पुढच्यास ठेच लागली की मागच्याने शहाणे व्हायचे असते आणि स्वत:ला ठेच लागली तर मग पुढच्या वेळी अधिक शहाणे व्हायचे असते. परंतु जागतिक माहिती-तंत्रज्ञान महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या देशास बहुधा वारंवार ठेचा खाण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा ‘वॉनाक्राय’ म्हणजे ‘रडायचेय काय?’ असे मिश्कील नाव असलेल्या भयंकर संगणकीय विषाणूने आपल्याला एकदा रडविल्यानंतरही आपले डोळे उघडले नसून, पुन्हा एकदा या खंडणीखोर विषाणूच्या नव्या जातभाईने आपणांस फटका दिला आहे. जेएनपीटी हे भारतातील एक महत्त्वाचे बंदर. देशाच्या आर्थिक रक्तवाहिन्यांना जोडणारी एक महत्त्वाची नस. त्यावर दोन दिवसांपूर्वी पेटय़ा नामक रॅन्समवेअरने हल्ला चढविला. या बंदरातील सर्व संगणकीय व्यवहार बंद पाडला. जहाजांचे वाहतूक व्यवस्थापन विस्कळीत झाले. कंटेनरच्या कंटेनर तसेच पडून राहिले. यामुळे अर्थातच प्रचंड आर्थिक हानी झाली. या विषाणूचे जन्मस्थान नेमके कोणते हे कदाचित कधीच समजणार नाही. युक्रेन हे त्याचे केंद्र असल्याचे सध्या सांगितले जात आहे. वॉनाक्रायप्रमाणेच तो मेलला जोडलेल्या एखाद्या फाइलमधून आला असावा. या रॅन्समवेअरबद्दल सध्या विविध तंत्रज्ञान संस्थांकडून जी माहिती समजत आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तो खऱ्या अर्थाने रॅन्समवेअर नाही. एखाद्या संगणकीय व्यवस्थेवर विषाणूद्वारे नियंत्रण मिळवायचे आणि ते परत देण्यासाठी पैसे उकळायचे असे रॅन्समवेअर हल्ल्याचे स्वरूप असते. पेटय़ा मालवेअरच्या हल्ल्यामागे खंडणीखोरी हा हेतू दिसत नाही. हा विषाणू व्यवस्थेत घातपात करतो. संगणकीय माहिती उद्ध्वस्त करतो. तीही अशा प्रकारे की ती परत मिळवता येणारच नाही. तेव्हा हा खरे तर दहशतवादी हल्ला आहे. त्याकडे त्याच प्रकारे पाहिले पाहिजे. पण एकंदरच अशा प्रकारच्या सुरक्षेसाठी आपण कितपत तयार आहोत, हा प्रश्नच आहे आणि त्याचे कारण हे केवळ तांत्रिक साधनांची वा तंत्रज्ञानाची कमतरता वा तत्सम बाबींमध्ये आहे असे मानता येणार नाही. पेटय़ा विषाणूचा हल्ला जगातील काही प्रगत देशांमध्येही झाला, असे म्हणून आपल्या कमतरताही झाकता येणार नाहीत. आपण माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ जगाला पुरविणारे. त्या बळावर देशाला डिजिटल युगाकडे घेऊन जाण्याची स्वप्ने पाहणारे. असे असताना येथील साध्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पेलू शकणारे सव्‍‌र्हर आपण बसवू शकत नाही. ते बसवणे अवघड नाही. अशक्य तर मुळीच नाही. तरीही ते होत नाही याचे कारण एकंदर माहितीबाबतची अनास्था. याच अनास्थेमुळे आपल्याकडील महत्त्वाच्या संस्थांमधील संगणकीय प्रणालीही पुरेशा सुरक्षित नसतात. हे वारंवार सिद्ध झाले आहे. आतापर्यंत संगणकचाच्यांची मजल केवळ एखाद्या संस्थेचे संकेतस्थळ हॅक करणे वा माहितीचोरी करणे येथपर्यंत होती. आता ती माहिती नष्ट करणे येथपर्यंत आली आहे हे पेटय़ा विषाणूने दाखवून दिले आहे. सध्या आपण ‘आधार’युगात प्रवेश केला आहे. जीएसटी ही नवी करप्रणाली आपण स्वीकारत आहोत. अशा काळात आपली सायबर सुरक्षेची फळी कमकुवत असणे हे केवळ चिंताजनक नव्हे, तर राष्ट्राच्या आर्थिक आरोग्यासही हानीकारक आहे. येथे आपली संरक्षणविषयक संगणकीय प्रणाली ‘हॅकप्रूफ’ आहे हे गृहीत धरलेले आहे. परंतु त्याहीपलीकडे राष्ट्राचे जीवन असते. ते अशा विषाणूंनी ग्रासले जाणे हे कोणालाही परवडणारे नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करताना अंतर्गत संरक्षणाचे हे अंग नीट विचारात न घेतल्यास मग कोणी वॉनाक्राय म्हणूनही विचारण्याची गरज नाही. आपणांस तसेच रडत बसावे लागेल..