X
X

हत्या झाली, पुढे काय?

READ IN APP

सोमवारी अंकारातील एका कलादालनातील कार्यक्रमात एका तरुण तुर्की पोलिसाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

 

सीरियात बदल केला गेलाच पाहिजे, हे पॉल वुल्फोवित्झ यांचे २००३ मधले उद्गार. तेव्हा ते होते जॉर्ज बुश मंत्रिमंडळात संरक्षण विभागाचे उपमंत्री. आता ते कोणीच नाहीत. परंतु त्यांनी रेटलेल्या धोरणांचा गाडा अजूनही तसाच धावत आहे. त्या धोरणांनी आधी अल् कायदाला बळ दिले. पुढे त्यातूनच आयसिसचे भूत उभे राहिले. लक्षावधी नागरिकांचे, सैनिकांचे बळी गेले. रशियाचे तुर्कस्तानातील राजदूत आंद्रे कालरेव्ह हा त्यातला ताजा बळी. सोमवारी अंकारातील एका कलादालनातील कार्यक्रमात एका तरुण तुर्की पोलिसाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दूरचित्रवाणी वाहिनीवरून दिसलेली ही घटना सुसंस्कृत जगाला हादरवून टाकणारीच होती. अवघ्या २२ वर्षांचा तरुण. तुर्कस्तानच्या दंगलविरोधी पथकातला. सुटाबुटातला. रशियाचे राजदूत श्रोत्यांसमोर भाषण करीत असताना शांतपणे त्यांच्या मागे उभा होता तो. अचानक त्याने पिस्तूल काढले. ‘अल्लाहु अकबर’ अशी आरोळी ठोकली आणि त्यांच्या पाठीत गोळ्या घातल्या. नंतर क्रुद्ध चेहऱ्याने हवेत तर्जनी नाचवत तो ‘अलेप्पोला विसरू नका, सीरियाला विसरू नका..’ अशा घोषणा देत होता. सुरक्षारक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. मुस्लीम अतिरेक्यांच्या कोणत्याही लोकप्रिय प्रतिमेत न बसणारा असा तो तरुण. तो नेमका कोणत्या गटाचा होता? आयसिसचा की तुर्कस्तानच्या पाठिंब्यावर सीरियात लढत असलेल्या बंडखोरांच्या, याचा शोध सुरू आहे. त्यामागचे सूत्रधार कोण, याचाही तपास सुरू आहे. परंतु खरे तर या हत्येमागे आहे अमेरिकेचे तथाकथित दहशतवादविरोधी युद्ध. २०११ मध्ये अरब जगतात अचानक वाहू लागलेले तथाकथित क्रांतीचे वारे आणि सीरियाचे अध्यक्ष बशर अल् असद यांना हटविण्यासाठी तेथे पाश्चात्त्य जगताने सुरू केलेला युद्धाचा खेळ. मध्यपूर्वेतील, अरब देशांतील अशा राजकीय खेळांत नेहमीच आणखी एक भिडू असतो. तो म्हणजे धर्मपंथांचा. सीरियात असद हे शियांमधील अलविया पंथाचे. तेव्हा त्यांच्या बाजूने उभा राहिला इराण व लेबनॉनमधला हिज्बुल्ला गट. तर असद यांच्याविरोधातील सुन्नींना पाठिंबा देण्यासाठी उभे ठाकले तुर्कस्तान, सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन हे देश. असद हे अमेरिकेला नकोसे. तेव्हा २०१४ मध्ये अमेरिकेने सीरियातल्या यादवीत उडी घेतली. तिच्या सोबतीला नेहमीप्रमाणे ब्रिटन आणि फ्रान्स होतेच. अमेरिकेने तर पाच हजार सीरियन बंडखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी ५० कोटी डॉलरचा कार्यक्रम आखला. पुढे तो गुंडाळला. कारण त्यातून म्हणे प्रशिक्षित झाले केवळ ६० बंडखोर. हे सारे पाहून पुतिन यांच्या रशियाने असद यांच्या बाजूने उडी घेतली. आधी बुश आणि नंतर ओबामा यांच्या धरसोडीच्या धोरणांमुळे तोवर इराकमधील अल् कायदाचे रूपांतर अत्यंत क्रूर अशा आयसिस या संघटनेत झालेच होते. सीरियातील गोंधळाचा फायदा घेऊन आयसिसनेही या संघर्षांत उडी घेतली. आता तेथे सरकारी फौजा विरुद्ध बंडखोर विरुद्ध आयसिस असे तिहेरी युद्ध सुरू आहे. लक्षावधी नागरिक त्यामुळे देशोधडीला लागले. या स्थलांतरितांच्या समस्येने युरोपात अक्राळविक्राळ रूप धारण केले. आज त्या युद्धात अलेप्पो हे शहर होरपळत आहे. तेथील नागरिकांना बाहेर पडता येण्यासाठी काही काळ तेथे युद्धबंदी करावी यासाठी अंकारात रशिया, सीरिया व तुर्कस्तान यांची चर्चा सुरू होती. तेथेच हा हत्येचा प्रकार घडला. त्यामुळे सर्व जग हादरले. अनेकांचे लक्ष अलेप्पोच्या दुर्दशेकडे वळले. तेथील नागरिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नव्याने सुरू झाली एवढेच. सध्या अलेप्पोत शस्त्रसंधी आहे. युद्ध मात्र सुरूच आहे..

22
X