25 February 2021

News Flash

वेळापत्रकाची आधुनिकता…

शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील- विशेषत: मुंबई शहर क्षेत्रातील उपनगरीय रेल्वे प्रवाशांची रोजची दगदग पाहिली तरी ही अगतिकता दिसून येईल.

महाराष्ट्रातील करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चाललेला असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाच्या वेळा बदलण्याची व्यक्त केलेली गरज अनेक वर्षे केवळ चर्चेतच राहिली आहे. याबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवण्याची मागणी त्यांनी केली असून, तिचा तातडीने आणि गंभीरपणे विचार होण्याची आवश्यकता आहे. गेली अनेक दशके शहरांचे नियोजन करताना दूरदृष्टीचा जो अभाव दिसून आला, त्यामुळे राज्यातील आणि देशातील अनेक मोठी शहरे हे श्वास कोंडणारे सापळे झाले आहेत. जगण्यासाठी अन्य पर्याय नाही, म्हणून या शहरांमध्ये लाखो नागरिक जीव अक्षरश: मुठीत धरून जीवन कसेबसे जगत असतात. या शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील- विशेषत: मुंबई शहर क्षेत्रातील उपनगरीय रेल्वे प्रवाशांची रोजची दगदग पाहिली तरी ही अगतिकता दिसून येईल. या जगण्याला तसा कोणताही अर्थ उरलेला नाही, याची जाणीव होऊनही सरकारे त्याबाबत ढिम्म असतात. शहरातील सगळे व्यवहार दिवसाच्या विशिष्ट वेळांतच करण्याचा हा प्रघात त्यास सर्वात अधिक कारणीभूत आहे. शहरांचे नियोजन करताना पुढील शतकभरात होणाऱ्या विकासाचा विचारच न केल्याने राज्यातील बहुतेक शहरांमधील रस्ते आता गल्लीइतके अरुंद झाले आहेत. मुंबईसारख्या शहरावर दिवसेंदिवस ताण वाढतोच आहे. करोनाकाळात मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वेळा बदलण्याची मागणी प्रवासी संघाने केली होती. तिला रेल्वे खात्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे आधीच कमी असलेल्या लोकलमध्ये दुपटीपेक्षा अधिक गर्दी होऊ लागली. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका अधिकच वाढू लागला. या गर्दीमध्ये मुंबईत काही जणांना मृत्यूही पत्करावा लागला. त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. न्या. नरेश पाटील यांनी याबाबतचा निकाल देताना, कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे आदेश दिले होते. अगदी दोन दशकांपूर्वीपर्यंत बँकांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सकाळ-संध्याकाळ असत. त्यामध्ये एकसूत्रता आणण्याच्या नादात केंद्र सरकारने त्या वेळा बदलल्या आणि देशभरात एकच वेळ जाहीर केली. त्यामुळे नोकरदारांची अधिकच अडचण होऊ लागली. परंतु सरकारने मात्र त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. शाळा, महाविद्यालये, दुकाने, सरकारी आणि खासगी कार्यालये या सगळ्यांच्या वेळा एकच राहिल्याने त्याचा जनजीवनावर त्रासदायक परिणाम होतो. याचा सार्वजनिक वाहतुकीच्या सगळ्या व्यवस्थांवर कमालीचा ताण येतो. आता तर प्रचंड गर्दी झाल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचाही धोका आहे. टाळेबंदी शिथिल होऊन जनजीवन सुरळीत होऊ लागल्यावर अनेक खासगी आणि सरकारी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा सक्षमतेने सुरू न झाल्याने मिळेल त्या वाहनाने कार्यालयात पोहोचणे, हे नोकरी टिकवण्यासाठीचे दिव्य करण्याशिवाय कर्मचाऱ्यांपुढे पर्यायच राहिला नाही. किमान शारीरिक अंतर ठेवण्याची गरज तर त्यामुळे पार धुळीला मिळून गेली. अशा स्थितीत कार्यालयांच्या आणि व्यवसायांच्या वेळा बदलण्याची अधिक आवश्यकता आहे. याचा विचार तातडीने करायला हवा, कारण त्यामुळे शहरांचे नियोजन अधिक नेटकेपणाने करता येणे शक्य होऊ शकेल. सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यांवर होणारी गर्दी त्यामुळे विखुरली जाऊ शकेल. शहर नियोजनाकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी सरकारने वेगळा विचार करण्याची खरे तर हीच संधी आहे. आधुनिक जीवनशैलीत सगळी कामे विशिष्ट वेळांतच करण्याची सक्ती असण्याचे काहीच कारण नाही. २४ तास शहरे कार्यरत राहिली, तर हा सगळा ताण कमी होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा याबाबतचा आग्रह म्हणूनच अभिनंदनीय आहे. २४ तासांच्या चक्रामुळे उपाहारगृहे, बससेवा, लोकलसेवा, टॅक्सी सुरू राहतील. त्यांच्या व्यवसायालाही त्याचा लाभ होऊ शकेल. परंतु रात्रीच्या वेळात फक्त दरोडे, चोऱ्या आणि खून होतात, अशा गैरसमजामुळे यास विरोध होतो. शहरे कायम कार्यरत राहणे, हा जगातील सगळ्या विकसित देशांतील आधुनिक जीवनशैलीचा भाग आहे. त्याला विरोध करणे म्हणजे ठरवून मागे राहण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे. मोठ्या शहरांत औषधांचीही मोजकीच दुकाने रात्रभर उघडी असतात. पंचतारांकित हॉटेलांमध्येच रात्रभर खाण्यापिण्याची सोय असते. सामान्यांच्या जगण्याला त्याचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे २४ तासांच्या कार्यशैलीमुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवणे, हे राज्यांसाठी फारसे अवघड असायला नको. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्याला भिडायचीच जर भीती वाटू लागली, तर हे प्रश्न अधिक गुंतागुंतीचेच होण्याची शक्यता अधिक. शहरांच्या नियोजनाकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी सरकारने धाडस दाखवणे म्हणूनच फार आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:11 am

Web Title: modernity of schedule corona virus infection chief minister uddhav thackeray akp 94
Next Stories
1 पंजाबची ‘उपांत्य फेरी’
2 ही अरेरावी कोणासाठी?
3 माहितीचे लोकशाहीकरण..
Just Now!
X