देशातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित टाटा उद्योग समूहाच्या प्रमुखपदावरून तीन महिन्यांपूर्वी सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी; त्यानंतर एकंदर प्रकरणाला आलेली नाटय़मय रंगत पाहता, त्यांच्या जागी नवीन कोण याबद्दल उत्सुकता जरूरच होती. तरी टाटा समूहाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? जनसामान्यांच्या दृष्टीने या प्रश्नाला खरेच किंमत ती काय? लोकांचे जाऊ  द्या, प्रतिस्पर्धी उद्योगघराण्यांना या गोष्टीत रस कितीसा असावा? गुरुवारी सायंकाळी झालेल्या घोषणेप्रमाणे ५३ वर्षीय नटराजन चंद्रशेखरन हा खरे तर या दृष्टीने सर्वार्थाने स्वाभाविक पर्याय होता. तरी त्यांच्या या अपेक्षित निवडीवर उमटलेल्या प्रतिक्रिया या उपचार म्हणून गोड गोड स्वागताच्या नव्हेत तर एक आश्वासक नि:श्वास सोडणाऱ्या आहेत. ‘टाटांच्या मूल्य आणि नैतिकतेच्या वारशाचा अस्सल अर्थाने वहन करणारा शिलेदार’ अशा शब्दांत ज्येष्ठ उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी या नियुक्तीचे वर्णन केले आहे. लटकी प्रशंसा आणि तोंडदेखली स्तुती करणाऱ्यांपैकी मूर्ती नव्हेत आणि तसे करण्याची त्यांना गरजही नाही. तरी त्यांनी चंद्रशेखरन म्हणजे, त्यांच्याच नि:संदेह लाडक्या चंद्रा यांच्या निवडीची सर्वागांनी सार्थकता सांगावीशी वाटली. टाटा समूहाने आजवर जपलेली मूल्यसंस्कृती, नैतिक व्यवहार आणि परोपकाराची भावना याचे देशाच्या उद्योगक्षेत्रात अजोड महत्त्व आहे. त्यांचे जतन व संवर्धन करू शकेल असा नेता निवडला गेला, अशी खुद्द रतन टाटा, मूर्ती यांच्यासह एकूण उद्योगजगतातील सर्व बडय़ा मान्यवरांच्या प्रतिक्रियांचे सामाईक सार आहे. तब्बल ३० वर्षे टाटा समूहात कारकीर्द राहिलेल्या चंद्रा यांची या परंपरेशी घनिष्ठता आणि अभिन्न एकरूपता हा त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याचा सर्वात मोठा गुण ठरला, हे कोणीही नाकारू शकत नाही. चंद्रा यांच्याकडे ज्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस-टीसीएसचे नेतृत्व होते, ती देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातदारांमधील अव्वल क्रमांकाची कंपनीच नव्हे, तर सर्वाधिक महसूल मिळवून देणारी टाटा समूहातील सर्वात मौल्यवान कंपनीही आहे. २०१५-१६ सालात टीसीएसने १६.५ अब्ज डॉलरचा महसूल कमावला. एकेकाळी या क्षेत्रावर इन्फोसिसचे अधिराज्य होते, तिला १० अब्ज डॉलरचा महसुली टप्पा आताशी साधता आला आहे.  चंद्रा यांनी सात वर्षे टीसीएसचे मुख्याधिकारी म्हणून बजावलेल्या असामान्य नेतृत्वाची ही किमया आहे. सात वर्षांत नफा व महसुलात तिपटीने वाढ टीसीएसने साधली. तिचा पावणेचार लाख कर्मचारीवर्ग पाहता, खासगी क्षेत्रातील ती भारतातील सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी आहे. उल्लेखनीय म्हणजे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मनुष्यबळ गुणवत्ता हेच सर्वात मोठे भांडवल असते. उत्तमोत्तम कर्मचाऱ्यांना प्रलोभने व आमिषांचे गळ टाकून स्पर्धकांकडून टिपले जाणे येथे सामान्य मानले जाते. परंतु आपल्या मनुष्यबळाला किमान गळतीसह टिकवून ठेवण्याचे टीसीएसचे वैशिष्टय़ जागतिक स्तरावर अद्वितीय आहे. टीसीएसला एक जागतिक अग्रणी नाममुद्रा बनविणाऱ्याच्या हाती टाटांचा तेजोमय वारसा येणे म्हणूनच स्वाभाविक. तंत्रज्ञान क्षेत्राची पाश्र्वभूमी असल्याने नव्या पिढीचा डिजिटल तोंडावळा त्यांच्याकडून या जुन्या उद्योग समूहाला बहाल केला जाणे अपेक्षित आहे. अंतर्बाह्य़ व्यावसायिक आव्हानांचा मुकाबला, ताज्या अप्रिय भूतकाळाचा पाठलाग सोडविणे आणि डळमळलेल्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पुन्हा कमावणे चंद्रा यांच्या यशसिद्ध नेतृत्वाला फारसे अवघड नसेल. ‘टाटा’ या नाममुद्रेची तळपत्या मूल्यसंस्कृतीच्या संरजामासह पुन:स्थापना चंद्रा यांच्यासाठी सर्वाधिक मोलाची ठरायला हवी. आपणा सर्वासाठीच ही जिव्हाळ्याची बाब निश्चितच!