. वडापावची गाडी चालवून मिळणारे सगळे उत्पन्न सावकाराच्या घशात घालणाऱ्या महेशला कर्जफेड न झाल्यास आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचीच काळजी वाटू लागली. कारण सावकाराने सगळ्यांना संपवून टाकण्याची धमकी दिली होती. एकदा का सावकारी पाशात अडकले की पिढय़ान्पिढय़ा त्यातून सुटका होत नाही, हा अनुभव असतानाही गरीब जनतेला त्याच्याच वळचणीला जावे लागते आणि कर्जाचीही भीकच मागावी लागते. या भिकेच्या बदल्यात आपले सारे आयुष्य सावकाराच्या चरणी वाहून टाकणाऱ्या लाखो कुटुंबांना सरकारने कधीही दिलासा दिला नाही. महाराष्ट्रात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सावकारांच्या विरोधात कायदाही संमत झाला. त्यानंतर त्याकडे कुणीच ढुंकूनही पाहिले नाही. आणखी किती मुटकुळे आणि क्षीरसागर यांची आयुष्ये अशा भयानक चालीमुळे संपल्यानंतर सरकार त्याकडे लक्ष देणार आहे?