द. भि. कुलकर्णी ही मराठी साहित्य व समीक्षेतील अटळ नाममुद्रा आहे. विशेषत: मराठी साहित्यातील तात्त्विक समीक्षेचा पाया घालण्याचे महत्त्वाचे काम दभिंनी केले आहे. महाकाव्याविषयी त्यांनी लिहिलेला प्रबंध तर मूलगामी मानला जातो. मर्ढेकरांची समीक्षा व साहित्यासंबंधी त्यांनी मांडलेल्या विचारातून मर्ढेकरांचे मोठेपण अधोरेखित होते. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरांचे अभंग यांच्याबद्दल तात्त्विक मांडणी त्यांनी केली होती. ही मांडणीही मराठी समीक्षेला नवी दृष्टी देणारी ठरलेली आहे. अलीकडच्या काळात त्यांनी जी ए कुळकर्णी यांच्या कथालेखनासंबंधी वेळोवेळी भाष्य केले होते. मराठी साहित्यातील नोबेल पुरस्काराच्या योग्यतेचा एकमेव लेखक म्हणजे जीए, असे त्यांचे म्हणणे होते व ते रास्तही होते. योग्य समीक्षक केवळ रसग्रहण करीत नाही तर रसिकांना, वाचकांना एक नवे भान देतो. असे नवे भान देण्याचे काम दभिंच्या समीक्षेने केले आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यांनी लिहिलेल्या समीक्षेचा आणखी एक विशेष म्हणजे ते नेहमीच नवचिंतन असावयाचे. उदाहरणार्थ कथा या साहित्य प्रकाराची त्यांनी केलेली मांडणी ही अभिनव आहे. कथा हाच मूलगामी लेखन प्रकार आहे, अशीच त्यांची भूमिका होती. याविषयी बोलताना ‘कोसला’ हीदेखील एक दीर्घकथा आहे, असेच त्यांचे मत होते. कथेच्या पडत्या काळात कथेची प्रकृती सांगून तिचा गौरव करण्याचे मोठे कार्य दभिंनी केले. त्यामुळे मराठी कथालेखन पुन्हा एकदा समर्थ होईल, असे नवे कथालेखन वाचताना जाणवते. मूळ नागपूरकर असलेल्या दभिंचे दिवंगत राम शेवाळकर यांच्याप्रमाणेच संस्कृत भाषेवरही विलक्षण प्रेम होते. अनेक ठिकाणी ते अभिनवगुप्त, कालिदास यांचे संदर्भ देत असत. याशिवाय हिंदी, उर्दू आणि रशियन वाङ्मयाचाही त्यांचा प्रचंड व्यासंग होता. तुकाराम-ज्ञानेश्वर, जीए-मर्ढेकर यांच्या साहित्यावर त्यांनी अतोनात प्रेम केलेच, पण नव्या लेखकांचे साहित्यही ते आवडीने वाचत. त्यावर चर्चा करीत. चौफेर वाचन असल्यामुळे त्यांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. नुसते समीक्षालेखन त्यांनी केले नाही तर ललित, काव्य, कथा या क्षेत्रांतही मुशाफिरी केली. ‘रेक्वियम’ हा कथासंग्रह वा ‘मेरसोलचा सूर्य’ हा काव्यसंग्रह, दभिंच्या अनेक पदरी व वैविध्यपूर्ण साहित्यात मोलाची भर घालणारे सिद्ध झाले. कादंबरीची समीक्षा करताना ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबऱ्यांतील त्रुटीही त्यांनी दाखवल्या तर फडके आणि खांडेकरांच्या मर्यादाही. (कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा) आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई आदींच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी केले (पस्तुरी). आपल्या ८२ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ५५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नोकरीच्या निमित्ताने त्यांनी नागपूर, कोल्हापूर, पुणे, बनारस आणि पुन्हा नागपूर अशी खूप भटकंती केली. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच विविध वाङ्मय पुरस्कारही त्यांना मिळाले. ज्या नागपूरमध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले तेथे त्यांना डी.लिट. देऊनही गौरवण्यात आले. काही वर्षांपूर्वी एका कौटुंबिक वादळाशी त्यांना सामना करावा लागला. तरीही पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाची निवडणूक त्यांनी लढविली आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा पराभव करून ते निवडूनही आले. काही वर्षे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य या विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. दभिंच्या निधनाने मराठीतील चिंतनशील, व्यासंगी समीक्षकांच्या परंपरेतील आणखी एक दुवा निखळला आहे.