कदाचित समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातही काही तथ्य असेल, कदाचित आपले मत चुकीचे असू शकेल, कदाचित सत्य काही तरी वेगळेच असेल, ही शक्यता नेमकी कधी मरण पावली हे नक्की सांगता येत नाही. माणसाच्या ज्ञानवृद्धीसाठी, प्रगतीसाठी ही शक्यता लोकमानसात जिवंत असणे अत्यंत आवश्यक होते. ती हयात असणे म्हणजे वाद-संवादाची दारे उघडी असणे. ती आता एकेक करून बंद होत चालली असून, ‘मी म्हणतो तेच खरे’, एवढेच नव्हे तर ‘मला नामंजूर असलेले सत्यही असत्यच’ असे मानण्याच्या सत्योत्तरी काळात आपण सध्या वावरत आहोत. अशा परिस्थितीत माइक पेन्स यांच्यासारख्या व्यक्तीने समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करावी ही एरवी विचित्र वाटणारी बाबही गांभीर्याने घेतली जाते, यात काहीही धक्कादायक नाही. ती आजची स्वाभाविक अवस्था मानली पाहिजे. माइक पेन्स हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असून, गेल्या रविवारी इंडियाना राज्यातील नोत्रदाम विद्यापीठात केलेल्या भाषणात त्यांनी उच्चारस्वातंत्र्याचा जोरदार जयजयकार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील अनेक विद्यापीठांच्या आवारांत सध्या बोलण्यावर विविध र्निबध लादले जात आहेत. विद्यार्थ्यांनी ‘पोलिटिकली करेक्ट’ म्हणजे विद्यमान सामाजिक-राजकीय कथनास साजेसे असेच बोलावे, वागावे यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. उच्चारस्वातंत्र्य नामशेष करण्याचाच हा प्रकार आहे. याचा पेन्स यांनी निषेध केला. ते म्हणतात तसे खरोखरच घडत असेल, तर ते निषेधार्हच. त्याचा पेन्सच नव्हे, तर ज्यांचा ज्यांचा वाद-संवादाच्या लोकशाहीवादी प्रक्रियेवर विश्वास आहे त्यांनी त्यांनी त्यास विरोधच करावयास हवा. मग आक्षेपाचा मुद्दा राहिलाच कोणता? आक्षेप उच्चारस्वातंत्र्याच्या भागवताला नाही. आक्षेप ते भुताने सांगावे याला आहे. पेन्स यांच्या विद्यापीठातील उपस्थितीला, त्यांच्या भाषणाला तेथील विद्यार्थ्यांच्या एका गटाचा विरोध होता. पेन्स ज्या धोरणांचे प्रतिनिधित्व करीत आहेत ती धोरणे कोणास नापसंत असतील तर त्यांना त्यांस विरोध करण्याचा पुरेपूर हक्कआहे. तो विरोध जाहीर करण्याचे स्वातंत्र्य त्यांना लोकशाहीने दिलेले आहे. त्या मुलांनी भाषण सुरू असताना सभात्याग करून आपला निषेध नोंदविला. हे सारे जोवर संसदीय, शांततेच्या मार्गाने होत आहे तोवर त्यास नावे ठेवण्याचे काहीही कारण नाही. पेन्स यांना मात्र हा मार्गही अमान्य असावा असे दिसते. त्यामुळेच ते सहिष्णुता-असहिष्णुतेच्या वादात पडले. यास चोराच्या उलटय़ा बोंबा असे म्हणतात. अशा बोंबा ठोकणे हा अतिरेकी विचारसरणीतील पहिला धडा असावा. हे अतिरेकी कोणत्याही दिशेचे असोत, कोणत्याही जाती-धर्माचे असोत, त्यांना विरोधाचे, निषेधाचे सर्व प्रकार मान्य असतात. अट एकच असते, की हे प्रकार त्यांनी केलेले असावेत. ते दुसऱ्याने केले तर त्यांना ते अजिबात खपत नसते. पेन्स हे असहिष्णुतेचा मुद्दा अशा प्रकारे राजकीय पटलावर आणत आहेत, की वाटावे – अमेरिकेत पेन्स यांना प्रिय असलेल्या अतिरेकी उजव्यांना जगणेच कठीण झाले आहे आणि हेच सत्य असल्याचे अनेकांना वाटत आहे. सत्योत्तरी सत्य म्हणतात ते हेच. वस्तुस्थिती अशी आहे की, तेथे अतिरेकी विचारांना मोठय़ा प्रमाणावर विरोध होत आहे. जाणता विद्यार्थीवर्ग तमाम वेडेपणाच्या विरोधात उभे राहत आहे. लोकशाही मार्गाने असा आवाज उठविणे ही पेन्स यांच्यासारख्यांना ‘असहिष्णुता’ वाटत असेल; परंतु तो सामाजिक शहाणपणा आणि सुसंस्कृतता टिकविण्याचा प्रयत्न आहे. त्यालाही विरोध करण्याचा पेन्स यांना अधिकार आहे. परंतु विरोध तथ्य आणि सत्य यांच्या जोरावर व्हावा. उलटय़ा बोंबा मारणे याला वैचारिक विरोध म्हणत नाहीत.