News Flash

भाजपला मोठा इशारा

पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (अजयसिंह बिष्ट) आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या दोघांनी प्रतिनिधित्व केलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७३ आणि विधानसभेत ४०० पैकी ३२५ जागा जिंकणाऱ्या भाजपची उत्तर प्रदेशात हवा निर्माण झाली होती. गोरखपूर लोकसभा मतदारसंघ तर १९८९ पासून भाजपच्याच ताब्यात होता. योगी आदित्यनाथ हे पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. बरोबर वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोरखपूर पट्टय़ात भाजपला एकहाती यश मिळाले होते. वर्षभरातच पोटनिवडणुकीत मतदारांनी भाजपला दणका दिला. गेल्या वेळी दोन्ही मतदारसंघांमघ्ये भाजपने तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळविला होता. भाजप, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष अशा तिरंगी लढतीचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लाभ झाला होता. कारण समाजवादी पक्ष आणि बसपची मतपेढी साधारणपणे सारखीच आहे. त्यातच बसपाच्या हक्काच्या दलित मतपेढीत भाजपने फूट पाडली होती. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र आल्यावर २०१५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची डाळ शिजली नव्हती. तसेच गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीकरिता समाजवादी पक्ष आणि बसप एकत्र आले. बसपने विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. १९९५ मध्ये समाजवादी पार्टीच्या गुंडांनी मायावती यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नव्हता. बदलत्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र आले. ‘बुआ’ मायावती आणि ‘भतीजा’ अखिलेश यादव यांचे भांडण मिटले. दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान कमी झाले आणि त्याचा समाजवादी पार्टीला फायदा झाला. भाजपचे पारंपरिक व्यापारी, मध्यमवर्गीय मतदार बाहेरच पडले नाहीत. भाजप सरकारच्या धोरणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मोदींनंतर योगीच’ असे चित्र त्यांच्या समर्थकांकडून निर्माण केले जात आहे. भावी पंतप्रधान म्हणून योगी यांच्या नावाची चर्चा केली जाते. गोरखपूर हा आपला बालेकिल्लाच योगी सांभाळू शकले नाहीत. गेल्याच वर्षी गोरखपूर या त्यांच्या मतदारसंघात शेकडो बालके सरकारी रुग्णालयात दगावली होती. शहरात सुधारणांची वानवा असताना येथील मंदिरांना वारसा-दर्जा देणे, हे योगी सरकारचे काम. तेव्हा गोरखपूर, फुलपूरचे  पराभव हा २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला इशारा आहे. समाजवादी पक्ष आणि बसप यांची आघाडी आगामी निवडणुकीत कायम राहिल्यास भाजपपुढे मोठे आव्हान असेल. रामजन्मभूमी आंदोलनानंतर १९९५ मध्ये मुलायमसिंग यादव व कांशीराम यांनी एकत्र येऊन भाजपला रोखले होते.  आता मायावती व अखिलेश यांनी भाजपचा पराभव केला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने भाजपला दणका दिला असतानाच बिहारमधील अररिया लोकसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यात सध्या तुरुंगात असलेल्या लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश आले, तर त्याआधी राजस्थानातील पोटनिवडणुकीतही  भाजप अपेशी ठरला होता.  परवाच  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला २० पक्षांचे नेते उपस्थित होते. भाजपच्या विरोधात अन्य पक्ष एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. ही एकी अशीच कायम राहिल्यास भाजपपुढील आव्हान वाढेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 2:56 am

Web Title: mayawati and akhilesh yadav beat bjp
Next Stories
1 ‘राजकीय प्रश्ना’वरील मौन
2 नाणेनिधीचे पोक्तचिंतन!
3 रांगडा आणि उमदा
Just Now!
X