विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा नगरपालिका निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आणि सत्ताधारी भाजपने त्यात पहिला क्रमांक पटकविला. चार टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले. राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. कल्याण-डोंबिवलीमध्ये सारी ताकद पणाला लावूनही शिवसेनेने भाजपला मागे टाकले. भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील दोन जिल्हा परिषदांमधील सत्ता गमवावी लागली. निवडणुकांच्या आधी मराठा समाजाचे मोठाले मोर्चे निघाले होते. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. निवडणुकीच्या अगदी तोंडावर नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. हे सारे मुद्दे विरोधात असल्याने भाजपला नगरपालिका निवडणूक जड जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रचाराची सारी सूत्रे हाती घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला यश मिळवून दिले. भाजपच्या यशाचे मुख्यमंत्री फडणवीस हेच शिल्पकार आहेत. थेट नगराध्यक्षांची निवडणूक घेण्याचा निर्णय भाजपकरिता फायदेशीर ठरला. कारण पक्षाने काही पालिकांमध्ये फक्त नगराध्यक्षांच्या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले होते. यातूनच भाजपचे सर्वाधिक ७१ नगराध्यक्ष निवडून आले असले तरी यांपैकी निम्म्याच पालिकांमध्ये भाजपकडे बहुमत आहे. भाजप आणि सत्तेतील मित्र पक्ष शिवसेनेचे एकूण १७१ पैकी ९७ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. हा भाजपच्या बाजूने कौल मानला जात असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा दुर्लक्ष करून चालणार नाहीत. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाहीत. दोन पक्षांची युती वा आघाडी झाली तरी तेवढेच यश मिळेल, असे वास्तव मांडता येत नाही. पण भाजप आणि शिवसेना व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या जागांची बेरीज केल्यास युती आणि आघाडीच्या घटक पक्षांमध्ये फार काही अंतर नाही. भाजप-शिवसेनेचे एकूण १८०२ तर काँग्रेस व राष्ट्रवादीची बेरीज केल्यास १७६४ नगरसेवक निवडून आले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला होता. या पाश्र्वभूमीवर दोन्ही काँग्रेसने नगरपालिका निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी यश मिळविले आहे. भाजप आणि शिवसेनेची कागदोपत्री युती होती. अर्थात, ही युती कागदावरच राहिली. कारण काही दोन-चार अपवाद वगळल्यास सत्तेतील मित्र पक्ष वेगळेच लढले. भाजप आणि शिवसेनेबरोबर लढण्याकरिता दोन्ही काँग्रेसने एकत्र येणे हा या निकालाचा अर्थ आहे. विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकांच्या मतांची टक्केवारीवर नजर टाकल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फार काही फरक नाही. या निकालानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते पुन्हा एकत्र येण्याची भाषा करू लागले असले तरी मवाळ भूमिका कोणी घ्यायची, हा काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये कळीचा मुद्दा आहे. भाजपला चांगले यश मिळाले असताना तुलनेत शिवसेनेची पीछेहाटच झाली. मुंबई व ठाण्याच्या निवडणुका गांभीर्याने घेणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाने नगरपालिका निवडणुकांमध्ये तेवढे लक्ष घातले नाही. सदस्य संख्येत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. भाजपला चांगले यश मिळाले असले तरी ते निर्विवाद यश मानता येणार नाही व हा कौल संमिश्रच मानण्यात येत आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालाने मुख्यमंत्री फडणवीस यांचे आसन अधिक घट्ट झाले. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या यशाचा भाजपला निश्चितच फायदा होईल.