19 March 2019

News Flash

पैसा जिंकला!

विधान परिषदेची निवडणूक म्हणजे मतदारांची चंगळच असते.

 

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला. निवृत्त होणाऱ्या सहा सदस्यांमध्ये शिवसेनेचा एकही सदस्य नव्हता. शिवसेनेला दोन जागांचा फायदाच झाला. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. न्यायालयीन प्रक्रियेमुळे बीड-लातूर-उस्मानाबाद मतदारसंघांतील मतमोजणी लांबणीवर पडली असली तरी या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीतच लढत आहे. विधान परिषदेची निवडणूक म्हणजे मतदारांची चंगळच असते. प्रत्येक मताला काही लाख रुपयांचा भाव फुटतो. पैशांचा खेळ किंवा घोडेबाजाराला आळा घालण्याच्या उद्देशाने राज्यसभा निवडणुकीत खुल्या मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला.  वाजपेयी सरकारच्या काळात राज्यसभेच्या निवडणूक पद्धतीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. विधान परिषद निवडणुकीकरिता खुल्या मतदान पद्धतीचा स्वीकार करण्याची तरतूद तेव्हा करण्यात आली नाही. गेली १५ वर्षे विधान परिषद निवडणुकीत खुल्या मतदान पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे राज्यकर्त्यांकडून आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात हा बदल अद्यापही करण्यात आलेला नाही. गुप्त मतदान पद्धत असल्याने मोठय़ा प्रमाणावर पैशांचा खेळ होतो. अकोल्यात पुरेसे संख्याबळ नसताना शिवसेनेच्या गोपीकिसन बजोरिया यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत हॅट्ट्रिक केली. बजोरिया यांनी ही ‘जादू’ कशी केली हे जगजाहीर आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघात त्यांचे पुत्र विप्लभ बजोरिया हे शिवसेनेच्या वतीने निवडून आले. विदर्भातील बजोरिया यांचे पुत्र मराठवाडय़ातून निवडून आले. आता बजोरिया यांचा मराठवाडय़ाशी संबंध काय? बजोरिया यांच्या विजयी मिरवणुकीत पैसे उधळण्यात आले. यावरून बजोरिया यांनी निवडणूक कशी लढविली हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. गेल्या वर्षी मराठवाडय़ातील तानाजी सावंत हे विदर्भातून निवडून आले होते. नाशिकमध्ये शिवसेनेने अनपेक्षितपणे विजय मिळविला. नाशिकमध्ये मराठा विरुद्ध माळी असा जातीय वाद नवीन नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जातीयवादाला फोडणी देण्यात आली. त्यात सर्वच पक्ष आले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मदत झाल्याचा दावा शिवसेनेच्या विजयी उमेदवाराने केला आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार माळी समाजाचे असल्याने या चर्चेला उधाण आले आहे. तुरुंगातून सुटका झाल्यावर भुजबळपुत्राची ‘मातोश्री’वारी किंवा शिवसेना पक्षप्रमुखांचे सचिव मििलद नार्वेकर यांनी भुजबळांच्या घेतलेल्या भेटीने वेगळ्या समीकरणाची चाहूल लागली होती. कोकणात सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शेकाप आणि नारायण राणे यांचा पक्ष अशी मोट बांधली होती. परिणामी शिवसेनेला अन्य कोणाची मदत झाली नाही. सिंचन घोटाळ्यात तटकरे यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. पालघरचे उट्टे काढण्याकरिता भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी तटकरेपुत्राला मदत केल्याची चर्चा आहे. अमरावतीमध्ये भाजपचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना सहज विजय मिळाला असला तरी काँग्रेसची १००च्या आसपास मते फुटल्याने राज्यमंत्र्यांची जादू कामाला आलेली दिसते. वर्धा-चंद्रपूर मतदारसंघात मात्र भाजपला ३८ मतांनीच विजय मिळाला. एकूणच पक्षनिष्ठेऐवजी पैशांचा खेळ यशस्वी झाल्याचे चित्र आहे. पुढील महिन्यात ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होणार हे स्पष्टच आहे.

First Published on May 25, 2018 2:47 am

Web Title: maharashtra legislative council election 2018 shiv sena bjp congress ncp