पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाचा अभिषेक बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसमधील क्र . २चे पद असलेल्या सरचिटणीसपदी नियुक्ती करून आपला राजकीय उत्तराधिकारी असेल यावर शिक्कामोर्तब केले. वास्तविक ३३ वर्षीय खासदार अभिषेक बॅनर्जी हे गेली काही वर्षे पक्षाचा सारा कारभार सांभाळत होते व ममतांनंतर पक्षात त्यांनाच महत्त्व होते. यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने अभिषेक यांना लक्ष्य केले होते. ‘भतीजा कल्याण’ हा ममतादीदींचा एक कलमी कार्यक्रम असल्याची टीका गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभांमधून केली होती. राज्यांमधील प्रबळ विरोधी नेत्यांच्या मागे चौकश्यांचे शुक्लकाष्ठ लावून देण्याची नवीन पद्धत भाजपने अलीकडे रूढ केली. यातून ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हेसुद्धा सुटले नाहीत. कोळसा खाणप्रकरणी सीबीआयने अभिषेक यांच्या पत्नीची गेल्या वर्षी चौकशी केली होती. अभिषेक बॅनर्जी हे आता अधिकृतपणे पक्षात दुसऱ्या क्रमांकावरील नेते झाले आहेत. काँग्रेसने घराणेशाही पोसल्याची टीका नेहमीच होते. सध्या तर काँग्रेसची पुरती वाताहत झाली असूनही नेतृत्व गांधी घराण्यापलीकडे कोणाकडे सोपविले जात नाही, कारण गांधी घराणेच पक्ष एकसंध ठेवू शकते, असे चित्र रंगविले जाते. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, असे सांगितले जाते तरी भाजपमध्येही नेतेमंडळींची दुसरी पिढी पक्ष किंवा सत्तेच्या राजकारणात पुढे येऊ लागली आहेच. महाराष्ट्रात महाजन, मुंडे, दानवे, फुंडकर, खडसे (आता भाजपमध्ये नाहीत) अशी काही उदाहरणे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचे नेतृत्व भारतीय क्रिकेट नियामक मंडळात अचानक पुढे आले. शहापुत्र किकेटच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होतात का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांनी आपल्या जावयाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने डावे पक्षही आता घराणेशाहीत मागे नाहीत हाच संदेश गेला. पण या पक्षांच्या वाटचालीत, नंतरच्या टप्प्यावर घराणेशाही प्रबळ झाली. प्रादेशिक पक्षांचे तसे नाही. तेथे पक्षवाढीसाठी अन्य नेते किंवा कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा आणि उत्तराधिकारी म्हणून घरातील कोणाची तरी नेमणूक करायची, हाच शिरस्ता होत आहे. बहुतेक साऱ्याच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी पक्षाची सूत्रे आपल्या घरातच राहतील, असे पद्धतशीर प्रयत्न केले. शेख अब्दुल्ला- फारुक अब्दुल्ला- ओमर अब्दुल्ला, देवीलाल-ओमप्रकाश चौटाला-दृश्यंत चौटाला, बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे, शरद पवार-अजित पवार किंवा सुप्रिया सुळे-रोहित पवार, देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व त्यांचे पुत्र, करुणानिधी-मुख्यमंत्री स्टॅलिन व त्यांचे पुत्र अशा नेतेमंडळींच्या तीन-तीन पिढय़ा राजकारणात सक्रिय झाल्या. प्रादेशिक अस्मिता डावलण्याच्या काँग्रेसच्या राजकारणातूनच देशातील विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष वाढले. प्रादेशिक अस्मितेला खतपाणी घालत प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांमध्ये ताकद वाढविली आणि सत्ता संपादन केली. पण प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व घराण्याच्या पुढे जाऊ शकलेले नाही. प्रादेशिक पक्ष आणि घराणेशाही हे आपल्याकडे जणू काही समीकरणच तयार झाले आहे; याला तृणमूल काँग्रेसचा अपवाद असता तरच नवल! राजकीय संघटनेतून नवनवे नेतृत्व देणाऱ्या राजकीय संस्कृतीसाठी मुळात राजकीय जागृती असावी लागते आणि आपल्याकडे या जागृतीऐवजी, सत्तासंधी मिळवून ती उपभोगणे म्हणजेच राजकारण, ही मद्दड जाणीव घट्ट होते आहे. त्यामुळेच, राजकीय पक्ष म्हणजे प्रस्थापित नेतृत्वाची खासगी मालमत्ताच झाल्यासारखी परिस्थिती आज कोणत्याही पक्षात दिसते. घराणेशाहीमुळे पक्ष टिकतील वा वाढतीलही, पण राजकीय संस्कृतीचे मात्र नेहमीच नुकसान होत राहील.