खेळाडूने आपल्या कारकीर्दीस पूर्णविराम कधी द्यावा? कर्णधाराने नेतृत्वाचा मुकुट कधी खाली ठेवावा? अशा प्रश्नांना नेमकी उत्तरे नसतात. निश्चित सूत्र वा मार्गदर्शक तत्त्व नसते. कुणी तरी ‘आता थांबा’ असे म्हणण्याच्या आधीच ज्याने-त्याने ते समजून घ्यायचे असते आणि आपणहून बाजूला व्हायचे असते. महेंद्रसिंग धोनी याच्या खात्यावर त्याबाबत जास्तीचे एक शतक मांडून ठेवायला हरकत नाही. तसाही धोनी अचूक ‘टायमिंग’साठी ओळखला जातो. मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधारपदाचा त्याग करून त्याने आपल्या या समयसूचकतेचा आविष्कार पुन्हा एकदा घडवला. अशी समयसूचकता त्याने याआधी अनेकदा दाखवली आहे. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने असाच एक आश्चर्यकारक निर्णय घेत जोगिंदर शर्मासारख्या अननुभवी मध्यमगती गोलंदाजाकडे चेंडू दिला होता. परंतु त्याच्या त्याच षटकाने भारताला जगज्जेतेपद जिंकून देण्याची किमया साधली. २०१४चा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेऊन त्याने अनेकांना धक्का दिला होता.  २००७ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात भारताची कामगिरी अत्यंत मानहानीकारक झाल्यामुळे राहुल द्रविडकडून नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे गेली, तर त्याच्या पुढच्याच वर्षी त्याच्याकडे अनिल कुंबळेकडून कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद गेले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग या  भारताच्या रथी-महारथी खेळाडूंचा हा संघ. परंतु संघातील ज्येष्ठ-श्रेष्ठांचे नेतृत्वसुद्धा त्याने हिमतीने आणि अर्थातच योग्य प्रकारे केले. याची कारणे एक तर अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन घेण्यात त्याला कधीही कमीपणा वाटला नाही आणि दुसरी बाब म्हणजे कठीण परिस्थितीत शांतपणे निर्णय घेण्याची कला त्याच्याकडे होती. आजही त्याच्या नेतृत्वाबाबत कोणासही काही प्रश्न नव्हते. पण त्याने काळाची पावले ओळखली आणि एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून केव्हा निवृत्ती पत्करणार, असा प्रश्न धोनीला एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विचारला होता. तेव्हा या प्रश्नाची अपेक्षा आपणास होती ती एखाद्या भारतीय पत्रकाराकडून असे मिश्कील उत्तर त्याने दिले होते. गेल्या काही वर्षांत विराट कोहली भारतीय क्रिकेटच्या अवकाशात चमचमतो आहे. त्याचा संदर्भ बहुधा त्या उत्तराला असावा.  धोनीकडून कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकतेचे नवे बीजारोपण केले. संघाला यशोशिखरावर नेऊन ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय संघ कसोटी क्रिकेटच अधिक खेळत आहे. त्यामुळे संघाला विराटच्या उमद्या नेतृत्वाचा सराव झाला आहे. धोनी मात्र विश्रांतीनंतर पुन्हा एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात परतणार होता. हा एक भाग झाला. परंतु मुळात त्याच्याकडे जेव्हा नेतृत्व सोपवण्यात आले, तेव्हासुद्धा अनुभवी खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व युवा खेळाडूकडे कसे याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले होते. धोनीने आता नेमके त्याचीच पुनरावृत्ती केली आहे. शुक्रवारी भारतीय निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडतानाच मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधारसुद्धा निश्चित करणार आहे, या वेळी संघातील अन्य खेळाडूंचे सातत्य आणि नेतृत्वक्षमता पाहता विराटकडेच कर्णधारपद जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास संयमाकडून आक्रमकतेकडे असा तो भारतीय क्रिकेटमधील दिशाबदल असेल.