News Flash

नियती स्वीकारलेला अ‍ॅथलिटोत्तम..

जीवनावर उत्कट प्रेम आणि त्याला शिस्तीची जोड या भांडवलावर त्यांनी आयुष्याचे शतक सहज पूर्ण केले असते.

आयुष्याच्या ऐन उमेदीत लघू अंतराच्या वेगवान शर्यतींमध्ये हुन्नर दाखवलेले मिल्खा सिंग आयुष्यात दीर्घ पल्ल्याची मॅरेथॉन धावले. जीवनावर उत्कट प्रेम आणि त्याला शिस्तीची जोड या भांडवलावर त्यांनी आयुष्याचे शतक सहज पूर्ण केले असते. पण संपूर्ण जगाच्या परिचालनातच खोडा घालणारा करोना विषाणू प्रकटला आणि त्याच्यासमोर मिल्खा सिंग यांच्यासारख्या लढवय्यालाही शरण जावे लागले. खुद्द मिल्खा सिंग आज जेथे असतील, तेथेही याविषयी त्यांच्यात अजिबात कटुता नसेल. प्राक्तन किंवा डेस्टिनी या संकल्पनेवर त्यांची विलक्षण श्रद्धा अखेपर्यंत राहिली. फाळणीच्या भयंकर जखमा त्यांच्या दृष्टीने कधीही वाळल्या नसतील; फाळणीपश्चात हिंसाचारात आईवडील आणि दोन भाऊ गमावल्यानंतर तशी अपेक्षाही नाही. पण ही वेदना त्यांनी कधी मिरवली नाही किंवा पाकिस्तानला वा दोन्ही बाजूंकडील नेत्यांना शिव्याशाप देऊन ती जिरवण्याचाही प्रयत्न त्यांनी केला नाही. कित्येक मरण पावले या बाजूचे आणि त्या बाजूचेही. हा सगळा नियतीचा खेळ, असेच मिल्खा सिंग मानून चालले. बऱ्याचदा असे करणाऱ्यांमध्ये एक प्रकारची पराभूत आणि स्वीकारू मानसिकता पाहिली जाते. मिल्खा सिंग यांच्याबाबतीत तशी गल्लत संभवली नाही, कारण त्यांच्या आयुष्याचा पट संघर्षांत गेला. त्यात अनेक दु:खाचे क्षण आले, तसे अत्यानंदाचे, अभिमानाचेही येऊन गेलेत. संघर्षांसमोर, आव्हानांसमोर त्यांनी हार मानली नाही. पण त्याहीपलीकडे एक अवस्था असते, संवेदनशील स्थितप्रज्ञतेची. ती अंगी भिनल्यामुळेच विजयाचा कैफ आणि पराजयाचा विषाद त्यांना व्यक्त करावासा वाटला नाही.

मिल्खा सिंग धावपटू किंवा अ‍ॅथलीट बनले, ते पूर्णतया परिस्थितीच्या रेटय़ामुळे. फाळणीच्या रक्तलांच्छित हिंसाचारापेक्षाही विलक्षण गरिबी आणि रोगराईपायी त्यांनी अधिक भावंडे गमावली. फाळणीमुळे कुटुंबीयांशी झालेली ताटातूट, मग पालकांची हत्या हा तर निव्वळ एक टप्पा होता. दु:ख करायला उसंत नव्हती. भारतात पळून आल्यावर लहान-मोठी कामे करून, काही वेळा चोरी करून पोटासाठी अन्नार्जन करणे यालाच प्राधान्य होते. त्यांच्या बंधूमुळे थोडेफार स्थैर्य मिळाले. तीन प्रयत्नांनंतर लष्करात नोकरी मिळाली आणि त्यांच्यातील नैसर्गिक धावपटूला दिशाही. मिल्खा सिंग सुसाट पळायचे. भारतीय लष्करात खेळांना मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे ४०० मीटर्स, २०० मीटर्स, ४४० यार्ड अशा शर्यतींमध्ये ते उतरू लागले. लष्करातील आंतरविभागीय क्रीडास्पर्धामध्ये त्यांची धाव बिनतोड असायची. शर्यतीच्या ट्रॅकवर अंतिम टप्प्यात काही वेळा उलट फिरून प्रतिस्पध्र्याकडे पाहात ते शर्यत पूर्ण करायचे! पुढे राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळू लागली. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये त्यांनी निराशा केली. पण त्या स्पर्धेत ४०० मीटर्सच्या विजेत्याकडून अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षणाविषयी कानमंत्र मिळाल्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनतीला शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड दिली. १९५८ च्या आशियाई स्पर्धामध्ये त्यांनी ४०० मीटर्समध्ये सुवर्णपदक जिंकलेच, शिवाय विख्यात पाकिस्तानी धावपटू अब्दुल खलिकला २०० मीटर्समध्येही हरवून दाखवले. याच खलिकला पुन्हा एकदा लाहोरमध्ये त्याच प्रकारात हरवून मिल्खा सिंग यांनी आशियातील त्यावेळच्या सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या धावपटूवर निर्विवाद वर्चस्व गाजवून दाखवले होते. त्यावेळचे पाकिस्तानी शासक जनरल आयुब खान यांनी त्यांना ‘फ्लाइंग सिख’ हे बिरुद त्या शर्यतीनंतरच बहाल केले होते.

रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचे कांस्यपदक ०.१ शतांश सेकंदांनी हुकले. शर्यतीच्या अर्ध्या टप्प्यावर आपण गाफील राहिलो आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली, असे ते सांगत. पण त्या वेळी त्यांनी नोंदवलेली वेळ राष्ट्रीय विक्रम ठरला होता आणि जवळपास ३८ वर्षे तो अबाधित राहिला होता. अब्दुल खलिक किंवा कोणत्याही प्रतिस्पध्र्याविषयी त्यांची मित्रत्व आणि नम्रतेचीच भावना राहिली. फाळणीच्या जखमा आणि अपेक्षांचे ओझे घेऊन, प्रस्थापित जगताच्या अवहेलना वागवत हळूहळू उभ्या राहू लागलेल्या भारताचे प्रतिनिधित्व मिल्खा करतात. १९६० मध्ये ऑलिम्पिक पदकाच्या समीप पोहोचण्याच्या आठ वर्षे आधी स्वतंत्र भारताचे पहिले पदक मराठमोळे कुस्तिगीर खाशाबा जाधव यांनी जिंकले होते. दुर्दैवाने खाशाबांना पुढील आयुष्यात मिल्खा यांच्यासारखी प्रसिद्धी मिळाली नाही. पुढे कित्येक वर्षे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक भारतासाठी दुर्मीळ बनले होते. या पार्श्वभूमीवर खाशाबांचे पदक किंवा मिल्खा सिंग वा पी. टी. उषा यांचे थोडक्यासाठी पदक निसटणे याच हॉकीपलीकडे भारतीय क्रिकेटेतर क्रीडाक्षेत्राच्या सुवर्णगाथा होत्या. त्या सुवर्णकाळाचे एक नायक असलेले मिल्खा सिंग आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांची अथक मेहनत आणि कामगिरी जितकी अनुकरणीय, त्यापेक्षाही क्षमाशील तटस्थता अधिक अनुकरणीय. या अ‍ॅथलिटोत्तमाला ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 3:47 am

Web Title: loksatta pays tribute to milkha singh zws 70
Next Stories
1 सुरुवात तर झाली…
2 तरल की दोलायमान? 
3 विठ्ठलभक्तीचे समाजभान!
Just Now!
X