18 February 2019

News Flash

वर्तमानात या..

ते किती बिघडत चालले आहे

काश्मीर प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये काँग्रेसच्या इतिहासाची उजळणी करीत असताना काश्मीरचे वर्तमान अधिकाधिक बिकट होत चालल्याचे दिसत आहे. ते किती बिघडत चालले आहे याचे प्रत्यंतर मंगळवारी श्रीनगरमधील रुग्णालयात झालेल्या दहशतवादी घटनेतून येते. या घटनेकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. कारण ही घटना म्हणजे एका मोठय़ा साखळीची कडी आहे. २००३ मध्ये भारत-पाकिस्तानात झालेल्या शस्त्रबंदीच्या चिंधडय़ा उडाल्या आहेत. नव्या वर्षांच्या पहिल्या आठवडय़ापासून सीमेवरील चकमकींत वाढ झाली आहे. जवान शहीद होत आहेत. सीमेवरील ४० हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. दुसरीकडे दहशतवादी घटनांमध्ये खीळ नाही. दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी गेल्या वर्षी लष्कराने तेथे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही मोहीम सुरू केली. तिला चांगलेच यश मिळताना दिसते. त्यात दोनशेहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. २०१० मध्ये एका वर्षांत २१० दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा. हे वाखाणण्याजोगेच आहे. परंतु त्याचबरोबर सुरक्षा दलांचेही मोठे नुकसान झाले आहे. ७७ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणतात त्याप्रमाणे काश्मीरमधील परिस्थिती सुधारत चालल्याचे हे लक्षण असेल, तर त्यावर बोलणेच खुंटले. एरवीही सत्योत्तरी सत्य स्वीकारण्याची सवय आपण करून घेतलेलीच आहे. परंतु कितीही डोळेझाक करायची ठरविली, तरी काही घटना अशा प्रकारे समोर येतात की त्याकडे काणाडोळा करणे शक्यच नसते. श्रीनगरमधील श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयातून आपल्या सहकाऱ्याला पळवून नेण्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना ही अशीच जाग आणणारी आहे. त्या हल्ल्याबद्दल प्रसिद्ध झालेली माहिती पाहता, त्यामागे व्यवस्थित पूर्वनियोजन होते. नावीद जट ऊर्फ अबू हंजाला हा मूळचा पाकिस्तानी. जवानांच्या, पोलिसांच्या हत्येत हात बरबटलेले होते त्याचे. अशा दहशतवाद्याला तुरुंगातून अन्यत्र नेताना पोलिसांनी किती खबरदारी घ्यायला हवी? परंतु तसे काही झाले नाही. उलट ज्या पद्धतीने त्याला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्यात आले, ते पाहता दहशतवाद्यांना आधीच त्याच्या हालचालींची माहिती होती असे दिसते. हे सुरक्षा यंत्रणांचे आणि खासकरून पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. ‘ऑपरेशन ऑल आऊट’मुळे कंबरडे मोडलेल्या दहशतवादी संघटनांचे अनैतिक धैर्य या घटनेने वाढणार तर आहेच, परंतु अबू इस्माईलसारख्या कमांडरच्या मृत्यूमुळे लष्कर-ए-तोयबाची जी हानी झाली होती, ती भरून काढण्यातही हंजाला हातभार लावणार आहे. ते अधिक चिंताजनक आहे. काश्मीरमधील सामान्य नागरिकांची सहानुभूती दहशतवाद्यांना लाभत असल्याचे तेथील दगडफेकीच्या वाढत्या घटनांतून दिसत आहे. त्या नागरिकांना पुन्हा भारताच्या बाजूने वळविण्यासाठी त्या प्रकरणांतील आरोपींवरील गुन्हे मागे घेण्याचे एक पाऊल तेथील पीडीपी-भाजप सरकारने उचलले. सामान्यांचा असंतोष दूर करण्यासाठी एका गोळीबारप्रकरणी जवानांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला. परंतु ते प्रयत्न पाकिस्तानच्या डावपेचांमुळे विफल होताना दिसत आहेत. आता तर पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून भारताला लक्ष्य केले आहे. हे सारे भारतीय सुरक्षा धोरणाचे जेवढे अपयश, तेवढेच मुत्सद्देगिरीचेही. ठोस धोरण नसेल, तर नुसते इशारे देऊन फक्त तोंडाची वाफ दवडल्यासारखे होते. अर्थात हे समजून घेण्यासाठी मोदी सरकारला जरा वर्तमानात यावे लागेल.

First Published on February 8, 2018 2:28 am

Web Title: narendra modi on kashmir conflict