‘अहो एक कुठलासा प्रसंग.. त्याचे काय एवढे? कशाला सुतावरून स्वर्ग गाठता?’ अशा प्रतिक्रियांनी जर नाशिकच्या त्या घटनेविषयीची चर्चा थांबवली जाणार असेल, तर साऱ्या समाजाच्याच आरोग्याबद्दल चिंता वाटायला हवी आणि खासगी बाबतींत ‘समाजा’ने नाक खुपसण्याचे प्रकार आणखी किती त्रासदायक, किती हिंसक, किती संहारक ठरणार आहेत याचाही हिशेब मांडायलाच हवा. नाशकात घडलेली घटना ही खासगी निर्णयांना पद्धतशीरपणे झालेल्या सामाजिक आडकाठीचे आणखी एक उदाहरण. दोघा कुटुंबांनी राजीखुशीने मान्य केलेल्या आणि नोंदणी पद्धतीने पारही पडलेल्या एका विवाहाचा वधुपित्याच्या आग्रहाखातर पुन्हा ‘विधिवत’ होणारा सोहळा समाजाच्या दबावामुळे होऊ शकला नाही, अशी ती घटना. या वधुपित्यानेही इरेस पेटून, सालंकृत कन्यादान केल्याखेरीज मुलीला सासरी पाठवणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे हे खरे; पण अशा भूमिकेमुळेच, या लग्नाला आडकाठी करण्यातच धन्यता मानणाऱ्यांना तर कृतकृत्यतेच्या उकळ्याच फुटू शकतात! नाशिकच्या त्या दोन कुटुंबांनी घेतलेला सोयरिकीचा निर्णय ही त्यांची खासगी बाब होती. नियमानुसार पन्नासच माणसांच्या साक्षीने होणाऱ्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण समाजमाध्यमांतून सर्वदूर पसरले आणि नवऱ्यामुलाचे ‘खान’ हे उपनाम पाहून काही माथी भडकली. ‘हा लव्ह जिहादच’ मानून मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणण्यात आला. नाशिकनजीकचे भगूर हे विनायक दामोदर सावरकर यांचे मूळ गाव, त्यामुळे नाशिक शहरालाही स्वातंत्र्यवीरांचा कोण अभिमान.. पण ‘हिंदुस्थानी मुस्लिमां’बद्दलची सावरकरांची मते अशा वेळी सोयीस्करपणे विसरली जातात. तमाम परधर्मीयांना शूद्रच मानणाऱ्या हिंदूंना स्वा. सावरकरांनी ‘शूद्रदेखील ब्राह्मण होऊ शकतो’ याची करून दिलेली जाणीव पायदळी तुडवली जाते. एका शहरात वर्षांनुवर्षे राहणारी, एकमेकांना गेली ११ वर्षे ओळखणारी कुटुंबे- पण त्यांच्यातील एक मुस्लीम म्हणून या कुटुंबांनी सोयरीक करायची नाही, असे परस्पर ‘समाज’ ठरवतो! स्वत:ला ‘सांस्कृतिक संघटना’ म्हणवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही यात कुठे संस्कृतीचे नुकसान दिसत नाही- दिसणारच नाही, कारण ‘लव्ह जिहाद’सारख्या, सर्वोच्च न्यायालयात भुक्कड ठरलेल्या अफवेवर यांच्या राजकीय भाईबंदांचे राजकारण चालू असते. केरळमधल्या हादिया या मुलीने मुस्लीम तरुणाशी केलेला विवाह तिच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध होता आणि तिच्या पालकांनीच ‘लव्ह जिहाद’ची तक्रार केली होती, हे अर्धसत्य या राजकारणासाठी वारंवार कुरवाळले जाते- मात्र ऑक्टोबर २०१८ मध्ये, याच राजकारण्यांच्या आवडत्या ‘एनआयए’ या राष्ट्रीय तपास यंत्रणेला ‘या प्रकरणी लव्ह जिहाद नाही’ अशी कबुली सर्वोच्च न्यायालयात द्यावी लागली होती, हे कुणालाच आठवत नाही. प्रत्येक हिंदू मुलीने प्रत्येक मुस्लीम मुलाशी केलेला विवाह हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार मानणारे हे तथाकथित सहिष्णुधर्मीय लोक कुठल्याही सांस्कृतिक संघटनेला कसे जुमानतील? सरसंघचालक मोहन भागवत हे २०१८ च्या सप्टेंबरात दिल्लीतील परकीय दूतावासांच्या प्रतिनिधींपुढे ‘आमच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्रात मुस्लीम धर्मीयही आहेतच’ असे म्हणाले होते.. हेच भागवत अगदी अलीकडे- दहाच दिवसांपूर्वी- गाझियाबादमधील मुस्लीम राष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात ‘या देशातील हिंदू व मुस्लिमांचा डीएनए एकच’ असेही म्हणाले होते.. असल्या विधानांना आम्ही काडीचीही किंमत देत नाही, हे नाशिकच्या घटनेतून ‘समाजा’ने दाखवून दिले. यावर सारवासारवीचा उपाय म्हणून, आडकाठी करणारे मुस्लीमच होते असे ठसवण्याचा प्रयत्न होईल. ज्या गाझियाबादमधील झुंडबळीचा थेट उल्लेख भागवतांनी टाळला होता, त्यावरही ‘मुळात घडले ते वेगळेच’ अशा बातम्या नंतर अत्यंत यशस्वीपणे आल्याच होत्या! तेच इथेही झाले तरी नवल नाही.. कारण समानतेचे व्यापक उद्दिष्ट विसरून अर्धसत्य किंवा असत्याचा आधार घेणे, ही तर समाजाच्या रोगटपणाची पूर्वअट असते.