साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कार्य आणि कर्तृत्व याच्या शोधात मराठी साहित्य रसिक असतानाच सबनीस यांनी पुण्यातील मसापच्या कार्यालयातून सर्वाना एक वैधानिक इशारा दिला. व्यक्ती म्हणून श्रीपाल सबनीस चुकत असेल तर त्याची जरूर चर्चा करा, परंतु संमेलनाच्या अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही, असे एखाद्या बुद्रुक राजकीय नेत्यास शोभणारे विधान त्यांनी केले. मुळात एखादे पद आणि त्यावरील व्यक्ती ही विभागणीच व्यावहारिक नाही. पद प्रतिष्ठेचे असले तरी त्याची ती प्रतिष्ठा त्यावरील व्यक्तीच्या सान-थोरपणामुळेच कमी-जास्त होत असते. त्या पदाचा अपमान खपवून घेणार नाही; म्हणजे सबनीस नेमके काय करणार आहेत? अपमान झालाच तर कोणती शिक्षा देणार आहेत? संमेलनाध्यक्षाला तसा कोणताही अधिकार असत नाही. तेव्हा ही पोकळ दमदाटी झाली. तरीही ते बोलले, याचे कारण निवडणूक प्रक्रियेत गौडबंगाल झाल्याचा आरोप. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी तसा आरोप केला असून, त्याबाबत न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सबनीस दुखावले गेले असल्याची शक्यता आहे. एकंदरच वाघ यांची कोर्टबाजी करण्याची भाषा आणि सबनीसांची दमदाटी हे दोन्हीही अशोभनीयच. सबनीस यांनी तर आता या पदावर आल्यानंतर अशा वादांपासून दूर राहिलेलेच बरे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भाषणातील पहिल्या दोन ओळींतच ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या साहित्यिकांच्या गोळ्या घालून हत्या करणाऱ्या सनातनी प्रवृत्तींचा निषेध करू’ असे जाहीर केल्यानंतर सबनीसांनाच वादग्रस्त बनविले जाईल, अशी शंका व्यक्त होत होती. ती त्यांनीच खरी करून दाखविण्याचे काहीही कारण नाही. राहता राहिला प्रश्न सबनीस यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा. ‘कोण हे सबनीस’ हा पुण्या-मुंबईतील साहित्यरसिकांसमोरील मोठाच वाङ्मयीन प्रश्न बनून राहिला आहे. सबनीस हे मराठवाडय़ाचे. त्यांची कर्मभूमी उत्तर महाराष्ट्र. सध्या मुक्काम पश्चिम महाराष्ट्रात, तोही पुण्यात. परंतु ‘या गृहस्थांचे एकही पुस्तक कधी वाचनात आले नाही. पुस्तकाचे सोडा, त्यांचे साधे नावही कधी कुठे वाचले नाही,’ असे सांगत फिरताना अनेक साहित्यप्रेमी दिसत आहेत. त्यातील काही तर असे, की यंदाच्या बुकरच्या, ऑस्करच्या यादीतील लेखकांचे अल्पचरित्र त्यांना तोंडपाठ असते. अशा वाचकांनासुद्धा या सबनीसांचा पत्ता नाही आणि ही चूक सबनीसांचीच असा त्यांचा आविर्भाव आहे. याला काय म्हणावे? सबनीस हे समीक्षक आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके समीक्षांची असून, कुसुमाग्रजांपासून मे. पुं. रेगे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांची दखल घेतलेली आहे, हे खरे. परंतु वाचकांना त्यांची माहिती नाही. हा दोष कुणाचा? मराठी समीक्षा वाचकांपासून तुटलेली आहे याचा की बहुसंख्य वाचकांची यत्ता अजूनही कथा-कादंबऱ्यांपर्यंतच मर्यादित आहे याचा? की पुणे-मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांतील साहित्यक्षेत्रीय तुटलेपणाचा? अनेक समीक्षाग्रंथ नावावर असलेल्या आणि सकस समीक्षेबद्दल थोरामोठय़ांनी नावाजलेल्या सबनीसांबद्दल कोण हे, असा प्रश्न पडत असेल, तर आजवरच्या ‘अ. भा.’ साहित्य संमेलनांनी आणि उपक्रमांनी काय साधले हे एकदा खरोखरच तपासून पाहिले पाहिजे.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार