News Flash

नव्या जाणिवांचा वाटसरू

कोल्हापूरजवळील कागल गावाहून शहरात आलेल्या यादवांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

साहित्यात मराठी मातीतील वास्तव मांडण्याचे भान व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ने दिले खरे, पण त्या बरोबरीनेच द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्यासारख्या दमदार साहित्यिकांनी त्यात भर घालायला सुरुवात केली आणि मराठी वाचकाला, ग्रामीण विश्वानेही भुरळ घातली. हे साहित्य काल्पनिक किंवा किस्सेवजा कथांतच कुंठत असताना पुढच्या पिढीने, त्यात नव्या संवेदनांची भर घालण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये आनंद यादव यांचे नाव अटळपणे घ्यायला हवे. कोल्हापूरजवळील कागल गावाहून शहरात आलेल्या यादवांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. ‘गोतावळा’ या त्यांच्या कादंबरीने साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेईपर्यंत त्यांनी कथा, कवितांचा आकृतिबंध हाताळलेला होता. एका मोठय़ा पटावर आपली सकसता तपासण्याची संधी त्यांना गोतावळामुळे मिळाली आणि त्यानंतरच्या ‘नटरंग’, ‘झोंबी’, ‘काचवेल’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकाला काही नवे आणि दमदार वाचायला मिळाले. मराठी साहित्यातील ग्रामीण संबंध अधिक ठळक करण्यासाठी ज्या साहित्यिकांची नावे आवर्जून घ्यायला हवीत, अशांच्या यादीत यादव आपोआप जाऊन बसले. स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण साहित्यापेक्षा यादवांच्या पिढीतील लेखन वेगळे होते, कारण त्यात वास्तवतेचे भान होते. ग्रामीण निसर्गवर्णनापेक्षा, तेथील जगण्याला असलेली दु:खाची किनार आणि दाहकता लक्षात येण्यास बनगरवाडीतील व्यक्तिमत्त्वे समोर येत होती आणि नव्या लेखकांना एक नवी पायवाटही दाखवीत होती. उद्धव शेळके यांची ‘धग’ त्याच काळातील. रा. रं बोराडे यांच्यासारख्या लेखकास ‘सत्यकथा’च्या मांडवात जाऊन बसण्याचा मानही त्याच सुमारास मिळाला. हे सारे घडत होते, साठच्या दशकानंतर. या साहित्याची चिकित्सा करण्यास डॉ. भालचंद्र फडके यांनी सुरुवात केली आणि हे साहित्य समीक्षेच्याही परिघात येऊन ठेपले. तोपर्यंत साहित्यातील नैतिकतेलाही या ग्रामीण साहित्याने प्रश्नचिन्हांकित केले होते. स्वाभाविकच आनंद यादवांसारखे नव्या दमाचे लेखक भाषेच्या वेगळ्या वाटा-वळणे शोधू लागले. केवळ सत्यकथनापलीकडे जाऊन त्यातील कलात्मक मूल्यांनाही जपण्याचे हे भान त्यांच्यासारख्या साहित्यिकांनी दिले, हे नाकारता येणार नाही. अध्यापनाच्या क्षेत्रात आलेल्या यादवांनी, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या’ आणि ‘मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती’ यांसारख्या पुस्तकांच्या रूपाने समीक्षालेखनही केले. चार कवितासंग्रह, दहा कथासंग्रह, पाच लेखसंग्रह, सात कादंबऱ्या, आत्मचरित्राचे चतुष्टक, आठ समीक्षात्मक पुस्तके असे लेखन त्यांच्या नावावर जमा झाले. साहित्यात रुळू लागलेल्या ग्रामीण साहित्याला वेगळी चूल मांडावीशी वाटल्यानंतर सुरू झालेल्या विविध ठिकाणच्या पाच ग्रामीण साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद यादव यांना मिळाले. मध्यमवर्गीय संवेदनांच्या बाहेर जाऊन साहित्यात नंतर येऊ घातलेल्या दलित साहित्याला यादव यांच्यासारख्या लेखकांनी मार्ग दाखवण्याचे काम केले आणि नंतरच्या काळात त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. वाद ओढवून घेणे हे त्यांच्यासाठी नित्याचे होते, असे म्हणायला हवे. व्यंकटेश माडगूळकर यांची ‘सत्तांतर’ ही कादंबरी हे वाङ्मयचौर्य आहे, अशी टीका केल्यानंतर यादवांवर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आल्यावर त्यांना माघारही घ्यावी लागली. महाबळेश्वर येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतरही त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीतील कल्पनाविलासाला जाहीरपणे विरोध झाला. तो एवढय़ा टोकाचा होता, की त्यामुळे यादव यांना संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवता आले नाही. माफीनाम्यानेही हा विरोध पूर्णपणे मावळला नाही. तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांची ‘साहित्यिक आत्महत्या’ न्यायालयाने मागे घ्यावयास लावली, पण यादव ‘लेखनसीमा’ जाहीर केल्यानंतरही ते साहित्यजगात आणि व्यक्तिगत पातळीवरही एकटेच राहिले. वादांचा त्यांच्या जगण्यावरही विपरीत परिणाम झाला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याच्या विश्वात नव्या जाणिवा जागृत करणारा लेखक आपल्यातून निघून गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:17 am

Web Title: marathi literature anand yadav
Next Stories
1 धोक्याचा इशारा
2 सरकारची ‘रोख’ कोंडी
3 युरोपातला वसंत
Just Now!
X