19 November 2017

News Flash

अपप्रचाराचे औषध

प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर गेल्या दोन वर्षांत जे घडले नव्हते, ते कर्नाटकात

लोकसत्ता टीम | Updated: September 7, 2017 3:13 AM

Gauri Lankesh : गौरी लंकेश यांच्या हत्येबाबतची माहिती देणाऱ्यास कर्नाटक सरकारने १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी याबाबतची घोषणा केली.

प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर गेल्या दोन वर्षांत जे घडले नव्हते, ते कर्नाटकात पुन्हा घडले. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. कर्नाटक राज्यातील स्त्रीवादी, डाव्या, विवेकवादी चळवळींचा एकमेकींशी संबंध नसला तरीही त्या साऱ्यांना गौरी लंकेश यांच्यामुळे बळ मिळत होते. त्या अर्थाने, त्या विचारवंतच. पण विचारवंत म्हणवून घेण्यात धन्यता मानण्यापेक्षा, पत्रकार असण्याचे मर्म त्यांनी ओळखले होते. त्या डाव्या विचारांच्या असल्या तरी कर्नाटकविषयीचे त्यांचे ममत्व त्यांच्या धारदार प्रश्नांमधून दिसत राहिले. ‘मार्क्‍सच्या किती तरी आधी ज्या भूमीत बसवण्णांनी समता प्रस्थापित करण्याचा मार्ग दिला, तेथे लिंगायत समाज हिंदुत्ववाद्यांना साथ कशी काय देतो?’ यासारख्या प्रश्नामागची आर्थिक-सामाजिक उत्तरेही प्रसंगी भ्रष्टाचाराविषयीच्या वृत्तलेखांतून त्या मांडत राहिल्या. अनंत चतुर्दशीच्या मंगळवारी याच गौरी लंकेश यांच्या देहाची चाळण करून मारेकरी पळूनही गेले. सीताराम येचुरींपासून राज्यवर्धन राठोड यांच्यापर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेकविध व्यक्तींनी, तसेच पत्रकार, कवी, समीक्षक अशा बुद्धिजीवींसह कार्यकर्त्यांनी लंकेश यांच्या हत्येचा निषेध कमीअधिक तीव्र शब्दांमध्ये केलेला आहेच. समाजमाध्यमांचे व्यासपीठ या निषेधासाठी उपयोगी पडले, तसेच शहराशहरांत मंगळवारी रात्रीपासूनच होणाऱ्या निषेध सभा आणि ‘मेणबत्तीधारक’ निदर्शने यांतूनही हा निषेध प्रत्यक्ष दिसून आला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या हत्यांमागे एक सूत्र आहे हे या निदर्शनांत सहभागी झालेल्या बहुतेकांना मनोमन पटलेले होते आणि आहे. ते जे काही मनोमन पटलेले सूत्र आहे, त्याची वाच्यता कुणीही करीत नाही; तसेच सरकारची कोणतीही यंत्रणा अद्याप त्या कथित सूत्रापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरलेली नाही. मात्र ते सूत्र समाजातील सनातनी विचारांच्या माथेफिरूंकडे, त्यांच्या संघटनांकडे आणि अशा संघटनांपासून योग्य अंतर राखणे एवढीच काय ती कर्तबगारी असलेल्यांकडे निर्देश करणारे आहे, हे निश्चित. अशा वेळी देशातील क्रमांक एकचा पक्ष शांतच राहतो, पण अशा शांतपणाने नाचक्की तर टळत नाही. मेणबत्तीबाज जेव्हा जेव्हा या चारपैकी एखाद्या हत्येच्या निषेधासाठी एकत्र आले, तेव्हा तेव्हा त्या हत्येच्या आरोपाचा घाव अप्रत्यक्षपणे भाजपवरच झालेला असतो, ही वस्तुस्थिती कुणीही उघडपणे बोलून दाखवत नाही.. ना या हत्यांचा निषेध करणारे कार्यकर्ते; ना ‘हत्या करणे चुकीचेच’ असे म्हणणारा भाजप. पण मेणबत्तीबाजांची कुजबुज मात्र वाढत जाते आणि ‘जगातील क्रमांक एकच्या राजकीय पक्षा’वरला घाव प्रत्येक हत्येगणिक वाढत जातो. याचे गौरी लंकेश यांच्या हत्येने दिलेले एक प्रत्यंतर म्हणजे या हत्येनंतर सुरू झालेला अत्यंत विखारी, उन्मादी अपप्रचार. ‘डाव्यांनीच खून केला’ इथपासून ते ‘या एका हत्येवर थांबू नका’ इथपर्यंत काहीही समाजमाध्यमांवर लिहिले जाते आहे. लिहिणारे अनामिक असले, तरी त्यांपैकी बहुतेक जण सत्ताधाऱ्यांचेच भक्त वा समर्थक आहेत. हे असे का व्हावे? कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे आणि गौरी लंकेश या समजा बिनमहत्त्वाच्या पत्रकार आणि भाजपवर भुंकत राहणाऱ्या कुणी भुक्कड होत्या, एवढेच जर खरे असेल तर त्यांच्या हत्येची एवढी उठाठेव भाजप समर्थकांनी का करावी? ही उठाठेव गौरी लंकेश व त्यांची हत्या याबाबतच्या अपप्रचारातून दिसू लागली आहे. अपप्रचार हेच औषध ठरावे, इतका मोठा कोणता रोग देशातील सर्वात मोठय़ा पक्षाला झाला आहे? की काँग्रेसला किंवा कम्युनिस्टांना ते सत्ताधारी असताना जो रोग झाला होता, तो भाजपला झाल्यास क्षम्यच असे ठरवून मोकळे व्हायचे आहे?

 

First Published on September 7, 2017 3:13 am

Web Title: marathi articles on gauri lankesh murder case as it happened part 2